Monday, 1 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.04.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ एप्रिल  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज सकाळी ॲमीसॅट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C 45 या यानाद्वारे ॲमीसॅटसह इतर २८ देशांच्या उपग्रहांचंही प्रक्षेपण करण्यात आलं. यामध्ये अमेरिकेचे २४, लिथुनियाचे दोन, आणि स्वित्झर्लंड तसंच स्पेनच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा समावेश आहे. ॲमीसॅट उपग्रहाच्या साहाय्याने भारताला शत्रूच्या रडारची माहिती सहज मिळू शकणार आहे.

****



 नेपाळमध्ये काल झालेल्या वादळी पावसात, सत्तावीस लोक ठार झाले, तर सुमारे चारशे लोक जखमी झाले. या वादळात बारा आणि परसा जिल्ह्यातल्या अनेक गावांचं नुकसान झाल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. या वादळात अनेक चारचाकी गाड्या उडाल्या, झाडं तसंच वीजेचे खांब उन्मळून पडले, तसंच घरांचं नुकसान झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

****



 जम्मू कश्मीर मधल्या पुलवामा जिल्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. मारले गेलेले सर्व दहशतवादी हे लश्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती, राज्याचे पोलिस महानिर्देशक दिलबाग सिंह यांनी आकाशवाणी बातमीदाराशी बोलताना दिली. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि तर हत्यारं हस्तगत केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यातून काल तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. लोकसभा निवडणूक काळात सुरक्षा दलाच्या जवानांना बॉम्बस्फोट करून मारण्याचा त्यांचा कट होता. त्यांच्या ताब्यातून एका टिफीन बॉम्बसह तीन हाथगोळे असलेले बाण, तसंच अन्य स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. या लोकसभा निवडणुकीवर माओवाद्यांनी बहिष्कार पुकारल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता शीगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा इथं प्रचारसभा घेऊन भाजप- शिवसेना युतीच्या महाराष्ट्रातल्या प्रचाराला सुरुवात करतील. या प्रचारसभेला नितीन गडकरी, हंसराज अहीर यांच्यासह विदर्भातले युतीचे सर्व १० उमेदवार उपस्थित राहणार आहेत. विदर्भातल्या ७ मतदारसंघामध्ये ११ एप्रिल रोजी तर उर्वरित तीन मतदार संघांमध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

****



 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तरप्रदेशमधल्या अमेठी मतदारसंघाबरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातूनही निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना दिली. दक्षिण भारतातले कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहामुळे गांधी यांनी या  मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संबंधित जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश राज्याच्या पणन संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार १८ एप्रिल रोजी बंद राहणार आहेत.

****



 विजया बँक आणि देना बँक या दोन बँकांचं आज ‘बडोदा बँकेत ’ विलीनीकरण होत आहे. या विलिनीकरणानंतर ‘बडोदा बँक’ ही, भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय या बँकांपाठोपाठ, देशातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक ठरणार आहे. विजया बँक आणि देना बँकेचे ठेवीदार, कर्जदार आणि खातेधारकांना आजपासून बडोदा बँकेचे ग्राहक मानलं जाईल, असं भारतीय रिजर्व्ह बँकेनं जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे.

****



 कायम खाते क्रमांक -पॅन हा आधार क्रमांकाशी संलग्न करण्याला तीस सप्टेंबर, २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आजपासून आयकर विवरण पत्र दाखल करतांना, त्यामध्ये आधार क्रमांक नोंदवणं सक्तीचं झालं आहे. कायम खाते क्रमांक - पॅन मिळवण्यासाठीही आधार क्रमांक गरजेचं असणार आहे. दरम्यान, बँक खात्यांसह, दूरसंचार सेवेसाठी आधार संलग्नीकरणाची सक्ती नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी आज एक एप्रिलपासून सुधारित दराने रोजंदारी देण्यास, निवडणूक आयोगानं मंजूरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दिली जाणारी रोजंदारी ही, शेतमजुरांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांकाशी जोडलेली आहे. यामुळे आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी हे सुधारित दर लागू केले जातात

*****

***

No comments: