Thursday, 24 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.20 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      भारत आणि ब्रिटन दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

·      राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर-दोन वर्षात भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था होणार-सहकारमंत्र्यांचा पुनरुच्चार

·      रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या सुमारे ५० कंपन्यांवर ईडीचं धाडसत्र

आणि

·      पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य पुरस्‍कारांची घोषणा

****

भारत आणि ब्रिटन दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज लंडन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. हा करार भारतातले शेतकरी, मासेमार, सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योजक तसंच तरुणांसाठी विशेष लाभदायक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ आज जाहीर केलं. दिल्ली इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हे धोरण जारी करण्यात आलं. सहकार हा विचार समोर ठेवून हे धोरण ठरवण्यात आलं असून, विकसित भारताच्या संकल्पाला हे धोरण सहायकारी ठरेल, तसंच २०२७ मध्ये भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले

बाईट – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी संसद भवन परिसरात बिहारच्या मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेविरोधात निदर्शनं केली. संसदेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.

दरम्यान विरोधकांच्या गदारोळामुळे पावसाळी अधिवेशनात आज सलग चौथ्या दिवशी कामकाज बाधित झालं. कामकाजात वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी दोन वाजेनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

दरम्यान, राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी नवनियुक्त सदस्य विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना सदस्यत्वाची शपथ दिली. निकम यांनी मराठीतून शपथ घेतली.

****

आर्थिक फसवणूक आणि काळा पैसा वैध प्रकरणी रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या सुमारे ५० कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय-ईडीने आज छापे घातले. ईडीच्या प्राथमिक चौकशीत २०१७ ते २०१९ दरम्यान एका खासगी बँकेतून तीन हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या अपहाराचं प्रकरण समोर आलं आहे. एका सुनियोजित कारस्थानाच्या माध्यमातून बँका, भागधारक, गुंतवणूकदार तसंच इतर सार्वजनिक संस्थांची फसवणूक करत, जनतेच्या पैशाची अफरातफर केल्याचं, ईडीने म्हटलं आहे.

****

मुंबई उपनगरीय रेल्वेत २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.

****

राज्यात सहा फुटांहून मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जित करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पीठानं आज हे आदेश दिले. ही परवानगी केवळ याच वर्षासाठी असेल असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या आदेशाचं तंतोतत पालन करण्याच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत.

****

सर्व शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने सुयोग्य नियोजन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी, मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आणि पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी या विषयांचा आढावा घेतल्यानंतर भोयर बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम राबवण्यात येतो, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजने अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यात येणार असल्याचं डॉ. भोयर यांनी सांगितले.

****

पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा लीलाताई भागवत राज्यस्तरीय पुरस्कार, बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार इथले साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘एकविसाव्या शतकारंभीचे बालसाहित्य’ या समीक्षा ग्रंथास जाहीर झाला आहे. येत्या दोन ऑगस्टला पुण्यात ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य पुरस्‍कारांची घोषणा आज करण्यात आली. यावर्षीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य जीवन गौरव पुरस्‍कार कोल्‍हापूर इथले डॉ.सुनिलकुमार लवटे यांना जाहीर झाला आहे. राज्‍यस्तरीय उत्‍कृष्ट साहित्‍य पुरस्‍कार मुंबई इथल्या डॉ.मिनाक्षी पाटील, डॉ.एच व्‍ही देशपांडे यांना जाहीर झाला. राज्‍यस्तरीय नाट्यसेवा पुरस्‍कार दिलीप जगताप यांना, राज्‍यस्‍तरीय कलागौरव पुरस्‍कार अतांबर शिरढोणकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना जाहीर झाला आहे. येत्या आठ ऑगस्‍ट रोजी प्रवरानगर इथं या पुरस्कारांचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं येत्या शनिवारी कारगिल विजय दिनी युद्धवीरांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. लष्कराच्या टी-55 रणगाड्याचं अनावरणही यावेळी करण्यात येणार आहे.

****

बीड इथं येत्या रविवारी, २७ जुलै रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मराठवाडा विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचं उद्धघाटन होणार आहे. मराठवाड्यातली महामंडळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता, हे कार्यालय होत असल्याचं महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील यांनी कळवलं आहे.

****

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उन्नतीने भारताच्याच पी व्ही सिंधूचा २१-१६, १९-२१, २१-१३ असा पराभव केला. याच स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचे सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा २१-१९, २१-१९ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उद्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना मलेशियाच्या जोडीसोबत होणार आहे.

****

क्रिकेट

भारत आणि इंग्लंड दरम्यान मँचेस्टर इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारतीय संघाने ६ बाद ३२१ धावा केल्या आहेत. आजचा खेळ सुरु झाल्यानंतर रविंद्र जडेजा २०, शार्दुल ठाकूर ४१ धावांवर बाद झाले. ऋषभ पंत ३९ तर वाशिंग्टन सुंदर २० धावांवर खेळत आहेत.

****

लातूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने केंद्र सरकारची आर्थिक समावेशकता मोहिम जिल्ह्यात ३० सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शून्य रक्कमेवर जनधन खाते उघडण्यासह केंद्र सरकारच्या बँकांमार्फेत राबवण्यात येणाऱ्या विमा आणि पेन्शनसह आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ ग्राहकांना देण्यात येणार आहेत,

****

एप्रिल आणि मे २०२५ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं, या नुकसानापोटी जिल्ह्यातल्या ११ हजार ७८८ शेकऱ्यांच्या ९८८ हेक्टर क्षेत्रावरची नुकसान भरपाई म्हणून ९ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

****

No comments: