Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 July 2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २१ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. २१ ऑगस्टपर्यंत
चालणाऱ्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या २१ बैठका होतील. संसदेचं हे पावसाळी
अधिवेशन देशासाठी एक अभिमानाचं सत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. एखादा विजय, आनंदोत्सव साजरा करण्याचं हे सत्र असून, आंतरराष्ट्रीय
अंतराळ स्थानकावर भारतानं पोहोचणं हे प्रत्येक नागरीकासाठी अभिमानाचा क्षण
असल्याचं पंतप्रधान म्हणाले. ऑपरेशन सिंदूर, देशाची
अर्थव्यवस्था आदी मुद्यांवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.
****
युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसने यावर्षी जूनमध्ये
२४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे १८ अब्ज व्यवहार नोंदवले आहेत. किरकोळ
डिजिटल व्यवहारांच्या वाढीबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं प्रकाशित केलेल्या
अहवालानुसार युपीआयमुळे भारतातल्या आर्थिक व्यवहार परिसंस्थेमध्ये क्रांती घडवून
आणली आहे. यामुळे दोन व्यक्तीदरम्यानचे व्यवहार सोपे झाले, तसंच
लाखो लहान व्यावसायिक कमीत कमी खर्चात डिजिटल पेमेंट स्वीकारण्यास सक्षम झाले
आहेत. १९१ दशलक्ष वापरकर्ते आणि ६५ दशलक्ष व्यापार्यांसह युपीआयमध्ये एकाच डिजिटल
चौकटीद्वारे ६७५ बँका जोडल्या आहेत.
****
गेल्या दशकभरात भारतातली सुमारे २४ कोटी जनता सर्व
प्रकारच्या गरिबीतून बाहेर पडली असून त्याच काळात सामाजिक सुरक्षा योजनांचा आवाका
दुपटीहून अधिक वाढला असल्याचं नीती आयोगाचे अध्यक्ष सुमन बेरी यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेत न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या एका
कार्यक्रमात ते बोलत होते. देशाने शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये केलेल्या
प्रगतीच्या मुळाशी सामाजिक सुरक्षा छत्र आणि विकासाभिमुख सुधारणा असल्याचं ते
यावेळी म्हणाले.
****
अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमान अपघात तपास
विभागाच्या प्राथमिक अहवालावरून कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही, असं मत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं.
गाझियाबाद इथल्या हिंडन विमानतळावरून देशातल्या १० प्रमुख शहरांसाठी थेट विमान
सेवा कालपासून सुरू झाली, या कार्यक्रमाच्या उद्घाटन
प्रसंगी ते बोलत होते. या शहरांमध्ये बंगरुळू, कोलकता, वाराणसी,
इंदूर, चेन्नई, अहमदाबाद,
पटणा, गोवा आणि मुंबई यांचा
समावेश आहे.
****
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध
योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीनं आणि परिणामकारकरीत्या देण्यासाठी देशभरात अॅग्रिस्टॅक
योजना राबवण्यात येत आहे. यात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने सर्वाधिक
शेतकर्यांची नोंदणी पूर्ण करत अग्रस्थान पटकावलं आहे, अशी
माहिती कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी दिली. राज्यात एक कोटी ७१ लाख दहा हजार
६९७ शेतकऱ्यांची बँक खाती आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात एक कोटी आठ लाख ९१ हजार
शेतकर्यांची म्हणजे सुमारे ६४ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी १६ जुलैअखेर पूर्ण झाली
आहे. महसूल आणि कृषी विभागानं त्यापैकी ९७ लाख ३९ हजार २९९ शेतकऱ्यांची नोंदणी
मंजूर केली आहे.
****
आषाढ महिन्यातली वद्य एकादशी आज आहे. त्यानिमित्त आळंदीला
यात्रा भरते,
आषाढ वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी, आपली वारी पूर्ण करण्यासाठी ही आळंदीची यात्रा करतात. संत तुकाराम महाराजांची
पालखी आपल्या परतीच्या प्रवासात काल आळंदीत आली. संत ज्ञानेश्वर माउलींच्या
साडेसातशेव्या जयंती आणि तुकोबांच्या ३७५व्या वैकुंठ गमन वर्षानिमित्तानं अनेक
वर्षांनी उभय संत भेटीचा योग यंदा विश्वस्तांच्या प्रयत्नातून आला आहे.
****
पालघर जिल्ह्यात एक झाड धरती आबासाठी या उपक्रमांतर्गत २०
हजार वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्प
कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळा, अनुदानित
आश्रम शाळा,
एकलव्य आदर्श निवासी शाळा आणि १६ शासकीय मुला मुलींची
वसतीगृह या ठिकाणी या उपक्रमाची सुरुवात काल करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment