Monday, 24 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24 AUGUST 2020 TIME – 13.00

 

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोविड संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ७५ पूर्णांक २७ शतांश टक्के एवढं झालं आहे. आतापर्यंत देशभरात कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ लाख ३८ हजार झाली आहे. कोविड बाधितांची एकूण संख्या ३१ लाख ६ हजार ३४८ झाली असून सध्या देशात ७ लाख १० हजार ७७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५७ हजार ५४२ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचं हे प्रमाण १ पूर्णांक ८५ शतांश टक्के असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या २४ तासांत ८३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून यात सर्वाधिक २५८ मृत्यू महाराष्ट्रातले आहेत.

दरम्यान, कालपर्यत देशभरात ३ कोटी ५९ लाख २ हजार १३७ कोविड नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद- आय सी एम आरनं दिली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे नवे १२९ रुग्ण आढळले असून जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २० हजार ८५६ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमधे महापालिका हद्दीतल्या ६३ आणि ग्रामीण भागातल्या ६६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ७१२ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून सध्या ४ हजार ५१० रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात काल ४८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातलं प्रमाण आता ८१ पूर्णांक ४७ शतांश टक्के झालं आहे.

****

ज्येष्ठ पार्श्वगायक एस पी बालसुब्रह्मण्यम् कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत. त्यांच्या कोविड चाचणीच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाल्याची माहिती त्यांचे पुत्र एस पी चरण यांनी दिल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. गेल्या पाच तारखेला बालसुब्रह्मण्यम् यांना कोविड संसर्ग झाल्यानं, चेन्नईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.

****

गांधी कुटुंबाशिवाय इतर कोणालाही काँग्रेस अध्यक्ष म्हणून स्वीकारणार नसल्याची भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. नवी दिल्लीत काँग्रेस पक्ष मुख्यालयात आज अध्यक्षपदासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत बैठक सुरू आहे, या परिसरात गोळा झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, गांधी कुटुंबीयांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, आपल्याला हंगामी अध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी कार्यकारिणीकडे केली. पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, सोनिया गांधींकडे पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, पक्षाच्या अंतर्गत मुद्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा करणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे मुद्दे कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चिले जावे, प्रसारमाध्यमांमधून नव्हे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग असेल.

****

अमरावती जिल्ह्यातील शहानूर धरण ९० टक्के भरल्यानं या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातल्या सापन प्रकल्पाचेही दोन दरवाजे आज उघडण्यात आले आहेत.

***

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्याहून अधिक झाला असून, या धरणातून काल ५२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. दरम्यान नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग वाढल्यानं, औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात सध्या १५ हजार २९९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे. धरणाची पाणी पातळी आज ७८ पूर्णांक ८१ शतांश टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणाची पाणी पातळी ७३ टक्के, परभणी जिल्ह्यातल्या सेलू निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी ६१ टक्क्याच्या आसपास झाली आहे तर येलदरी धरण पूर्ण भरलं आहे.

****

 

No comments: