Wednesday, 24 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.04.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०१९ - २०.००

****

लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं असून, येत्या सोमवारी २९ तारखेला चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात सर्व ४८ मतदार संघातलं मतदान पूर्ण होईल. या चौथ्या टप्प्यात मुंबईतल्या सर्व मतदार संघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरुर या मतदार संघात, मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारांचा प्रचार शनिवारी संध्याकाळी थांबणार आहे. प्रचाराला काही दिवस शिल्लक असल्यानं, प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ, जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, घेत आहेत.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिक जिल्ह्यात निफाड इथं, महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा झाली. देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांपैकी 25 टक्के थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊन दिलासा देण्याचे काम संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केलं होतं, मात्र या सध्याच्या मोदी सरकारने तेव्हा शेतकऱ्यांना पैसे देण्यास विरोध केला होता, असं पवार म्हणाले. आजही पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या बाबत बोलत नाहीत आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले की विरोध केला जातो अशी टीका पवार यांनी केली.

मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत इथली बाजार समिती बंद ठेवण्यात आली त्यामुळे दोन हजार ट्रक कांद्याचं नुकसान झालं, ते कोण भरून देणार असा प्रश्न पवार यांनी विचारला.

बाजार समित्यांमधली दलाली नष्ट करण्याचा मोदी यांच्या विधानामुळे दलाल, भाजपच्या विरोधात गेल्याचा दावाही पवार यांनी केला.

****

नंदुरबार मतदार संघात, प्रचाराच्या रणधुमाळींनी रंगत वाढली आहे. भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सभा घेतल्या असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी देखील सभा घेतली. उद्या कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शिरपूर, अक्कलकुवा आणि साक्री अशा तीन तालुक्यात सभा होणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पालघर मतदार संघातल्या नालासोपारा इथं आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी विजय संकल्प सभा घेतली. भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

****

विरोधी पक्षांना आपल्या पराभवाचा अंदाज येताच, ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आक्षेप घेतात, असं भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज जयपूर इथं, पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस महाआघाडीनं काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, ईव्हीएमद्वारे मतदानावर पुन्हा एकदा शंका उपस्थित केली, त्या पार्श्वभूमीवर जावडेकर बोलत होते. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभेसाठी गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुका काँग्रेसनं जिंकल्या, त्यावेळी किंवा केरळ, तेलंगणा, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इतर पक्षांनी सरकारं स्थापन केली, त्यावेळी ईव्हीएम बाबत या पक्षांची तक्रार नव्हती, असं जावडेकर यांनी नमूद केलं. 

****

भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदार संघातल्या उमेदवार नेत्या प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी एक याचिका, राष्ट्रीय तपास संस्थेच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं फेटाळून लावली. २००८ मध्ये मालेगाव इथे झालेल्या बाँबस्फोटात मरण पावलेल्या व्यक्तीच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. प्रज्ञासिंह यांना या न्यायालयानं जामीन मंजूर केलेला नसल्यामुळे या याचिकेवर निर्णय देता येणार नाही, असं या न्यायालयानं म्हटलं आहे.

****

शेतकऱ्यांची काळजी केवळ काँग्रेस पक्षच घेऊ शकतो, असं प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या कानपूर इथे एका प्रचार सभेत ते आज बोलत होते. आपल्या जाहीरनाम्यातल्या घोषणांचा त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, यांनी आज फतेहपूर इथे सभा घेऊन, मतदारांशी संवाद साधला.

****

भाजपचे वायव्य दिल्लीचे नाराज खासदार उदीत राज यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उदीत राज यांना भाजपनं पुन्हा लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानं, त्यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली, आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपनं या मतदार संघातून पंजाबी सुफी गायक हंस राज हंस यांना उमेदवारी दिली आहे.

****


No comments: