Wednesday, 23 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेचं काम सुरू झाल्यावर लोकसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला मात्र, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधल्या मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण, या मुद्द्यांवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. विरोधकांचं फलक झळकावणं, तसंच कामकाजात व्यत्यय आणण्यावरुन अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी वारंवार कामकाज सुरळीत चालू राहू देण्याची विनंती करूनही विरोधकांचा गदारोळ न थांबल्यामुळे सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेत आज विरोधकांनी बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव उपसभापती हरीवंश यांनी फेटाळून लावला. त्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

९८ वा भारतीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. २३ जुलै १९२७ रोजी मुंबई केंद्राची स्थापना होऊन प्रसारण सुरू झालं. तेव्हापासून हा प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी आकाशवाणीवरुन दिलेल्या संदेशात देशातल्या नागरीकांना प्रसारण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वर्षाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण राष्ट्राची आवाज असलेल्या आकाशवाणीच्या ९० वर्षांच्या पर्वाच्या उंबरठ्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारण दिनानिमित्त दिलेल्या संदेशात, गेल्या नऊ दशकांपासून आकाशवाणीने माहिती, शिक्षण आणि निरोगी मनोरंजन देत श्रोत्यांशी नातं जपल्याचं सांगितल. हा राष्ट्रीय ठेवा आजही तितक्याच ताकदीने चालत आहे, काळानुसार बदलत आहे आणि श्रोत्यांना गुंतवून ठेवत असल्याचं ते म्हणाले. २३ जुलै २०२७ रोजी भारतातल्या पहिल्या रेडिओ प्रसारणाच्या शताब्दी वर्षाचा उत्सव साजरा करू, असंही त्यांनी सांगितलं.

आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालिवाल गौर यांनी प्रसारण दिनाच्या शुभेच्छा देताना, आकाशवाणीमध्ये गेल्या अनेक वर्षात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. अनेक वर्षांपासून आकाशवाणी आजही विश्वासार्ह माध्यम असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे. टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला ज्वाला देणारे अग्रणी नेते होते, ज्ञान, सेवा आणि राष्ट्रप्रेमावर विश्वास ठेवणारे थोर विचारवंत म्हणूनही ते नेहमी स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही लोकमान्य टिळकांना अभिवादन केलं आहे.

****

महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात येत आहे. चंद्रशेखर आझाद यांचं शौर्य, धैर्य आणि बलिदान अजरामर आहे. स्वातंत्र्यलढ्यातलं त्यांचं योगदान अमूल्य असून, आजच्या तरुणांना अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय सिकलसेल अभियानांतर्गत सहा कोटी व्यक्तींची सिकलसेल आजारासाठी तपासणी पूर्ण झाली आहे. यामधून दोन लाख १५ हजार रुग्ण आणि १६ लाखांहून अधिक वाहकांची ओळख पटली असून, सिकलसेल आजाराचा वेळेवर शोध आणि उपचारासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांनी लक्ष्याच्या तुलनेत सिकलसेल तपासणीत लक्षणीय प्रगती केली आहे. तर ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वाधिक सिकलसेल रुग्ण आढळले आहेत.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.  भायगव्हाण, खापरदेव, हिवरा, बाचेगाव आणि शहागड इथं रस्त्यांवरील पूल आणि नाले पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून, घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळे  सोयाबीन, तूर यासह अनेक शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून, पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा भागात घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे, तिरुपती-अदिलाबाद-तिरुपती कृष्णा एक्सप्रेस १३ ते २० ऑगस्टदरम्यान तर जालना-तिरुपती-जालना विशेष एक्सप्रेस १८ आणि १९ ऑगस्ट या तारखांना रद्द करण्यात आली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना येत्या २५ तारखेपर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन संकेतस्थळ तसंच नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य यावर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

 

No comments: