Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 17 July 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जुलै २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची
मंजुरी - देशभरात १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये पुढची सहा वर्ष योजनेची अंमलबजावणी
·
सौर ऊर्जेबाबतच्या अडचणी समजून घेत प्राधान्याने उपाय
शोधले जात असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
·
खासगी शिकवणी वर्गांशी संधान साधणाऱ्या महाविद्यालयांवर
बंदीसाठी लवकरच नवीन कायदा, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
·
छत्रपती संभाजीनगर इथं एक विद्यार्थी एक वृक्ष तथा एक
पेड माँ के नाम उपक्रमाला शुभारंभ
आणि
·
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या "शास्ती से आझादी"
योजनेला मालमत्ताधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
****
प्रधानमंत्री
धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली. पुढची सहा वर्षं देशातल्या
१०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती
दिली. ते म्हणाले..,
बाईट
- अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
अंतराळवीर
ग्रूप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ प्रवासाबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा
प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजूर केला. भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक तयार
करण्याच्या उद्दिष्टाकडे या मोहिमेमुळे पुढचं पाऊल पडलं असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना
सौर वीज घेण्याची सक्ती नाही मात्र, सौर ऊर्जेबाबतच्या अडचणी समजून घेऊन त्यावर
प्राधान्याने उपाय शोधले जात असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल विधानपरिषदेत अभिजीत वंजारी यांच्या प्रश्नाला ते उत्तर
देत होते. सध्या दिले जाणारे सौर पंप अधिक सक्षम आहेत, तरीही
एखाद्या ठिकाणी अडचणी असल्या तर तिथल्या शेतकऱ्यांना, सौर ऊर्जे
ऐवजी पारंपरिक वीज देण्याचा विचार करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिली.
राज्यातल्या
सर्व औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र-एमआयडीसीकडील मोकळ्या जागेचा वापर वाहनतळासाठी
केला जाईल, तसंच भविष्यातली तरतूद म्हणून बहुमजली वाहनतळ सुविधा निर्माण करण्याबाबत
विचार करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
**
राज्यातल्या
विविध विभागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात आदर्श कार्यप्रणाली तयार
करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला दिले आहेत. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज
भोयर यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. खासगी आस्थापनांमधील सीसीटीव्हीचं फुटेज
बाहेर दिलं जाऊ नये, याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, महाराष्ट्र
खासगी विद्यापीठे सुधारणा विधेयक, २०२५ काल विधान परिषदेत मंजूर
झालं.
****
विधानसभेत
काल शिक्षण तसंच शेतकरी सुरक्षा विषयावर चर्चा झाली. खासगी शिकवणी वर्गांशी संधान साधणाऱ्या
महाविद्यालयांवर बंदीसाठी नवीन कायदा लवकरच केला जाणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री
दादा भुसे यांनी सांगितलं. अतिरिक्त शुल्क आणि शालेय साहित्य खरेदीच्या सक्तीविरोधातही
नियम केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या
जमिनी सावकारांकडून हडप करण्याची प्रकरणं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासली जाणार असल्याचं
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या १० हजार तक्रारींमध्ये
८७१ हेक्टर जमिनी वाचवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली.
****
शिवसेना
आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काल मुंबईत संयुक्त पत्रकार
परिषदेत या युतीची घोषणा केली. वार्ताहरांशी संवाद साधतांना शिंदे यांनी युतीमागची
भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,
बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोणत्याही
अटी शर्तींशिवाय ही युती होत असून, आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून
घ्यावं, अशी विनंती आपण उपमुख्यमंत्री शिंदे यांना केल्याचं आनंदराज
आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
****
महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल राज्यात महसुलच्या विविध प्रश्नांवर बैठक घेतली. यावेळी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघात डोंगरी आणि अजिंठा
गावात नवीन अप्पर तहसील कार्यालय इमारत मंजूर करण्यासंदर्भात चर्चा झाली. धाराशिव जिल्ह्यातल्या
तात्पुरत्या परवानाधारक दगड खदान धारकांना नियमबद्धरीत्या काम करण्यास परवानगी देण्यासंबंधी
मार्गदर्शक सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
****
नीती आयोगाच्या
‘विकसित महाराष्ट्र-२०४७‘ उपक्रमाच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाचा सर्वांगीण
आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे.
यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला. या समितीत लातूरच्या डॉ. प्रिती पोहेकर
यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
विधान परिषदेतले
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात
पूर्ण होत आहे. त्यांना काल सदनात निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं काल “एक विद्यार्थी एक वृक्ष” तथा 'एक पेड माँ के नाम'
उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,
विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षकांनी
आपल्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं
आवाहन पापळकर यांनी केलं.
दरम्यान, विभागीय आयुक्त
पापळकर यांनी काल छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला. कोणत्याही
परिस्थितीमध्ये काम विहित कालमर्यादेतच पूर्ण झालं पाहिजे, असे
निर्देश त्यांनी दिले.
****
केंद्र
सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या पथकाने धाराशिव जिल्ह्याला भेट देऊन
केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्नवितरण योजनांच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती घेतली.
पथकाने जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये जाऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, ई-केवायसी,
फोर्टिफाईड तांदूळ, आधार आणि मोबाईल संलग्न रेशन
कार्ड यासारख्या विषयांवर लाभार्थी आणि रास्त भाव दुकानदारांशी थेट संवाद साधला. जिल्हा
प्रशासनाने राबवलेल्या “समाधान ॲप” मुळे लाभार्थ्यांच्या तक्रारी वेळेत सोडवल्या जात
असल्याबाबत आणि संपूर्ण प्रणालीतल्या पारदर्शकतेबाबत या पथकाने समाधान व्यक्त केलं.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकाच्या "शास्ती से आझादी" या योजनेला मालमत्ताधारकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काल सायंकाळपर्यंत मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीचे एक
कोटी ४२ लाख रुपये कर संकलन झालं आहे. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी या योजनेबद्दल
माहिती दिली. ते म्हणाले,
बाईट - महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत
****
मीडिएशन
फॉर द नेशन या विशेष मोहिमेअंतर्गत देशभरात ९० दिवसांची राष्ट्रीय मध्यस्थता विशेष
मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार
ही मोहीम औरंगाबाद विभागातही राबवली जाणार आहे. पक्षकारांनी आपल्या वकिलांमार्फत किंवा
थेट मध्यस्थता केंद्राशी संपर्क करून प्रकरणं सामोपचारातून मिटवण्यासाठी अर्ज करण्याचं
आवाहन, उच्च न्यायालय विधी उप सेवा समितीचे अध्यक्ष, न्यायमूर्ती रविंद्र घुगे यांनी केलं आहे.
****
धाराशिव
तालुक्यातल्या ८२ ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त घोषित करत कांस्य पदक प्रदान करण्यात
आले. यानिमित्ताने काल जिल्हा परिषदेमार्फत ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा’ जिल्हाधिकारी
कार्यालयात पार पडला.
****
बीड जिल्ह्यात
अंबाजोगाई शहर आणि परिसरात आज तब्बल एक ते दीड महिन्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत
आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या ७८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
****
हवामान
विदर्भातल्या
बहुतांश जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला असून, मुंबई शहर
आणि उपनगरात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment