Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
*औरंगाबादमधे कोरोना विषाणुचे नवे १५७ रुग्ण,
चार रुग्णांचा मृत्यू
*सीबीआयकडून सुशांतसिंह प्रकरणी आज तीन जणांची
चौकशी
*जायकवाडी धरणातला पाणीसाठा ७७ टक्क्यांवर
आणि
*दीड दिवसांच्या गणरायाचं विसर्जन
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणुचे नवे
१५७ रुग्ण आढळले असून यात महापालिका हद्दीतल्या ९३ आणि ग्रामीण भागातल्या ६४ रुग्णांचा
समावेश आहे.
एकूण रुग्ण संख्या आता २० हजार ५९६ झाली आहे.
जिल्हयात आतापर्यंत १५ हजार ३६३ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून सध्या
चार हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज चार
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यामध्ये शहरातल्या बारी
कॉलनी इथल्या ६३ वर्षीय, पडेगाव इथल्या फुलेनगरच्या ५५ वर्षीय, सोयगाव तालुक्यातल्या
खामखेडा इथल्या ६५ वर्षीय पुरुष रुग्णांचा आणि भिमनगर भावसिंगपुरा इथल्या ६२ वर्षीय
महिला रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या संसर्गानं मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या
६३३ झाली आहे. सांगली जिल्ह्यातल्या एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचाही औरंगाबाद शासकीय
वैद्यकीय रुग्णालय - घाटीत उपचारां दरम्यान आज मृत्यू झाला.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या पथकानं
आज मुंबईत अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूप्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी,
स्वैपाकी निरज सिंह आणि नोकर दिपेश सावंत यांची चौकशी केली. सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर `सीबीआयच्या` पथकानं त्यांच्यासह सुशांत सिंहच्या
सदनिकेला भेट दिल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सीबीआयच्या पथकातले न्यायवैद्यक शास्त्र
तज्ज्ञ तसंच मुंबई पोलिस यावेळी उपस्थित होते. सीबीआयच्या एका पथकानं कालही या तिघांसह
या सदनिकेला भेट देऊन सुशांतसिंह मृत अवस्थेत आढळण्यापुर्वीच्या घटनाक्रमाची पुनरर्रचना
करत तपास केला होता. अन्य एका पथकानं सुशांतच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केलेल्या
कूपर रुग्णालयाला भेट दिली होती.
****
देशातली पहिली `किसान रेल्वे` नाशिकमधून सुरु
करण्यात आली असून या रेल्वेद्वारे शेतकऱ्यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठवण्याची
जलद सुविधा सुरु झाली आहे. ही कृषी रेल्वेच्या फेऱ्या आठवड्यातून आता दोन वेळा सुरु
होणार आाहेत. शेतमालाची वाढती आवक तसंच परराज्यात आपला शेतमाल विक्रीसाठी पाठवण्याची
शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कृषिरेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत
होती. प्रत्येक आठवड्यात दर मंगळवार आणि शुक्रवारी
नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली रेल्वे स्थानकातून ही रेल्वे सोडण्यात येणार आहे.
****
आवाजावरुन कोरोना विषाणुची चाचणी
करणाऱा `व्होकलीस हेल्थकेअर` हा उपक्रम आज मुंबईत गोरेगावमधल्या सुविधा केंद्रात प्रायोगिक
तत्वावर सुरू करण्यात आला. मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत
याला प्रारंभ झाला. कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधला कोरोना विषाणुविरुद्धचा
लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातल्या या रुग्णांचं त्वरित निदान आणि उपचारासाठी
मदत होईल, असा विश्र्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचा ६२ वा वर्धापनदिन आज कोरोना विषाणू संसर्गासंबंधी दिशा निर्देशांचं पालन
करत साजरा झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगूरू डॉ प्रमोद येवले यांच्या
हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त साहित्यिक प्राध्यापक ऋषीकेश कांबळे
यांचं ‘नामांतरानंतरचं विद्यापीठ’ या विषयावर दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
व्याख्यान झालं. विद्यापीठात नव्या अभ्यासक्रमासह संशोधनाचा दर्जा सुधारणं गरजेचं असल्याचं
मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. परदेशी भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेतच मात्र, भारतातल्या
भाषांचं जतन, संवर्धन आणि विकास अशा पद्धतीची संरचना अस्तिवात यावी अशी अपेक्षाही प्राध्यापक
कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं
देशात नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात देशभरातल्या
शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून सूचना मागवल्या आहेत. उद्यापासून येत्या ३१ तारखेपर्यंत
या सूचना विभागाच्या संकेतस्थळावर मांडता येणार असून, त्यावर एनसीईआरटी अर्थात, राष्ट्रीय
शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाच्या तज्ञांची समिती विचार करणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र विद्रुप
करून त्याचा बिभत्स प्रतिक्रीयेसह सामाजिक संपर्क माध्यमांवर उपयोग केल्याच्या आरोपावरून
मध्यप्रदेशमधल्या जबलपूरमधे एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
परवेझ आलम असं या २८ वर्षीय आरोपीचं नाव असून या प्रकरणी गेल्या १२ जुलै रोजी तक्रार
दाखल करण्यात आली होती, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
****
जायकवाडी धरणाची पाणी पातळी
आज ७७ पूर्णांक १७ शतांश टक्के झाली. धरणात सध्या २२ हजार १४ घनफुट प्रतिसेकंद वेगानं
पाणी दाखल होत आहे. बीड जिल्हयातल्या माजलगाव धरणाची पाणी पातळी ७२ पूर्णांक ६० टक्के,
परभणी जिल्ह्यातल्या सेलू निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी ६० पूर्णांक ५६ टक्के
तर येलदरी धरणाची पाणी पातळी सध्या ९९ पूर्णांक १६ टक्के आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली होती. लखलखीत सुर्यप्रकाश पडल्यामुळे काही प्रमाणात
टिकून असलेल्या मुग, उडीद या पिकांच्या
काढणीला
मदत होणार आहे.
****
सातारा जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली
असून सातारकरांनी १५ दिवसांनंतर आज सूर्य दर्शनाचा
लाभ घेतला. सोलापूर शहर तसंच जिल्ह्यात अधुन मधुन पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत,
काही तालुक्यात मात्र आणखी दमदार पावसाची गरज आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातला पाऊस थांबला असला तरी
धरणाचं पाणी सोडल्यानं अजुनही नद्या आणि नाल्यांना पूर असून, जिल्ह्यातले हेमलकसा-सुरजागड, कसनसूर-भामरागड, अहेरी-व्यंकटापूर
आणि असरअली-सोमनपल्ली हे महत्वाचे मार्ग पुरामुळे बंदच आहेत. भामरागडनजीकच्या पर्लकोटा
नदीचा पूर ओसरु लागला आहे.
****
गेल्या काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या
पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं, खबरदारीचा
उपाय म्हणून हा पूल काल दुपारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काल सायंकाळच्या
सुमारास पुन्हा गोसिखुर्द धरणातून ८००० घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येत
असल्यानं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या किनारपट्टीवरच्या गावांना सतर्कतेचा
इशारा देण्यात आला आहे.
****
दीड दिवसांच्या गणरायांचं आज राज्यभरात विसर्जन
करण्यात येत आहे. मुंबईत कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांवर
गर्दी करु नये आणि कृत्रिम तलाव किंवा आपल्या घरीच गणेशमूर्तींचं विसर्जन करावं असं
आवाहन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिकेनं
ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली, तत्पूर्वी त्यांनी नेपीयन्सी
रोड प्रियदर्शिनी पार्क इथल्या गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथले शिवसेनेचे
तालुकाप्रमुख तसंच जिल्हा
परिषद सदस्य विष्णु
उर्फ आबा नामदेवराव मांडे यांचं आज
सकाळी सेलू इथल्या खाजगी
रुग्णालयात कर्करोगामुळे निधन झालं. गेल्या तीन महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर
मानोली इथं अंत्यसंस्कार
करण्यात आले.
****
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार
रामनाथ मोते यांचं आज निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. रामनाथ मोते यांनी सलग दोन वेळा
विधान परिषदेत शिक्षकांचं प्रतिनिधित्व केलं.
****
महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरचे सल्लागार
आणि माजी अध्यक्ष डॉक्टर वासुदेवराव रायते यांचं आज निधन झालं. ते ७८ वर्षाचे होते. रायते यांना परिषदेच्या वतीनं
श्रद्धांजली वाहण्यात आली.
****
पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणुचे
३०३ रुग्ण आढळल्यानं
जिल्ह्यातली या रुग्णांची संख्या २२ हजार २२१
झाली आहे. यात वसई विरार महापालिका क्षेत्रातल्या १५ हजार ४२५ तर पालघर ग्रामीण भागातल्या
६ हजार ५९६ रुग्णांचा समावेश आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या रुग्णांची
संख्या एक हजार ३५४ झाली असून ८९३ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. जिल्ह्यात ४४७ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम `आरबीएसके`
अंतर्गत कार्यरत `बीएएमएस`डॉक्टरांना
`एमबीबीएस` डॉक्टरांएवढंच काम करुनही त्यांच्या तुलनेत अर्ध मानधनही दिलं जात नसल्याचा आरोप करत समान वेतन मिळावं अशी मागणी या डॉक्टरांच्या संघटनेनं केली आहे.
No comments:
Post a Comment