Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या
दौऱ्यावर ब्रिटनला पोहोचले. ते ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय
चर्चा करणार असून, या भेटीदरम्यान भारत
आणि इंग्लंड धोरणात्मक संबंधांना नवी गती देण्यावर चर्चा होणार आहे. ब्रिटन मुक्त व्यापार
कराराची औपचारिकता ही मोदी यांच्या दौर्याचा एक प्रमुख निष्कर्ष ठरणार आहे. पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात
लंडनमधल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले. ही भेट दोन्ही
राष्ट्रांमध्ये आर्थिक भागीदारी वाढवण्यात महत्त्वाची ठरेल. समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना
देणं, यावर लक्ष केंद्रीत असेल, जागतिक प्रगतीसाठी भारत-ब्रिटनची
मजबूत मैत्री आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
देशातल्या पहिल्या मानवी अंतराळ कार्यक्रम
गगनयानाच्या मानवी रेटेड प्रक्षेपण वहानाचा विकास आणि जमिनीवरची चाचणी पूर्ण झाली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जिंतेंद्र सिंह यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली.
२०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची स्थापना करणं आणि २०४० पर्यंत पहिला भारतीय चंद्रावर
पाठवणं, अशी देशाची दीर्घकालीन महत्वाकांक्षा
असल्याचं डॉ. सिंह यांनी सांगितलं.
****
धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांचा गरजू रुग्णांना प्रभावीपणे लाभ द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि
कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी
दिले आहेत. मुंबईत काल आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा
जोतिराव फुले जन आरोग्य योजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या कायद्यांअंतर्गत
नोंदणीकृत न झालेल्या रुग्णालयानी नोंदणी करुन घ्यावी, याकामी राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
राज्याच्या प्रगतीमध्ये सहकारी संस्थाचं
मोलाचं योगदान असून, देशाच्या सहकार क्षेत्रात
महाराष्ट्राचा ६० टक्के वाटा आहे, असं सहकार राज्यमंत्री
डॉ. पंकज भोयर यांनी सांगितलं. काल मुंबईत
यशवंतराव चव्हाण सेंटरमधे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनतर्फे २६वा वार्षिक
पारितोषिक वितरण समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक सहकारी संस्था काम करत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट
असून, अनेक संस्था शेतकऱ्यांसाठी शेती भवनची
निर्मिती, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विविध उपक्रम
राबवत असून हे कौतुकास्पद असल्याचं भोयर म्हणाले.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
वाढदिवसानिमित्त मंगळवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांनी दोन विश्व विक्रम प्रस्थापित
केले आहेत. या रक्तदान उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून, त्याबद्दल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या
प्रतिनिधींनी काल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सन्मानित केलं. एका दिवसात
एक हजार २२१ मंडलांमध्ये सर्वाधिक एक हजार ८८ रक्तदान शिबिर घेण्यात आले असून, सर्वाधिक ७८ हजार ३१३ युनिट्स रक्त
संकलन झालं.
****
कामातल्या अडचणी टाळून विविध योजनांचा
लाभ लाभार्थांपर्यंत पोहोचवा, असं अवाहन आमदार सुरेश धस यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या
आष्टी मतदारसंघातील पंचायत समिती आष्टी, शिरूर कासार आणि पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार
हमी योजना, सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या
कामांबाबत एकत्रित कार्यशाळा काल घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जलसिंचन विहीर, शेततळे, घरकुल यासारखी वैयक्तिक कामं प्रभावीपणे
पूर्ण करण्यात यावी, तसंच अनुसूचित जाती, भटक्या-विमुक्त आणि ओबीसी घटकातल्या
नागरिकांना प्राधान्याने शेळीपालन शेड देणं आवश्यक असल्याचं, धस यांनी सांगितलं.
****
हिंगोली इथं काल पंडित दीनदयाल उपाध्याय
रोजगार मेळावा घेण्यात आला, या मेळाव्यात राज्यातल्या
विविध नामांकित कंपनीच्या प्रतिनिधींनी ११२ उमेदवारांची निवड केली.
तुळजापूर इथंही मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला.
जिल्ह्यातले हजारो युवक स्वयंरोजगारातून यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येत असून, त्या माध्यमातून कुटुंबियांना आर्थिक
आधार लाभत असल्याचं, आमदार राणा जगजितसिंह
पाटील यावेळी म्हणाले.
****
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी
बीड शहर आणि ग्रामीण भागातल्या विकासकामांबाबत
काल बैठक घेतली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यावेळी उपस्थित होते. यावेळी अमृत पाणीपुरवठा, रस्ते विकास, जमीन संपादन आणि जलजीवन मिशनच्या
विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ग्रोमोअर
इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीकडून पोलिसांनी दिड कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाल्यानंतर, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी
काल पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. चांगल्या
परताव्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रोमोअर इन्व्हेस्टमेंट
फायनान्सच्या काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment