Tuesday, 22 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित झालं. अकरा वाजता लोकसभेचं काम सुरू झाल्यावर लोकसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला मात्र, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधल्या मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण, या मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभा अध्यक्षांनी वारंवार कामकाज सुरळीत चालू राहू देण्याची विनंती करूनही विरोधकांचा गदारोळ न थांबल्यामुळे त्यांनी सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांनी बिहार मतदारयाद्यांच्या मुद्द्यासह इतर मागण्यांवर चर्चा करण्याचा आग्रह धरत गोंधळ केल्यामुळे उपाध्यक्ष हरवंश यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

****

इंडिया आघाडीच्या सदनाच्या नेत्यांची बैठक आज संसद भवन परिसरात झाली. यात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधीपक्ष नेते राहुल गांधी तसंच या आघाडीतल्या घटक पक्षांचे खासदार उपस्थित होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठीच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

*****

भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूनं प्रसार भारती आपल्या वृत्तविभागांमध्ये कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करणारी तंत्रं उपयोगात आणणार असल्याची माहिती प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एशिया पॅसिफिक इन्स्टिट्युट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेवेलपमेंट जनरल कॉन्फरन्सचे अध्यक्ष गौरव द्विवेदी यांनी दिली. कंबोडियात सिएम रीप इथं सुरू असलेल्या विसाव्या आशिया माध्यम परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. झपाट्यानं विकसित होत असलेलं कृत्रीम बुद्धिमतेचं तंत्रज्ञान, वृत्त आणि प्रसारण उद्योगाचा कायापालट करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

आज राष्ट्रीय ध्वज दिन आहे. १९४७ मध्ये संविधान सभेनं भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला, त्याचं स्मरण म्हणून दर वर्षी २२ जुलैला देशात हा दिवस साजरा केला जातो.

****

मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात परवा २४ तारखेला सुनावणी होणार आहे. या आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयानं काल नोंदवलं होतं.

****

संतोष देशमुख हत्या आणि इतर संबंधित प्रकरणात वाल्मिक कराड यानं दाखल केलेली दोषमुक्ती याचिका बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं आज फेटाळली. या प्रकरणात इतर आरोपींच्या वतीनं दोषमुक्ती अर्ज दाखल करण्यात आले असून त्यावर येत्या ४ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

****

विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मोबाईलवर रमी गेम खेळण्याचा विरोधकांचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावला आहे. ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असून त्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी आपण स्वतः शासनाला चौकशीसाठी पत्र देणार असल्याचंही कोकाटे यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर सविता पानट यांचं आज निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या होत्या. डॉ. सविता पानट यांचा शहरातील सामाजिक-शैक्षणिक-साहित्यिक चळवळीशी संबंध होता. शहर आणि राज्य पातळीवरील गायनेकॉलॉजीकल सोसायटीच्या तसंच शहरातल्या प्रसिद्ध अनंत विद्यामंदिर प्रशालेच्या आणि अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या त्या पदाधिकारी होत्या. डॉ. पानट या ‘साकार’ या अनाथ बाळांचं दत्तक प्रक्रियेद्वारे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्य, आणि २५ वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.

****

नक्शा या प्रकल्पाअंतर्गत कन्नड नगरपालिका हद्दीत राबवण्यात येत असलेल्या पथदर्शी प्रकल्पात ड्रोनद्वारे जमिनीचं सर्वेक्षण झालं असून, आता मालमत्ताधारकांनी भूमापनासाठी सहकार्य करावं, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. भूमापनानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाला प्रॉपर्टी कार्ड आणि सनद दिली जाणार असून, हे काम २६ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंढरपूर इथल्या आषाढी वारी सोहळ्यात सहभागी झालेली पैठण इथली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी काल परतली. पैठण शहरात पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. नाथांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

****

मराठवाड्यात अनेक भागात आज सकाळपासून पाऊस सुरु आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 December 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत...