Wednesday, 24 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.04.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००

****

अपप्रकार करणाऱ्या लोकांना न्यायसंस्थेत ढवळाढवळ करण्याची संधी मिळाल्यास, ही संस्था तग धरणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.



सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातल्या कथित लैंगिक छळ प्रकरणी, झालेल्या सुनावणीत आज न्यायालयानं, हे मत नोंदवलं.

या दाव्यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग, गुप्तचर विभाग आणि दिल्ली पोलिसांच्या प्रमुखांना, न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीशांच्या या प्रकरणामागे मोठं कारस्थान असून त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा उत्सवसिंह बंस या वकिलांनी केला आहे, या प्रकरणी आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचं बन्स यांनी सांगितलं. न्यायालयानं, त्यांना उद्या न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

****

गेल्या रविवारी, इस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या बाँबस्फोट मालिकेत मृत्युमुखी पडलेल्या दहापैकी नऊ भारतीय नागरिकांचे देह भारतात आज पाठवण्यात आले. श्रीलंका सरकारनं ही माहिती दिली. चार वेगवेगळ्या विमानांमधून हे देह आज बंगळुरू आणि हैदराबाद इथे आणण्यात आले.

****

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची पाळमुळं खणून काढल्याचं, लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लों यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू इथं, सैन्यदल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये ४१ अतिरेकी मारले गेले, त्यापैकी २५ जण जैश ए मोहम्मद चे सक्रीय दहशतवादी असल्याचं, या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. २०१८ या वर्षात काश्मीरमध्ये २७२ दहशतवाइदी मारले गेल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातल्या डोणगाव इथल्या १२० क्रमांकाच्या मतदानकेंद्रावर आज  फेरमतदान झालं. दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे अट्ठावन्न टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या केंद्रावर अठरा एप्रिलला मतदान सुरू होतं, त्या दिवशी मतदान पथकानं मॉक पोल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधला डेटा वेळेवर न गाळता, काही मतदारांनी मतदान केल्यानंतर गाळल्यामुळे इथे आज नव्यानं मतदान घेण्यात आलं.

****

महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या महाराष्ट्र दिनाला या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या पदकांचं वितरण करण्यात येणार आहे.

****

बुलडाणा परिसरातल्या लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि शेकडो वर्षापासून मोठी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदंबा देवीच्या यात्रेला बुलडाणा शहरात सुरुवात झाली आहे. या उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. उन्हाची पर्वा न करता पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पालम शहरात तीव्र पाणीटंचाई भासत असून नागरिकांसह महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे या शहरात टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीनं करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसात टँकरनं पाणी पुरवठा करावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीनं लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर यांनी दिला आहे.



****

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातल्या झोडगा गावाजवळ असलेल्या येलदरी नाल्यात बिबट्या वाघाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.या जिल्ह्यातल्या जंगलांमध्ये सध्या पिण्याचं पाणी नसल्यानं वन्य प्राण्यांचे मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत असून, या बिबट्याचाही पाण्याअभावी मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

****

चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आणि समीर वर्मा  यांनी आपआपले एकेरीचे पहिल्या फेरीचे सामने जिंकून दुस-या फेरीत प्रवेश केला .किदाम्बी श्रीकांत याचा पहिला सामना आज होणार आहे.

****

वाशिम जिल्ह्यात विहिरीच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना नवीन केलेलं बांधकाम खचल्यानंतर  मातीखाली दबून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. कारंजा तालुक्यातल्या मसला या गावी ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: