Saturday, 19 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 July 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जूलै २०२ सकाळी .०० वाजता

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारी २१ तारखेपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दोन्ही सदनात हे अधिवेशन सुरळीत चालू देण्यासाठी सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याची मागणी करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल तर अनेक विधेयकं संमत होण्याची अपेक्षा आहे.

****

राज्यसरकारने त्रिभाषा सूत्र लागू करत पहिली ते पाचवी या वर्गांना हिंदी भाषेची सक्ती केल्यास दुकानांसोबत शाळाही बंद करण्यात येतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईतल्या मीरा-भाईंदर इथं मनसेच्या शाखेचं उद्घघाटन केल्यानंतर काल ते बोलत होते.

मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे, केंद्रसरकारने मराठीला अभिजात दर्जा दिला, मात्र भाषेच्या संवर्धनासाठी कोणताही निधी दिला नाही. राज्यातल्या शाळांमध्ये मुलांवर आपण हिंदी भाषा लादू देणार नाही, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

****

छत्तीसगड मधल्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत काल सहा नक्षलवादी ठार झाले. अबूमझाड क्षेत्राच्या जंगल परिसरात सुरक्षा बलानं गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान काल दुपारी ही चकमक सुरु झाली. घटनास्थळावरुन या सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि ए. के. फोर्टी सेव्हन रायफलींसह मोठ्या प्रमाणात हत्यारांचा साठा जप्त करण्यात आला. अबूमझाड जंगल क्षेत्र आणि परिसरात अजूनही शोध मोहीम सुरु आहे.

****

मुंबई विद्यापीठाला १६९ वर्षांचा समृद्ध, गौरवशाली आणि ऐतिहासिक वारसा लाभली असून काल विद्यापीठाचा स्थापना दिन साजरा झालं. यानिमित्त मुंबई विद्यापीठाने सुरु केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने अवलंबलेल्या युडीआरएफ -युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क पुरस्कार आणि प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि प्रशासकीय गुणवत्ता पुरस्काराचं मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं.

२०३२ मध्ये मुंबई विद्यापीठाला १७५ वर्ष पूर्ण होणार असून या अनुषंगाने विद्यापीठाचं वैश्विक स्थान उंचावण्यासाठी सर्व भागधारकांना कटिबद्ध राहावं लागेल असं विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं.

****

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीत येतो, तिचं नाव बदलून रायगडवाडी असं करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानपरिषदेत केली.

****

सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन सुरूच आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी हा संप सुरू राहणार असल्याचं संघटनेनं सांगितलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयासह राज्यातल्या अन्य रुग्णालयांमधल्या परिचारिका संपावर गेल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात विकासाचे नियोजन करण्यासाठी सीमांकन करण्यात येत आहे. नागरिकांनी परवानगी घेऊनच बांधकामं करावीत तसंच संबंधित यंत्रणांना सीमांकनासाठी सहकार्य करावं, असं आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे.

****

येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक भान जागवून प्रशासनाशी सुसंवाद दृढ करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग आणि परभणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं काल एआय तंत्रज्ञान कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्व माध्यमांच्या पत्रकारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, आदींची उपस्थिती होती.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि पत्रकारीता या विषयी मार्गदर्शन करताना जिल्हा माहिती अधिकारी देवेंद्रसिंह यांनी, कृत्रिम बुद्धिमत्ता- एआय तंत्रज्ञानाचा पत्रकारितेत वापर केल्यास वेळेत बातमी पूर्ण होऊ शकते, असं सांगत आधुनिक एआय तंत्रज्ञानाची ओळख करून दिली.

****

No comments: