Wednesday, 23 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.07.2025 रोजीचे सायंकाळी 04.20 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 July 2025

Time 16.20 to 16.30

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जूलै २०२५ सायंकाळी ४.२०

****

·      उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू

·      सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर कठोर कारवाईची भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मागणी

·      सार्वजनिक गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन-राज्य शासनाकडून मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

·      मराठवाड्यातल्या धरणांमध्ये सरासरी ४८ टक्के पाणीसाठा

आणि

·      तेंडुलकर अँडरसन मालिकेत चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याला प्रारंभ

****

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच्या तयारीचा भाग म्हणून राज्यसभा आणि लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या मतदार संघांची तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निवडीला अंतिम स्वरुप देणं आदी कामं सुरू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लवकरच उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची अधिकृत तारीख घोषित केली जाईल, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून अचानक राजीनामा दिल्यानं, हे पद रिक्त झालं आहे.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीनंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज आज सलग तिसऱ्या दिवशीही बाधित झालं. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच, बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण विषयावर विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी केली.  मात्र सभापतींनी विहित नियमानुसार चर्चा होईल, असं सांगितलं. त्यावर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापतींनी सभागृहाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत, नंतर दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

राज्यसभेतही विरोधी पक्षांनी बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण विषयावर चर्चेची मागणी करत घोषणाबाजी केली. या विषयावर शून्य प्रहरात चर्चा करण्याचं आवाहन उपसभापती हरिवंश यांनी केलं. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत, नंतर दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित केलं. 

****

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक तसंच राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंध विधेयक सादर केलं. क्रीडा व्यवस्थापनात निष्पक्षता तसंच नैतिकतेला चालना देणं, हा या दोन्ही विधेयकांचा उद्देश आहे.

****

राष्ट्रीय प्रसारण दिन आज साजरा होत आहे. भारतात सर्वप्रथम २३ जुलै १९२७ रोजी मुंबई केंद्राची स्थापना होऊन प्रसारण सुरू झालं. तेव्हापासून हा प्रसारण दिवस साजरा केला जातो. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी आकाशवाणीवरुन दिलेल्या संदेशात सर्व श्रोत्यांना प्रसारण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आकाशवाणीने फक्त प्रसारण केलं नाही, तर एका संस्कृतीचा पाया रचल्याची भावना सहगल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले

बाईट -  नवनीत सेहगल, अध्यक्ष, प्रसार भारती

 

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात, आकाशवाणीने श्रोत्यांशी नातं जपल्याचं सांगत, हा राष्ट्रीय ठेवा आजही तितक्याच ताकदीने चालत आहे, काळानुसार बदलत आहे आणि श्रोत्यांना गुंतवून ठेवत असल्याचं म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२४ वा भाग असेल.

****

दरम्यान, पंतप्रधान आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना झाले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत; तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही ते भेट घेतील. २६ जुलैला मालदीवच्या ६०व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.

****

सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारताने केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी, बहुपक्षीयता आणि वादांचे शांततापूर्ण निराकरण या विषयावरच्या खुल्या चर्चेत ही मागणी नोंदवली. ऑपरेशन सिंदूर संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यांना नकार देत, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांच्या विनंतीवरून ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलं, असंही हरिश यांनी स्पष्टपणे नमूद केलं. 

****

स्वातंत्र लढ्यातले थोर सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसंच थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात लोकमान्य टिळकांनी देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत चेतवली. ज्ञानाच्या बळावर आणि लोकसेवेवर दृढ विश्वास असलेले ते नेते होते, असं म्हटलं आहे. आझाद हे अतुलनीय धैर्य आणि शौर्याचं मूर्तिमंत प्रतीक असून, स्वातंत्र्यलढ्यातली त्यांची भूमिका सदैव प्रेरणादायी असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मंत्रालयात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातही टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने पैठण गेट परिसरात टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहायक आयुक्त रमेश मोरे यांच्यासह अनेकांनी यावेळी उपस्थित राहून टिळकांना आदरांजली अर्पण केली. 

****

संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माला वैश्विक धर्माचं स्वरूप देत, वारकरी विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने फडणवीस आज पंढरपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. तत्पूर्वी, फडणवीस यांनी विठ्ठल मंदिरात संत नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि विधिवत पूजन करून महाआरती केली. श्री संत चोखामेळा यांची समाधी तसंच श्री विठ्ठल-रुक्मिणीचंही मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून माहिती घेतली. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

****

पर्यावरणाचा समतोल राखत विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेशमुर्ती कृत्रिम तलावात तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती या परंपरागत समुद्रात विसर्जन करण्यात येतील, आणि पर्यावरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असं प्रतिज्ञापत्र आज राज्य शासनाने आज मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. न्यायालयाने पीओपी वापरावर घालण्यात आलेली बंदी उठवल्यानंतर मोठ्या गणेशमूर्ती कुठे विसर्जन करणार याबाबत राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. त्यानुसातर डॉ. काकोडकर यांच्या समितीच्या अहवालानुसार संबंधित प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात खामगांव शिवारात गोदावरी नदीपात्रामध्ये होणारा अवैध वाळू उपसा थांबवत पोलिसांनी चार ट्रक्टरसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करत एकास ताब्यात घेतलं आहे. पहाटे ४ वाजता केलेल्या या कारवाईत प्रितम कांडेकर राहणार गेवराई यास अटक केली आहे.

****

जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. भायगव्हाण, खापरदेव, हिवरा, बाचेगाव आणि शहागड इथं रस्त्यांवरील पूल आणि नाले पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात काल झालेल्या ढगफुटीसदृश्य पाऊसामुळे नदी नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक शेतातल्या पिकांचं तसंच घरांचंही नुकसान झालं आहे. दरम्यान, जिल्ह्यातल्या मन प्रकल्पातूकाही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

****

मराठवाड्यातल्या विविध जलाशयांमध्ये आज ४८ टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या जलसाठ्याच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे चार पट अधिक आहे. विभागात जायकवाडी धरणात ७८ टक्के, सिद्धेश्वर ३२ टक्के, येलदरी ६१, धनेगाव ५७, माजलगाव साडे बारा टक्के, मांजरा २५, विष्णुपुरी २३, सीना कोळेगाव ४२, तर निम्न दुधना धरणातला पाणीसाठा सुमारे ४९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

****

मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर इथं खेळवण्यात येत असलेल्या चौथा कसोटी सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारतीय संघाच्या नऊ षटकात बिनबाद २५ धावा झाल्या आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या एक - दोननं पिछाडीवर आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या नवगण राजुरी इथं गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदर पिस्तुल पुरवणाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: