Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 July 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०
****
· देशातल्या पहिल्या सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसचं मुंबईत केंद्रीय
माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन
· विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप-आठ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी
अधिवेशन
· विधीमंडळातल्या सर्व आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं
मुख्यमंत्र्यांचं आवाहन
· अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय नाही-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची
टीका
आणि
· आरोग्य सेवा मानकांच्या उल्लंघनप्रकरणी राज्यातल्या २५८ खासगी रुग्णालयांचे
परवाने रद्द
****
देशातली पहिली भारतीय सर्जनशीलता
तंत्रज्ञान संस्था - आयआयसीटी आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ - एन एफ डी सी
यांच्या संयुक्त कॅम्पसचं आज मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी
वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्जनशील
भारताचा संकल्प या केंद्रातून साकारला जात असल्याची भावना, अश्विनी
वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केलं. ते म्हणाले....
बाईट - केंद्रीय
माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव
या संस्थेत १७ अभ्यासक्रमांचा समावेश
असून, गेमिंग,
अॅनिमेशन, पोस्ट-प्रॉडक्शन, कॉमिक्स
अशा क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित विषय शिकवले जाणार आहेत. या अभ्यासक्रमासंदर्भात
आयआयसीटीने इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाशी करार केला असून, अभ्यासक्रमांची
देवाणघेवाणही होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ही संस्था मुंबईत उभी राहणं हे सर्जनशील
अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या भारताच्या वाटचालीतलं मोठं पाऊल, असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. वेव्ह्ज् या जागतिक मनोरंजन परिषदेच्या निष्कर्षांचा
अहवालही यावेळी सादर करण्यात आला.
****
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज
समारोप झाला. विधान परिषदेत १०५ तास कामकाज झाल्याचं, सभापती
राम शिंदे यांनी सांगितलं. सदनात ७९ लक्षवेधींवर तर तीन अल्पकालीन सूचनांवर चर्चा
झाली, विधानसभेनं पारित केलेली १२ विधेयकं तसंच दोन पुनर्स्थापित विधेयकं मंजूर
झाल्याची माहिती सभापतींनी दिली. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या आठ
डिसेंबरपासून नागपूर इथं होणार असल्याचं सभापतींनी सांगितलं.
विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
राज्यपालांच्या सूचनेनुसार कामकाज संस्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. या
अधिवेशनात विधानसभेत १३३ तास ४८ मिनिटं कामकाज झालं. यामध्ये १४ शासकीय विधेयकं
पुनर्स्थापित करण्यात आली,
तर दोन विधेयकं संमत झाली. १५२ लक्षवेधी सूचनांवर तर नियम
२९३ अन्वये पाच प्रस्तावांवर सदनात चर्चा झाल्याचं अध्यक्ष नार्वेकर यांनी
सांगितलं.
****
त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. विधीमंडळातल्या सर्व
आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते
म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
कथित हनिट्रॅप संदर्भाने बोलतांना
मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आजी माजी मंत्र्यांविरोधात असा आरोप नसल्याचा खुलासा
केला. विधानभवनातली हाणामारी, शालेय अभ्यासक्रमातलं त्रिभाषा धोरण, जनसुरक्षा
कायदा, गुन्हेगारीचं प्रमाण,
सायबर सुरक्षा प्रकल्प, प्रार्थना स्थळांवरचे भोंगे, शालार्थ
आयडी घोटाळा,
ऊर्जा निर्मिती, सौर कृषी पंप, रस्ते
आणि इतर पायाभूत सुविधा,
धारावी विकास, आदी विषयांवरही
मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
बीड जिल्ह्यातल्या महादेव मुंडे हत्या
प्रकरणी तपास सुरू असून,
याबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनासमोर सादर
केली. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी
दिला.
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू
शकत नाही, असं सांगत सर्वसमावेशक मुंबईसह प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्याचं आश्वासन
मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. सामान्य जनतेचे प्रश्न
सोडवण्यासाठी आपण अधिवेशनात येतो. त्यावर गांभीर्याने चर्चा होणं अपेक्षित
असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. राज्यात विकासाची कामं वेगाने सुरू असून हे स्थगितीचं
नव्हे तर प्रगतीचं सरकार असल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला.
****
या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय
मिळाला नाही,
अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते
विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्याने
या कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे या कायद्याला विरोध असल्याचं
ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, "महाराष्ट्र
विशेष जन सुरक्षा" विधेयकाला मान्यता न देता पुनर्विचारासाठी शासनाकडे परत
पाठवण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. महाविकास आघाडीने याबाबतचं निवेदन आज
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केलं.
****
विधिमंडळ परिसरात काल झालेल्या हाणामारी
प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर
यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या
दोघांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी आज सभागृहात सांगितलं. यापुढे अधिवेशन काळात विधिमंडळात सदस्य, स्वीय
सहायक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल, असं नार्वेकर यांनी
सांगितलं.
****
राज्यातल्या सहा हजार ७५ शाळा आणि नऊ
हजार ६३१ तुकड्यांवरच्या ४९ हजार ५६२ शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढचा टप्पा
देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून ही माहिती दिली. दोन हजार ७१४ शिक्षक तसंच
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान देण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
मिळाल्याचं भुसे यांनी सांगितलं. यासाठीच्या ९७० कोटी ४१ लाख रुपये अतिरिक्त
खर्चालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
****
दिव्यांग बांधवांना शासनातर्फे विविध
योजनांद्वारे दिलं जाणारं अनुदान दरमहा पंधराशे रुपयांवरून अडीच हजार रूपये
करण्यात आलं आहे,
दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आज
विधीमंडळाच्या दोन्ही सदनांत ही माहिती दिली. राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार
अनुदान योजना,
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र
शासनाची इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनांच्या
लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे.
****
आरोग्य सेवा मानकांचं उल्लंघन
केल्याप्रकरणी राज्यातल्या २५८ खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली. आरोग्य विभागाने या वर्षी
केलेल्या दोन व्यापक सर्वेक्षणांमधून सदर रुग्णालयांकडून मानकांचं उल्लंघन होत
असल्याची बाब समोर आल्यानंतर, बॉम्बे नर्सिंग होम नोंदणी अधिनियम १९४९
अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पाच हजार १३४ रुग्णालयांना नोटीस
बजावण्यात आली असल्याचं,
आबिटकर यांनी सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा
समावेश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात केला जाणार आहे. केंद्रीय
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत आश्वासन
दिल्याचं,
शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत
सांगितलं.
****
मराठवाड्यात कापूस प्रक्रिया
उद्योगासाठी सवलती तसंच सोप्या कर्ज योजना राबवण्याची मागणी आमदार डॉ.राहुल पाटील
यांनी विधानसभेत केली. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावरील अडचणी दूर करून शेतमाल
सुरक्षिततेची हमी द्यावी,
अशी मागणी पाटील यांनी केली.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू, पाथरी, सोनपेठ
या शहरांना जोडणाऱ्या महामार्गाचे काम दोन वर्षात पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक
बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांनी सदस्य राजेश विटेकर यांनी विधानसभेत
विचारलेल्या प्रश्नावर दिली.
****
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल
तटकरे यांचा मराठवाडा दौरा आजपासून सुरू झाला. आज छत्रपती संभाजीनगर इथं
पत्रकारांशी संवाद साधत तटकरे यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment