Tuesday, 22 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

·      अपाचे हेलिकॉप्टरची पहिली खेप भारतात दाखल-वायूदलाच्या क्षमतेत मोठी वाढ

·      गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन तसंच भूमिपूजन

·      राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी योजना’ जाहीर-शासन निर्णय जारी

आणि

·      परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस-जनजीवन विस्कळीत

****

विविध मुद्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज सलग दुसऱ्या दिवशी बाधित झालं. लोकसभेत काम सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधल्या मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण, या मुद्यांवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. वारंवार विनंती करूनही गदारोळ न थांबल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज आधी दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

राज्यसभेतही विरोधकांनी याच मागण्यांसाठी गदारोळ केल्यामुळे सभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

****

दरम्यान, राष्ट्रीय दिव्यांगता सल्लागार मंडळ तसंच भारतीय पुनर्वसन परिषदेवर प्रत्येकी दोन सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव लोकसभेत आज आवाजी मतदानानं संमत झाला.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा प्रकृतीच्या कारणावरून दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत.

****

इंडिया आघाडीच्या सदनाच्या नेत्यांची आज संसद भवन परिसरात बैठक झाली. संसदेच्या चालू अधिवेशनासाठीच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

अमेरिकेच्या अपाचे हेलिकॉप्टरची पहिली खेप आज भारतात पोहोचली. या टप्प्यात तीन हेलिकॉप्टर्स आज वायूसेनेच्या ताफ्यात सामील झाले. शस्त्रांचा मारा करण्याची प्रचंड क्षमता आणि अत्यंत प्रगत युद्ध क्षमतांमुळे या हेलिकॉप्टर्सना हवेतले रणगाडे असं म्हटलं जातं. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय वायुदलाच्या ताकदीत भर पडणार आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं. यात एम टी पी ए स्टील प्रकल्प, कोनसरी इथलं शंभर खाटांचं रुग्णालय, सी बी एस ई शाळेची पायाभरणी, सोमनपल्ली इथं लॉयड्स टाऊनशिप, हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलाईन आदी उपक्रमांचा समावेश आहे. गडचिरोलीच्या जल, जमीन आणि जंगलाच्या संगोपनाचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यातल्या सर्व मंडलांमध्ये महारक्तदानाचा उपक्रम राबवण्यात आला. यातून एक हजारहून जास्त मंडलांमधून एक लाखांहून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्यात आलं.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमातून साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी योजना’ जाहीर केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या योजनेत शेती क्षेत्रात दरवर्षी तब्बल पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक होणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं. याबाबत अधिक माहिती देतांना कोकाटे म्हणाले

बाईट - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

 

विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मोबाईलवर रमी गेम खेळण्याचा विरोधकांचा आरोप कोकाटे यांनी फेटाळून लावला आहे. आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असून, यासंदर्भात आपण स्वतः शासनाला चौकशीसाठी पत्र देणार असल्याचंही कोकाटे यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांसाठी विमा नोंदणी राज्यात सुरू झाली आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ही आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेण्याचं आवाहन भारतीय कृषी विमा कंपनीनं केलं आहे.

****

मराठवाड्यात अनेक भागात आज सकाळपासून पाऊस सुरु आहे. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात आज सकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाला. कासापुरी महसूल मंडळात सर्वाधिक २१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, पाथरी तालुक्यातल्या चारही महसूल मंडळात अतिवृष्टी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गोदावरी नदीवरच्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून गोदावरी नदीत विसर्ग सुरू असून, नदी-नाल्यांना पूर आले आहेत. हादगाव इथे घरांमध्ये पाणी शिरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या बेरडा इथल्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. या मंदिरात अडकलेल्या तीन जणांची प्रशासनाच्या पथकाने सुटका केली.

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव या जिल्ह्यांतही आज पाऊस सुरु आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशात २५ वा क्रमांक मिळवला आहे. उघड्यावर शौचमुक्त शहरे या श्रेणीमध्येही वॉटर प्लस, हे सर्वोच्च मानांकन शहराला मिळालं आहे. याशिवाय, कचरामुक्त शहर या श्रेणीमध्ये शहराला एक स्टार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत, देशात पहिल्या दहा शहरात येण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल, असं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी.श्रीकांत यांनी म्हटलं आहे.

****

आकाशवाणीचं मुंबई केंद्र उद्या आपला ९८ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या केंद्राच्या वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत

रेडिओ निर्मितीच्या प्रयत्नात १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मार्कोनीला यश मिळालं, आणि २० वं शतक उजाडता उजाडता, जगभरात रेडिओचा आवाज घुमू लागला. लवकरच भारतातही रेडिओचा प्रवेश झाला, आणि जून १९२३ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबस इतर रेडिओ क्लबच्या कार्यक्रमांचं प्रसारण सुरू झालं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीला मुंबई आणि कोलकाता इथं रेडिओ केंद्र चालवण्याची परवानगी मिळाली, आणि २३ जुलै १९२७ रोजी भारतात सर्वप्रथ मुंबईत रेडिओ केंद्राची स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत हे केंद्र अव्याहतपणे माहिती आणि मनोरंजन क्षेत्रात मोलाचं योगदान देतंय. बहुजन हिताय-बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य अंगीकारून अस्मिता, एफ एम रेनबो, एफ एम गोल्ड आणि सर्वांच्या मनामनात स्थान मिळवलेलं विविध भारती, अशा चार वाहिन्यांवरून अनेकविध कार्यक्रमांचं प्रसारण या केंद्रावरून दररोज सुरू आहे.

हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी, छत्रपती संभाजीनगर

 

मुंबई केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. त्यामुळे आमच्या केंद्रावरचं संध्याकाळचं बातमीपत्र उद्या संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांऐवजी, चार वाजून वीस मिनिटांनी प्रसारित होणार आहे.

****

बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय आणि पशुधन प्रक्षेत्र उभारणीसाठी राज्य शासनाने मौजे लोणी इथे २२ एकर तर मौजे परळी इथे ५० एकर, अशी एकूण ७२ एकर शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून दिली आहे. नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत हे महाविद्यालय उभारलं जाणार आहे.

****

धाराशिव इथल्या एस टीच्या विभागीय कार्यालयातला स्थापत्य अभियंता शशिकांत उबाळे याला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं आज अटक केली. वाहनतळाच्या जागेचा ताबा देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

No comments: