Tuesday, 22 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 July 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जूलै २०२ सकाळी .०० वाजता

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत दोन महत्त्वाची विधेयकं सादर होणार आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल गोवा विधानसभा क्षेत्रातील अनुसूचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्वासंदर्भातलं विधेयक मांडणार आहेत, तर राज्यसभेत केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, समुद्रामार्गे माल वाहतुकीसंबंधीचं विधेयक सादर करणार आहेत. हे विधेयक वाहकांची जबाबदारी, अधिकार यामध्ये स्पष्टता आणून समुद्री वाहतुकीत सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यास मदत करणार आहे.

****

महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचं केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काल सांस्कृतिक कार्य विभाग, पुण्यातील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबईतील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला; त्यावेळी ते बोलत होते. क्रिएटर्स इकॉनॉमीच्या विकासासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशानं हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.

****

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी युवकांना सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन विभागाने मुंबईतल्या पवई इथल्या आयआयटी संस्थेबरोबर सामंजस्य करार केला. या अभ्यासक्रमामुळे तरुणांच्या क्षमतांमध्ये वाढ होणार असून त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

****

मुंबईत गोरेगाव इथं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मोफत डायलिसिस सेंटरचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शासनाच्या या योजना उपक्रमाबरोबरच सामान्य माणसाला अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर सविता पानट यांचं आज निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेल्या आठवड्यात त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. डॉ. सविता पानट यांचा शहरातील सामाजिक-शैक्षणिक-साहित्यिक चळवळीशी संबंध होता. शहर आणि राज्य पातळीवरील गायनेकॉलॉजीकल सोसायटीच्या तसंच शहरातल्या प्रसिद्ध अनंत विद्यामंदिर प्रशालेच्या आणि अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या त्या पदाधिकारी होत्या. डॉ. पानट या ‘साकार’ या अनाथ बाळांचं दत्तक प्रक्रियेद्वारे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्य, आणि २५ वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात मर्यादेपेक्षा जास्त गौण खनिज उपसा केल्यापोटी महसूल विभागाने १५ स्टोन क्रेशर मालकांना ४० कोटी २१ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवार्इची नोटीस देऊन ९ वर्ष उलटून गेले आहेत. याबाबत जिल्हा गौण खनिज अधिकारी यांच्या उपस्थितीत काल प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली.

****

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत पोहोचलेली ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. रॅपिड टायब्रेक मध्ये दिव्यानं आपल्याच देशाची ग्रँड मास्टर हरिका द्रोणवल्लीचा २-० असा पराभव केला. आता ती अंतिम चारच्या लढतीत आपल्याच देशाची ग्रँड मास्टर कोनेरू हम्पीसोबत सामील झाली असून, उपांत्य फेरीत दिव्याचा सामना चीनच्या ग्रँड मास्टर तानझोंगीशी होणार आहे. तर आज संध्याकाळी हम्पीचा सामना दुसरी चिनी ग्रँड मास्टर लेई टिंगजी हिच्याशी होणार आहे.

****

जवळपास आठवडाभराच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. आज पहाटेपासूनच अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू.

हिंगोली जिल्ह्यात, विशेषतः विदर्भात, सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सेनगाव तालुक्यातल्या बेरडा इथल्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या मंदिरात तीन जण अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी प्रशासनाचं पथक बेरडा गावाकडे रवाना झालं आहे. तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाअभावी जिल्ह्यात खरिपाची पिके सुकत होती. जिल्ह्यात अद्यापही २३ जल प्रकल्प कोरडेच आहेत. नांदेड शहराला पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा आहे.

जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहर तसंच जिल्ह्यातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे.

धाराशिव शहर आणि परिसरातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून, वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर सह अनेक तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातल्या ४१ लघु सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ ३६ टक्केच पाणीसाठा आहे.

****

No comments: