Sunday, 20 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक २० जूलै २०२५ रोजीचे सायंकाळी ०६.१० वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सरकारचं सर्वपक्षीय बैठकीत आवाहन

·      ऑपरेशन सिंदूरसह इतर मुद्यांवर पंतप्रधानांनी निवेदन करण्याची विरोधी पक्षांची मागणी

·      मलेरिया प्रतिबंधक स्वदेशी लस संशोधन प्रगतीपथावर

आणि

·      उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या २१ बैठका होतील. या अधिवेशनात जनविश्वास सुधारणा विधेयक २०२५, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ सभागृहात चर्चेला येण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज नवी दिल्लीत संसद भवन इथं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका तसंच अधिवेशनात मांडू इच्छिणाऱ्या मुद्यांची चर्चा केली, असे संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

अधिवेशनात पंतप्रधानांनी संसदेत महत्त्वाच्या विषयांवर निवेदन द्यावं, अशी मागणी काँग्रेस पक्षाने या बैठकीत केल्याची माहिती गौरव गोगोई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाच विमानं पाडली गेल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यावर आणि पहलगाममधल्या सुरक्षेतल्या त्रुटीवर बोलावं, अशी मागणी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सरकारला केली आहे. तसंच अहमदाबाद विमान दुर्घटना, दिल्लीच्या मद्रासी कँपमधे बुलडोझर इत्यादी बाबींवर सरकारने स्पष्टीरण द्यावं असं खासदार संजय सिंह म्हणाले. तर बिजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा यांनी ओडिशात कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप बैठकीत केला. या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतले नेते जे पी नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरूगन उपस्थित होते. याशिवाय, काँग्रेसचे गौरव गोगोई, प्रमोद तिवारी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, द्रमुकचे तिरुची सिवा आणि टी आर बालु, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

****

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात रोकड सापडल्याच्या प्रकरणानंतर, त्यांना पदावरून हटवण्यासाठीच्या महाभियोग प्रस्तावावर सर्व राजकीय पक्षांनी स्वाक्षरी करणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. याबाबत आपण समन्वय साधत असून, विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्या पक्षांचे केवळ एकच खासदार आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधणार असून, त्यातून संसदेचं एकमत दिसून येईल असं ते म्हणाले.

****

भारतीय औषध संशोधन परिषद आणि राष्ट्रीय प्रतिकारशक्तीशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ संयुक्तपणे मलेरिया प्रतिबंधक लस विकसित करत आहेत. या लशीचे नाव ॲडफॅल्सीवॅक्स असं असून सध्या तिच्या चाचणीदरम्यानचे निकाल आशादायक असून लवकरच ती सार्वत्रिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संपूर्ण स्वदेशी संशोधनानं विकसित झालेल्या या लसीमुळे मलेरियाचा प्रसार कमी होईल तसंच मलेरिया निर्मूलनाला हातभार लागेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २३ ते २६ तारखेपर्यंत ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जात आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी २३ ते २४ जुलै दरम्यान ब्रिटनमध्ये असतील. पंतप्रधान मोदींचा हा ब्रिटनचा चौथा दौरा आहे.

मालदीवचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान २५ तारखेपासून मालदीवच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधानांचा मालदीवचा हा तिसरा दौरा आहे. मालदीवच्या स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

****

भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार, राज्याचे उपमुख्यमंत्री - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. श्री नामदेव महाराज यांच्या मंगळवारी होत असलेल्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, पंढरपूरच्या संत श्री नामदेव महाराज फड संस्थान आणि संत वंशज यांच्यातर्फे २४ जुलै रोजी आयोजित हा पुरस्कार प्रदान सोहळा पंढरपूर इथं होणार आहे. राज्यात संत शक्तीसह शासन सत्तेचा समन्वय साधत, वारकरी संप्रदाय सक्षमीकरण, कीर्तनकार गौरव, दिंड्यांना शासनमान्यता, आणि वारी प्रबोधन सेवा रथ यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे शिंदे यांनी समाजसेवा आणि अध्यात्माची पताका उंचावली आहे. संत नामदेव महाराज जसे पंजाब, महाराष्ट्र, आणि उत्तर भारतात आपली संत परंपरा पोहचवणारे झाले. या प्रेरणेतूनच एकनाथ शिंदे यांनी आजच्या युगात ‘संत विचारांचा शासनसत्तेतून जागर’ घडवल्यानं या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं सोहळ्याचे प्रमुख निवृत्तीमहाराज नामदास यांनी सांगितलं.

****

महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा तर प्रशासक हे म्होरके असल्याचा आरोप विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला.

राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीने महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. सभागृहात ऑनलाईन गेम खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली. विधीमंडळ अधिवेशनानंतर शहरात आलेल्या शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. विधान परिषद विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामाची माहिती देखील त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

****

गणेशोत्सव, दहिहंडी, नागपंचमी अशा हिंदू सणांच्या विरोधात षडयंत्र रचले जाते. हा शहरी नक्षलवाद्यांचा डाव आहे. आपण तो हाणून पाडू आणि यावेळी राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करु असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज केलं. गणपतीचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण इथल्या हमरापूर इथं गावातील मुर्तीकारांच्या विविध संघटनातर्फे शेलार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करुया असं सांगत आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील त्यांनी यावेळी जाहीर केली.

****

मागील अनेक वर्षापासून उमरगा येथील नागरिकांचे बसस्थानकाचे स्वप्न प्रत्यक्षात येत असून उमरगा बस स्थानकाच्या बांधकामासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. आज उमरगा शहरातील बहुप्रतिक्षित बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रविंद्र गायकवाड, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या उपमहाव्यवस्थापक अनघा वारटक्के, राज्य परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव, विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

****

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळामध्ये मोबाईलवर रमी हा पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला. त्यावर राजकीय टीका होत असताना आज नाशिकमध्ये कोकाटे यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे. आपण मोबाईल सुरू केल्यानंतर रमी या खेळाची जाहिरात आली होती. ती स्कीप करून आपण मोबाईल बघत असतानाच शूटिंग चित्रित झालेले दिसते असे ते म्हणाले. रोहित पवार यांनी आतापर्यंत कृषी या विषयावर कधी विधिमंडळात प्रश्नही मांडले नाही अशी टीका त्यांनी केली.

****

डॉ. हेडगेवार रक्तपेढी, सोलापूर च्या ३५ व्या वर्धापन दिनाच्या समारंभ मेळाव्यात २०२४-२५ मध्ये सर्वाधिक रक्तदान शिबिरं घेऊन सर्वाधिक रक्त संकलन करण्यात धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याबद्दल डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, कोषाध्यक्ष सुहास जोशी, संचालक सुनील इंगळे, सोलापूरचे प्रसिद्ध उद्योजक नित्यानंद दर्बी यांना सामाजिक समरसता मंचाचे रमेश पांडव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

****

No comments: