Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 July
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जुलै २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· भारत आणि ब्रिटन दरम्यान आर्थिक आणि मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी
· राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर-दोन वर्षात भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था होणार, सहकारमंत्र्यांचा पुनरुच्चार
· मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला
सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
· मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संरक्षण आणि सामरिक
अध्यासन केंद्र आणि मराठी भाषा विभागाचं उद्घाटन
आणि
· फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी कोनेरु हंपी आणि दिव्या
देशमुख यांच्यात लढत
****
भारत आणि ब्रिटन दरम्यान ऐतिहासिक आर्थिक आणि मुक्त व्यापार
करारावर शिक्कामोर्तब झालं आहे. काल लंडन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे
पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात
आली. हा करार भारतातले शेतकरी, मासेमार, सुक्ष्म लघू
आणि मध्यम उद्योजक तसंच तरुणांसाठी विशेष लाभदायक ठरेल, असा
विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, पंतप्रधान आज मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी,
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मालदीव्जची राजधानी माले पूर्णपणे तयार आहे.
ठिकठिकाणी तिरंगा ध्वज आणि प्रधानमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर झळकत आहेत. या भेटी
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीव्जचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइजु ‘Comprehensive Economic and Security Maritime Partnership’ च्या प्रगतीचा आढावा घेतील. यासह दोन्ही देशांमध्ये काही द्विपक्षीय करार
देखील होण्याची शक्यता आहे. भारताच्या मदतीने साकारलेल्या काही पायाभूत सुविधा
प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. उद्या मालदीव्जचा हिरक
महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याचे प्रमुख
पाहुणे असतील.
आकाशवाणी
बातम्यांसाठी मालदीव्जची राजधानी मालेहून जीवन भावसार
****
केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ काल जाहीर केलं.
दिल्ली इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हे धोरण
जारी करण्यात आलं. विकसित भारताच्या संकल्पाला हे धोरण सहायक ठरेल, तसंच
२०२७ मध्ये भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होईल, असा विश्वास शहा
यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले...
बाईट
- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काल सलग चौथ्या दिवशी कामकाज
बाधित झालं. कामकाजात वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी दोन
वाजेनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
दरम्यान, राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी
नवनियुक्त सदस्य विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना सदस्यत्वाची शपथ दिली. निकम यांनी
मराठीतून शपथ घेतली. कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा सदस्यांनाही राज्यसभेत काल निरोप देण्यात आला.
****
आर्थिक फसवणूक आणि काळा पैसा वैध प्रकरणी रिलायन्स अनिल
अंबानी समूहाच्या सुमारे ५० कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालय-ईडीने काल छापे घातले.
ईडीच्या प्राथमिक चौकशीत २०१७ ते २०१९ दरम्यान एका खासगी बँकेतून तीन हजार कोटी
रुपयांच्या कर्जाच्या अपहाराचं प्रकरण समोर आलं होतं, या
प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
****
मुंबई उपनगरीय रेल्वेत २००६ मध्ये झालेल्या साखळी
बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या सर्व १२ आरोपींची निर्दोष
मुक्तता करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या आरोपींना
पुन्हा तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.
****
राज्यात सहा फुटांहून मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात तसंच
नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.
मात्र ही परवानगी फक्त याच वर्षासाठी असेल असं या आदेशात स्पष्ट नमूद आहे.
राज्यातल्या सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या आदेशाचं तंतोतत
पालन करण्याच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथीत
अवमानकारक विधान केल्या प्रकरणी नाशिकच्या सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते खासदार
राहुल गांधी यांना काल जामीन मंजूर केला. या सुनावणीला गांधी दूरदृष्यप्रणालीच्या
माध्यमातून उपस्थित होते. गांधी यांनी हिंगोली इथं संबंधित वक्तव्य केलं होतं.
****
मराठी भाषेसोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान बाळगण्याची गरज, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल दिल्लीत इथं जवाहरलाल नेहरू
विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन
केंद्राची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य-संस्कृती
विशेष केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. मराठी किंवा इतर भाषा असा वाद नसून, मराठीसोबत भारतीय
भाषा अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं, ते
म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा
लीलाताई भागवत राज्यस्तरीय पुरस्कार, बीड जिल्ह्याच्या शिरूर
कासार इथले साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘एकविसाव्या शतकारंभीचे बालसाहित्य’
या समीक्षा ग्रंथास जाहीर झाला आहे. येत्या दोन ऑगस्टला पुण्यात हा पुरस्कार
प्रदान करण्यात येणार आहे.
****
जॉर्जियात बटुमी इथं सुरु असलेल्या फिडे महिला बुद्धीबळ
विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोनेरु हंपी आणि दिव्या देशमुख या दोन भारतीय
खेळाडुंमध्ये होणार आहे. उपान्त्य फेरीत दिव्यानं चीनच्या तान झोंगयी हिचा, तर
कोनेरु हंपीनं चीनच्याच लेई टिंगजी हिचा पराभव केला. अंतिम सामना उद्या होणार आहे.
****
क्रिकेट
मँचेस्टर इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात काल
दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडच्या पहिल्या डावात दोन बाद २२५ धावा झाल्या. त्याआधी भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडचा संघ
सध्या १३३ धावांनी पिछाडीवर आहे.
****
परभणी इथं काल अंगणवाडी सेविका, बालगृह
निरीक्षण गृह कर्मचाऱ्यांकरता बाल हक्क संरक्षणा संदर्भात कायदे विषयक प्रशिक्षण
कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विविध तज्ज्ञांनी उपस्थितांना अनेक विषयांवर
मार्गदर्शन केलं.
****
लातूर जिल्ह्यात केंद्र सरकारची आर्थिक समावेशकता मोहीम ३०
सप्टेंबर पर्यंत राबवण्यात येत आहे. या मोहिमेत जनधन खाते उघडण्यासह केंद्र
सरकारच्या विमा आणि पेन्शन योजनांसह विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ
ग्राहकांना देण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात एप्रिल आणि मे २०२५ या कालावधीत झालेल्या
अवकाळी पावसाच्या नुकसानापोटी ११ हजार ७८८ शेतकऱ्यांना ९८८ हेक्टर क्षेत्रावरची
नुकसान भरपाई म्हणून नऊ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं. ही रक्कम लवकरच
शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
दरम्यान, धाराशिव तहसील कार्यालयात आज सकाळी ११
वाजता सस्ती अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यातल्या सर्व शेतकरी
बांधवांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागात
नुकसानीचे पंचनामे करून केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत करावी, असे
आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांना दिले
आहेत, आमदार राजेश विटेकर यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या विष्णूपुरी प्रकल्पातच्या जलसाठ्यात
एकाच दिवसात ६० टक्के वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या
पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा आता सुमारे ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
हवामान
मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार
वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली
आहे.
****
No comments:
Post a Comment