Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 24
July 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जूलै २०२५ दुपारी १.०० वा.
****
विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे
लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. आज सकाळी सदनाचं कामकाज
सुरू झालं तेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केल्यानंतर
विरोधी सदस्यांनी बिहारमधल्या मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण आणि इतर मुद्यांवर चर्चा
करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. बिर्ला यांनी विरोधकांचं वर्तन सभागृहाच्या प्रतिष्ठेला
अनुसरून नसल्याचं सांगत, कामकाजात व्यत्यय निर्माण करणं आणि फलक दाखवणं याबद्दल चिंता
व्यक्त केली. तसंच त्यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सदस्यांना आपल्या मुद्द्यांवर
बोलण्याची परवानगी देण्याचं आश्वासनही दिलं, मात्र तरीही विरोधकांचा गदारोळ सुरुच राहील्यानं कामकाज स्थगित
झालं.
राज्यसभेत आज राष्ट्रपतींकडून नियुक्त विशेष सरकारी वकील
उज्ज्वल निकम यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. तसंच सदनात आज कार्यकाळ पूर्ण झालेल्या
सदस्यांना निरोप देण्यात आला.
****
मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये २००६ साली झालेल्या
बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या
निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र
सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं
सर्व आरोपींना नोटीसा जारी केल्या आहेत. या आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात
तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात नोंदवलं
होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौर्यावर ब्रिटनला
पोहोचले. पंतप्रधान आणि ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा
करणार असून, या भेटीदरम्यान भारत आणि इंग्लंड
धोरणात्मक संबंधांना नवी गती देण्यावर चर्चा होणार आहे. ब्रिटन मुक्त व्यापार कराराची
औपचारिकता ही मोदी यांच्या दौर्याचा एक प्रमुख निष्कर्ष ठरणार आहे. पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या
संदेशात लंडनमधल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले. ही भेट
दोन्ही राष्ट्रांमध्ये आर्थिक भागीदारी वाढवण्यात महत्त्वाची ठरेल. समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देणं, यावर लक्ष केंद्रीत असेल, जागतिक प्रगतीसाठी भारत-ब्रिटनची मजबूत मैत्री आवश्यक असल्याचं
पंतप्रधान म्हणाले.
****
श्री अमरनाथ यात्रा सुरळीत आणि शांततेत सुरू असून, यात्रेदरम्यान आतापर्यंत तीन लाख ४२ हजारांहून अधिक यात्रेकरूंनी
पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. आज जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवास कॅम्पमधून
३ हजार ५०० यात्रेकरूंचा आणखी एक जथ्था काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला. यावर्षी साडे
तीन लाख यात्रेकरूंचा आकडा आजच ओलांडण्याची शक्यता असून, ही यात्रा पूर्ण होण्यासाठी अजून १७ दिवस शिल्लक असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
गेल्या काही वर्षात राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था
- आयटीआय ची अवस्था बिकट झाली आहे. या व्यवसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी
विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करुन वर्षभरात आयटीआयला ऊर्जितावस्था आणणार असल्याचं
कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी
सांगितलं. ते काल सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आयटीआयमध्ये कंत्राटी शिक्षक
आणि इतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याबाबत लवकरच धोरण आखणार असल्याचंही लोढा यांनी
सांगितलं.
****
पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या
वतीनं देण्यात येणारा लीलाताई भागवत राज्यस्तरीय पुरस्कार, बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार इथले साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव
यांच्या ‘एकविसाव्या शतकारंभीचे बालसाहित्य’ या समीक्षा ग्रंथास जाहीर झाला आहे. येत्या
दोन ऑगस्टला पुण्यात ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार
प्रदान करण्यात येणार आहे.
****
तुळजापूर इथं यंदाचा नवरात्र महोत्सव स्वच्छता आणि आरोग्य
या संकल्पनेवर आधारित असेल, भाविकांच्या सेवेसाठी कोणतीही कमतरता भासू नये, असं आवाहन धाराशिव जिल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण
पुजार यांनी केलं आहे. काल तुळजापूर इथं शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य विभागातर्फे महोत्सव काळात मोठ्या
प्रमाणात प्रथमोपचार केंद्रांची स्थापना आणि आपत्कालीन रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याच्या
सुचना देण्यात आल्या असून, स्वच्छता, पाणी आणि शौचालयांच्या सुविधा पुरवण्यासाठी तुळजापूर नगरपालिका
नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
क्रिकेट
भारत आणि इंग्लंड दरम्यान मँचेस्टर इथं सुरु असलेल्या
चौथ्या कसोटी सामन्यात आज भारत चार बाद २६४ धावांपासून पुढे खेळेल. दुपारी साडे तीन
वाजता सामन्याला सुरुवात होईल. रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी १९ धावांवर
खेळत आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जुलैला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२४
वा भाग असेल.
****
No comments:
Post a Comment