Thursday, 24 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू

·      सार्वजनिक गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन-राज्य शासनाकडून मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

·      यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर

·      इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताच्या चार बाद २६४ धावा

आणि

·      मराठवाड्यातल्या धरणांमध्ये सरासरी ४८ टक्के पाणीसाठा

****

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच्या तयारीचा भाग म्हणून राज्यसभा आणि लोकसभेतल्या नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या मतदार संघांची तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निवडीला अंतिम स्वरुप देणं आदी कामं सुरू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लवकरच उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची अधिकृत तारीख घोषित केली जाईल, असं आयोगानं स्पष्ट केलं. जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून अचानक राजीनामा दिल्यानं, हे पद रिक्त झालं आहे.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीनंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज काल सलग तिसऱ्या दिवशीही बाधित झालं. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच, बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण विषयावर विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी विहित नियमानुसार चर्चा होईल, असं सांगितलं. त्यावर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेतही याच मुद्यावरुन विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक तसंच राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंध विधेयक सादर केलं. क्रीडा व्यवस्थापनात निष्पक्षता तसंच नैतिकतेला चालना देणं, हा या दोन्ही विधेयकांचा उद्देश आहे.

****

पर्यावरणाचा समतोल राखत विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेशमूर्ती कृत्रिम तलावात, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती या परंपरागत समुद्रात विसर्जन करण्यात येतील, आणि पर्यावरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असं प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. न्यायालयाने पीओपी वापरावर घालण्यात आलेली बंदी उठवल्यानंतर मोठ्या गणेशमूर्ती कुठे विसर्जन करणार याबाबत राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार डॉ. काकोडकर यांच्या समितीच्या अहवालानुसार संबंधित प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटीव्ह पतसंस्था प्रकरणी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने, सक्तवसुली संचालनालय-ईडीसह केंद्र सरकार आणि राज्यसरकारला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहे. या पतसंस्थेच्या ११ ठेवीदारांनी आपली फसवणूक झाल्यासंदर्भात खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी काल झालेल्या प्राथमिक सुनावणीत न्यायालयाने केंद्र तसंच राज्य सरकारसह ईडीला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

****

संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माला वैश्विक धर्माचं स्वरूप देत, वारकरी विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने फडणवीस यांनी काल पंढरपूर इथं विठ्ठल मंदिरात संत नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी, नामदेव महाराजांच्या कार्याला उजाळा दिला,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचं स्मारक उभारतांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी करून माहिती घेतली.

****

महाराष्ट्र रस्ते संपर्क साखळी योजना प्रत्यक्षात राबवण्याची सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून, या योजनेसाठी महसूल विभाग सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली आहे. काल मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात प्रत्येक महसूली विभागातून दुसऱ्या राज्याशी थेट जोडणारा १५० ते २०० किलोमीटर लांबीचा नवीन आंतरराज्य महामार्ग प्रस्तावित करावा, यासाठी मेगा आराखडा तयार करण्याची सूचना बावनकुळे यांनी केली.

****

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या एक ऑगस्ट रोजी टिळकांच्या पुण्यतिथीला पुण्यात टिळक स्मारक मंदिरात गडकरी यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात राज्यातली पहिली हळद उत्पादक महिला शेतकऱ्यांची सहकारी संस्था स्थापन होणार असून, हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत ३०० महिला शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा परिषद गटनिहाय महिलांना खेळते भांडवल उपलब्ध करून दिलं जाणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

बाईट - रमेश कदम, पीटीसी, हिंगोली

****

उद्यापासून सुरू होत असलेल्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल वेरुळ इथं घृष्णेश्वर मंदिर परिसरात आढावा बैठक घेतली. भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मंदिरात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार असून, भाविकांना आपत्कालीन आरोग्य सुविधा तसंच इतर मदतीसाठी या केंद्रातून मार्गदर्शन मिळणार आहे. अनधिकृत किंवा अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

जॉर्जियात बटुमी इथं सुर असलेल्या फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीत तीने चीनच्या खेळाडुचा पराभव केला. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी दिव्या ही पहिली भारतीय ग्रँड मास्टर ठरली असून, तीने २०२६ मध्ये होणार्या कँडिडेट्स टूर्नामेंट मध्ये देखील स्थान मिळवलं आहे. भारताच्या कोनेरु हंपी हिचा उपान्त्य फेरीतला सामना आज होणार आहे.

****

क्रिकेट

भारत आणि इंग्लंड दरम्यान मँचेस्टर इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात चार बाद २६४ धावा झाल्या. रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी १९ धावांवर खेळत आहेत. दरम्यान, फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या पायाला दुखपात झाली असून त्यावर उपचार सुरु असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या पुर्णा तालुक्यातल्या हायटेक निवासी शाळा प्रकरणी संस्थाचालक पती पत्नीला पूर्णा न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुलीच्या शाळा सोडण्याचा दाखला मागण्यासाठी गेलेले जगन्नाथ हेडगे यांचा संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.

****

बीड जिल्ह्यात खामगांव शिवारात गोदावरी नदीपात्रामध्ये होणारा अवैध वाळू उपसा थांबवत पोलिसांनी प्रितम कांडेकर नावाच्या इसमास ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत चार ट्रॅक्टरसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातल्या विविध जलाशयांमध्ये ४८ टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला असून, जायकवाडी धरणाचा पाणी साठा ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

****

No comments: