आकाशवाणी औरंगाबाद
मराठी बातमीपत्र
२५ एप्रिल २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यातलं
मतदान पूर्ण झालं असून, येत्या सोमवारी २९ तारखेला चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार
आहे. राज्यात चौथ्या
टप्प्यात मुंबईतल्या सर्व मतदार संघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, धुळे, नंदुरबार,
नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरुर या १७ मतदार संघात, मतदान होणार आहे. प्रचाराला काही दिवस शिल्लक
असल्यानं, प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ, जाहीर
सभा, प्रचार फेऱ्या, घेत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानं
चांगलाच वेग घेतला आहे. विविध राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक विविध ठिकाणी आपापल्या
उमदेवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी काल झारखंड आणि पश्चिम बंगालमधे प्रचारसभा घेतल्या. आज ते बिहारमधल्या दरभंगा
आणि उत्तर प्रदेशात बांदा इथं जाहीर सभा घेणार आहेत. तसंच दुपारी वाराणसी इथं `रोड
शो` देखील करणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह देखील आज उत्तर प्रदेशात गाझीपूर आणि
उन्नाव इथं प्रचारसभा घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजस्थानमधे जलोर,
अजमेर आणि कोटा इथं सभा घेणार आहेत.
दरम्यान, ओदिशातल्या आठ मतदान केंद्रांवर आज फेरमतदान
होत आहे. नागालँडमधल्या त्युई विधानसभा मतदार संघात एका मतदान केंद्रावरही आज फेरमतदान
होत आहे. उत्तरप्रदेशात आग्रा मतदारसंघातल्याही एका मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असून
उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
****
जम्मू-कश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात
बीजबेहरा इथं आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन
दहशतवादी ठार झाले. या परिसरात दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती सुरक्षा दलाला मिळाली
होती.
त्याआधारे काल रात्री शोधमोहीम सुरु करण्यात
आली. या मोहीमेदरम्यानच दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु झाली अशी माहिती सुरक्षा दलाच्या
सुत्रांनी दिली. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडची शस्त्रं आणि दारुगोळा जप्त केला आहे,
अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.
***
राज्य
पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या
महाराष्ट्र दिनाला या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या पदकांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यामधल्या शेंद्रा मांगीरबाबा
यात्रेतल्या गळ टोचणीसह अनिष्ट प्रथांविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन आणि काळी जादू कायद्यानुसार
कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या
प्रथांविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेच्या सुनावणी दरम्यान
न्यायालयानं हे निर्देश दिले. या यात्रेत कोणी गळ टोचून घेतले तर त्याकडे दुर्लक्ष
केले असं गृहीत धरून देवस्थानचे विश्वस्त आणि पोलिस प्रशासनाला सहआरोपी घोषित करण्यात
येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांनी सहा आठवड्यात
शपथ पत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
अमरावती विभागातील 56 पैकी 49 तालुक्यातील भूजल पातळीत
घट झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत मार्चमध्ये विभागातील अमरावती जिल्ह्यात
170, अकोला तसंच वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी 79, बुलडाणा 167 आणि यवतमाळ जिल्ह्यातील
176 अशा एकूण 671 विहिरींची निरीक्षणं नोंदवली गेली. त्याची गेल्या पाच वर्षातील भूजल
पातळीत सरासरी तुलना करण्यात आली. त्यावेळी 49 तालुक्यातील भूजल पातळीत घट झाल्याचा
निष्कर्ष काढण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चीनच्या वुहानमध्ये सुरू आशिया अजिंक्यपदक बॅडमिंटनस्पर्धेत
पी.वी.सिंधू आणि सायना नेहवालसह सात भारतीय खेळाडू आज आपला उप उपांत्य फेरीचा सामना
खेळतील. महिला एकेरीतील चौथं मानांकन प्राप्त सिंधूची लढत इंडोनेशियाच्या कोइरुन्नीसा
विरुद्ध होणार आहे. सातव्या मानांकित सायना नेहवालचा सामना दक्षिण कोरियाच्या किम गा
उनविरुद्ध होणार आहे.
****
बँकॉक इथं सुरु असलेल्या आशियायी मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या
उपांत्य फेरीत आज भारताचे तब्बल १३ स्पर्धक खेळणार आहेत. यात सात पुरुष आणि सहा महिला
स्पर्धकांचा समावेश असून, या सगळ्यांनी कांस्य पदक निश्चित केलं आहे. ६० किलो वजनी
गटात सरिता देवी आणि शिवा थापा, ७५ किलो वजनी गटात पुजा राणी, ५२ किलो वजनी गटात, अमित
पांघल या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करत आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment