Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
देशात जवळपास १६ लाख रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
**
आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध शिथिल करण्याबाबत
लवकरच निर्णय-गृहमंत्री अनिल देशमुख
**
सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या
केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना
**
कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांना वाढीव देयकं आकारणाऱ्या खासगी रुग्णांलयांना
वाढीव रकमेच्या किमान पाच पट दंड ठोठावण्याचे राज्य सरकारचे निर्देश
**
राज्यात दहा हजार ४४१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, २५८ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू
**
मराठवाड्यात २१ बाधित रुग्णांचा मृत्यू, तर नवे एक हजार ८३ रुग्ण
**
आणि
**
औरंगाबाद जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड ठोठावण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा
निर्णय
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गानं बाधित झालेल्या रुग्णांच्या तुलनेत जवळपास १६ लाख रुग्ण बरे
झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं याबाबत माहिती देतांना देशात
एकूण बाधित रुग्णांच्या संख्यपैकी आता फक्त २३ पूर्णांक २४ टक्के रुग्ण असल्याचं सांगितलं. बाधित रुग्णांचा
मृत्यू दरही इतर देशांच्या तुलनेत घटून एक पूर्णांक ८६ टक्क्यांवर आला आहे.
रुग्णांचा
तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं, आणि उपचारामुळे हे शक्य झाल्याचं आरोग्य
मंत्रालयानं म्हटलं आहे. या आजारातून मुक्त होण्याचं प्रमाण आता ७५ टक्क्यांवर पोहाचलं
असल्याचंही मंत्रालयानं काल स्पष्ट केलं.
दरम्यान, आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी वर्षअखेरपर्यंत
या आजारापासून बचाव करण्यासाठीची लस देशात विकसित होईल, असं सांगितलं. सध्या तीन लस
तयार होत असून यापैकी एक लस ही मानवीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याचं ते म्हणाले.
जगभरात २६ ठिकाणी लसींचा विकास केला जात असून त्या सर्व चाचण्यांच्या विविध टप्प्यात
आहेत, असं आरोग्य मंत्री म्हणाले.
****
आंतरराज्य
आणि राज्यांतर्गत प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लवकरच
घेतला जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत
वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाईल,
तसंच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं देशमुख यांनी ट्विट
संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं जरी प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नसल्याचं म्हटलं
असलं, तरीही राज्यात ई पास आवश्यक असल्याचंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
****
महाराष्ट्र
राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्त्वावर वायरमन पदाच्या नोकरीसाठी पात्र
असलेल्या पण आवश्यक प्रशिक्षणाअभावी नोकरीपासून वंचित राहिलेल्या तरुणांना राज्यातल्या
औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयमधून प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा
निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी
ही माहिती दिली. आयटीआयमधला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना राज्य
विद्युत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्त्वावर थेट नोकरी मिळणार आहे.
****
नाशिकमधून
सुरु करण्यात आलेली देशातली पहिली `किसान रेल्वे` आता आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे.
शेतमालाची वाढती आवक तसंच परराज्यात आपला शेतमाल विक्रीसाठी पाठवण्याची शेतकऱ्यांची
मागणी लक्षात घेता कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून
होत होती. दर मंगळवार आणि शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली रेल्वे स्थानकावरून
ही रेल्वे सोडण्यात येणार आहे.
****
अभिनेता
सुशांतसिंह राजपुत मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या पथकानं काल मुंबईत
त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी, स्वयंपाकी निरज सिंह आणि नोकर दिपेश सावंत यांची चौकशी
केली. सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर `सीबीआयच्या`
पथकानं त्यांच्यासह सुशांत सिंहच्या घरी भेट दिल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सीबीआयच्या
पथकातले न्यायवैद्यक शास्त्रज्ञ तसंच मुंबई पोलिस यावेळी उपस्थित होते.
****
केंद्रीय
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं देशात नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्याच्या
प्रक्रियेसंदर्भात देशभरातल्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून सूचना मागवल्या आहेत.
आजपासून येत्या ३१ तारखेपर्यंत या सूचना विभागाच्या संकेतस्थळावर मांडता येणार असून,
या सूचनांचा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाची तज्ञ समिती अभ्यास करणार
आहे.
****
मराठवाड्यातल्या
अनेक भागात काल पावसानं उघडीप दिली. औरंगाबाद शहरात आठ दिवसाच्या खंडानंतर काल सूर्यदर्शन
झालं.
मात्र
पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या २२ हजार १४ घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे.
सध्या धरणाची पाणी पातळी ७८ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.
बीड
जिल्ह्यातल्या माजलगाव धरणाची पाणी पातळी ७३, परभणी जिल्ह्यातल्या सेलू निम्न दुधना
प्रकल्पाची पाणी पातळी ६१ टक्क्याच्या आसपास आहे तर येलदरी धरण पूर्ण भरलं आहे.
नाशिक
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्याहून अधिक झाला असून, या
धरणातून काल ५२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे.
नांदेड
जिल्ह्यातही काल संध्याकाळपर्यंत पावसानं उघडीप दिली, मात्र सायंकाळी एक तास जोरदार
पाऊस झाला.
****
गडचिरोली
जिल्ह्यातला पाऊस थांबला असला तरी धरणांमधून पाणी सोडल्यानं अजुनही नद्या आणि नाल्यांना
आलेला पूर कायम आहे. जिल्ह्यातले हेमलकसा-सुरजागड, कसनसूर-भामरागड, अहेरी-व्यंकटापूर
आणि असरअली-सोमनपल्ली हे महत्वाचे मार्ग पुरामुळे बंदच आहेत. भामरागडनजीकच्या पर्लकोटा
नदीचा पूर मात्र ओसरु लागला आहे.
गेल्या
काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीची
पाणी पातळी वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आष्टी -चंद्रपूर
मार्गावरचा पूल खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गोसीखुर्द
धरणातून आठ हजार घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात आलं असल्यानं, चंद्रपूर
आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
सर्व
पात्र दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३मधे समाविष्ट करण्याच्या
सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री
गरीब कल्याण योजनेअंतर्गत निर्धारीत केलेल्या शिध्याचं वाटप तत्काळ करावं, असंही म्हटलं
आहे. ज्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेत अजुनही सामील केलेलं नाही त्यांच्या शिधापत्रिका
तात्काळ बनवाव्यात, अशी सूचनाही केंद्रानं केली आहे.
****
चित्रपट
आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चित्रीकरणास सुरुवात करण्याबाबतची मानक नियमावली काल
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जारी केली. त्यानुसार कॅमेऱ्या
समोरील व्यक्ती वगळता इतर सर्वांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक राहील. चित्रिकरण स्थळी,
रेकॉर्डिंग स्टुडिओ, संपादन कक्षामध्ये वावरतांना सहा फूटांचं एकमेकांपासून अंतर राखणं
आवश्यक आहे. चित्रिकरणादरम्यान कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत, याशिवाय चित्रिकरण
स्थळी अन्य व्यक्ती तसंच प्रेक्षकांना परवानगी नसल्याचं जावडेकर यांनी सांगितलं आहे.
चित्रपट आणि दूरचित्रवाणी हा महत्वाचा उद्योग असून या उद्योगाशी लाखो लोक जोडले गेले
असल्याचं त्यांनी सांगितलं. गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्याशी चर्चा करून
या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असल्याचं जावडेकर म्हणाले. या निर्णयामुळे आता
देशभर चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण सुरु होऊ शकणार
आहे.
****
देशातल्या
आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन तसंच निवृत्त कर्मचाऱ्यांचं
निवृत्तीवेतन यावर्षी थांबवणार असल्याचं समाजमाध्यमावर प्रसारित होत असलेलं वृत्त खोटं
असल्याचं, पत्र सूचना कार्यालयानं महटलं आहे. हे वृत्त बिनबुडाचे असल्याचं सांगत रेल्वे
मंत्रालयानं असा कुठलाही प्रस्ताव विचाराधिन नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गाच्या रुग्णांना वाढीव देयकं आकारणाऱ्या खासगी रुग्णांलयांकडून त्यांनी
आकारलेल्या वाढीव रकमेच्या किमान पाच पट दंड वसूल करण्याचे स्पष्ट निर्देश आरोग्य मंत्री
राजेश टोपे यांनी दिले आहेत. या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं
सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना याबद्दलचे लेखी आदेश पाठवण्यात आले आहेत.
खासगी रुग्णालयांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन राज्य शासनानं हा निर्णय
घेतला आहे.
****
आवाजावरुन
कोरोना विषाणूची चाचणी करणाऱा `व्होकलीस हेल्थकेअर` हा उपक्रम काल मुंबईत गोरेगावमधल्या
सुविधा केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,
वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली.
कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधला कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धचा
लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातल्या रुग्णांचं त्वरित निदान आणि उपचारासाठी मदत होईल, असा विश्र्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त
केला.
****
राज्यात
काल दहा हजार ४४१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली
एकूण रुग्णसंख्या सहा लाख ८२ हजार ३८३ झाली आहे. काल २५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २२ हजार २५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर काल आठ हजार १५७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत
चार लाख ८८ हजार २७१ रुग्ण कोरोना विषाणू संसर्ग मुक्त झाले असून, सध्या एक लाख ७१
हजार ५४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल २१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे एक हजार ८३ रुग्ण आढळले.
यामध्ये
औरंगाबाद जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला तर २८८ नवे रुग्ण आढळले.
नांदेड
जिल्ह्यातही सहा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ८९ रुग्णांची नोंद झाली.
जालना
जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर आणखी ११३ रुग्णांची नोंद झाली.
परभणी
जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला, तर नवे ३६ रुग्ण आढळले.
लातूर
जिल्ह्यातही दोन जणांचा मृत्यू झाला. तर १४४ नवे रुग्ण आढळले
हिंगोली
जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यु झाला तर, १८ नवे रुग्ण आढळले.
उस्मानाबाद
जिल्ह्यात २०८ तर बीड जिल्ह्यात १२८ नवे रूग्ण आढळले.
****
मुंबईत
काल ९९१ नवे बाधित रुग्ण आढळले, तर ३४ रुग्णांचा या आजारानं काल मृत्यु झाला. पुण्यात
एक हजार २८८ नवे रुग्ण आढळले तर ४० रुग्णांचा मृत्यु झाला. पालघर ३०३, गडचिरोली पाच,
सोलापूर २७१, रत्नागिरी ६०, बुलडाणा २३, वाशिम ४९, यवतमाळ ४३, सिंधुदुर्ग पाच, सांगली
१३१, नागपूर ८२४, ठाणे एक हजार २८२,नाशिक ६७४,सातारा ४४३ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले.
****
बीड
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली टाळेबंदी काल मागे घेण्यात आली. यामुळे
जिल्ह्यात आजपासून सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होतील.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी सांगितलं. समाजाला परत देऊ या संकल्पनेवर आधारीत जिल्ह्यातील खासगी
डॉक्टरांशी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक घेण्यात आली. त्यानंतर
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याची
गंभीर दखल घेवून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले…
आता आम्ही खेड्यामध्ये सुध्दा मास्क लावणं
बंधनकारक करणार आहोत वापरणं नाही लावलं तर दंड ५०० रुपये लावण्यात येईल, नाही तर त्याला
नुसता दंड नाही तर एक मार्ग दिला त्याला जातांना तरी मास्क लाउन जाईल. Antigen
Test आपण वाढवतो खेड्यामध्ये Group Centres Identify केलेत त्यामध्ये बाजाराची गावं
ती दिवस भर असणार आहेत Testing, Tracing, Treatment.
****
दीड
दिवसांच्या गणरायांचं काल राज्यभरात विसर्जन करण्यात आलं.
मुंबईत
कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करु
नये आणि कृत्रिम तलाव किंवा आपल्या घरीच गणेशमूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन करण्यात
आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिकेनं ट्रकमध्ये
तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली, तत्पूर्वी त्यांनी नेपीयन सी रोड,
प्रियदर्शिनी पार्क इथल्या गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली.
****
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा वर्धापनदिन काल कोरोना विषाणू संसर्गासंबंधी
दिशा निर्देशांचं पालन करत साजरा झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ
प्रमोद येवले यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त साहित्यिक प्राध्यापक
ऋषिकेश कांबळे यांचं ‘नामांतरानंतरचं विद्यापीठ’ या विषयावर दूरदृष्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून व्याख्यान झालं. विद्यापीठात नव्या अभ्यासक्रमांसह संशोधनाचा दर्जा सुधारणं
गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. परदेशी भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेतच
मात्र, भारतातल्या भाषांचं जतन, संवर्धन आणि विकास अशा पद्धतीची संरचना अस्तिवात यावी
अशी अपेक्षाही प्राध्यापक कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
परभणी
शहरात काल २४७ व्यापाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली, त्यापैकी तीन जणांना कोरोना
विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान,
शहरातल्या व्यापाऱ्यांनी २५ ऑगस्टपूर्वी अँटिजेन चाचणी करून घ्यावी, अन्यथा त्यांना
दुकानं उघडता येणार नाहीत, असा इशारा महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिला
आहे.
****
जालना
जिल्ह्यातल्या श्री राजुरेश्वर गणपती मंदिराच्या पायथ्याशी काल मोजक्याच भाविकांच्या
उपस्थितीत दहीहंडी उत्सव साजरा झाला. नगर प्रदक्षिणेऐवजी मंदिरातच पालखी मिरवणूक काढण्यात
आली.
बुलडाणा
जिल्ह्यातल्या शेगाव इथं संत श्री गजानन महाराजांच्या एकशे दहाव्या पुण्यतिथी निमित्त
आयोजित सोहळाही कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे होऊ शकला नाही. काल मोजक्याच लोकांच्या
उपस्थितीत विधीवत पुजन करण्यात आलं.
****
परभणी
महानगरपालिकेनं आपल्या संकेतस्थळावर मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून
दिली आहे. नागरिकांनी या सुविधेमार्फत कर भरणा करावा असं आवाहन महापौर अनिता सोनकांबळे,
आयुक्त देविदास पवार, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी केलं आहे.
****
लातूर
शहरातल्या लातूर वृक्ष या संघटनेच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ काल आमदार धिरज
देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी बाभळगाव येथील दयानंद विद्यालयात १०१ रोपं लावण्यात
आली. या कार्यक्रमाअंतर्गत शहराच्या चारही बाजूंच्या महामार्गालगत अंदाजे पन्नास किलोमीटर
लांबीमध्ये वृक्ष लावण्याचं नियोजन आहे.
***
परभणी
जिल्ह्यातल्या मानवत इथले शिवसेनेचे तालुकाप्रमुख तसंच जिल्हा परिषद सदस्य विष्णु उर्फ
आबा नामदेवराव मांडे यांचं काल सेलू इथल्या खाजगी रुग्णालयात कर्करोगामुळे निधन झालं.
त्यांच्या पार्थिवावर मानोली इथं काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment