Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
** कोविड संसर्गाने झालेल्या
मृत्यूपोटी बाधित कुटुंबाला एकसमान आर्थिक मदतीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं
फेटाळली
** औरंगाबाद जिल्ह्यात तीन कोविडग्रस्तांचा
मृत्यू; एकूण रुग्णसंख्या २० हजार ८५६
** अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी
सीबीआयकडून सिद्धार्थ पिठानी याची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी
आणि
** शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतराष्ट्रीय
जिमनॅस्ट आदित्य तळेगावकर यांचं आज औरंगाबाद इथं निधन
****
****
कोविड संसर्गाने झालेल्या
मृत्यूपोटी बाधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी एकसमान धोरणाची मागणी करणारी याचिका
सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण तसंच न्यायमूर्ती आर
एस रेड्डी यांच्या पीठानं, ही याचिका फेटाळताना, या प्रकरणी प्रत्येक राज्य सरकारचं
स्वतंत्र धोरण आहे, आणि राज्य सरकार आपल्या आर्थिक स्थितीनुसार ही मदत देत असल्याचं
सांगितलं. देशभरात हजारो लोक या संसर्गामुळे मरण पावले, मात्र त्यांना मिळणारी आर्थिक
मदत एकसमान नसल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन
कोविड बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बायजीपुरा इथल्या ७० वर्षीय महिलेचा, पद्मपुरा
इथल्या ७९ वर्षीय पुरुषाचा आणि फुलंब्री तालुक्यातल्या वाकोद इथल्या २४ वर्षीय पुरुष
रुग्णाचा समावेश आहे. कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६३७ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे नवे १२९ रुग्ण आढळले
असून जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २० हजार ८५६ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमधे
महापालिका हद्दीतल्या ६३ आणि ग्रामीण भागातल्या ६६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत १५ हजार ७१२ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून सध्या ४ हजार ५१०
रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण
भागात कोविडचा वाढता प्रसार रोखण्याकरीता जिल्ह्यात बाजार भरणाऱ्या १३ गावांत तत्काळ
कोविड चाचणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात
कोविड आढावा बैठकीत ही माहिती दिली. शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना रोख दंड
ठोठावून मास्क दिला जाणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. कोरोना योध्दा आणि त्याच्या
परिवारास तत्काळ मदत मिळण्याकरता 'प्रतिसाद कक्षाची' स्थापना करण्यात आली असल्याचं
चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यात आणखी १९५
जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार
६१४ झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ३३४ रुग्ण बरे झाले असून, ११२ रुग्णांचा या संसर्गामुळे
मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार १७१ जणांवर उपचार सुरु आहेत
****
पालघर जिल्ह्यात गेल्या २४
तासांत २७९ नव्या कोविड रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णांची संख्या
आता २२ हजार ५०० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५० रुग्णांचा मृत्यु झाला असून १८
हजार ३७९ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. सद्यस्थितित पालघर ग्रामीण भागात ४२५ प्रतिबंधित
क्षेत्रं आहेत.
****
धुळे जिल्ह्यात
काल २२३ जणांना कोरोनाविषाणूची लागण झाली.यामुळं जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ७ हजाराच्या
वर गेली आहे. आतापर्यंत २१२ रुग्णांचा या संसर्गामुळं मृत्यू झाला असून एकूण ५ हजार १८९ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
कोविड संसर्गामुळे शाळेत
जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत स्मार्ट फोन वाटले जाणार असल्याचं वृत्त
निराधार आहे. सरकारकडून ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. सामाजिक संपर्क माध्यमांवरून
अशा प्रकारची माहिती प्रसारित केली जात आहे, अशा भ्रामक बातम्यांपासून सावध राहण्याचं
आवाहन सरकारकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
****
ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत
भूषण यांनी न्यायालय अवमानना प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी सर्वोच्च
न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत प्रशांत भूषण यांनी आपलं उत्तर दाखल केलं आहे. न्यायालयाची
माफी मागितल्याने, आपल्या विवेकाचा अवमान होईल, असं त्यांनी या उत्तरात म्हटलं आहे.
आपल्या दोन ट्विट मुळे प्रशांत भूषण हे न्यायालय अवमानना प्रकरणात दोषी ठरले आहेत.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत
मृत्यू प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयच्या पथकानं सुशांतचा मित्र
सिद्धार्थ पिठानी याची आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली. पिठानीची कालही पाच तास चौकशी
झाली होती.
दरम्यान, सुशांतची मैत्रीण
अभिनेत्री रिया चक्रवर्ती किंवा तिच्या कुटुंबीयांना अद्याप सीबीआयकडून कोणतंही समन्स
मिळालेलं नाही, असं तिच्या वकिलांनी सांगितलं आहे. रियाला सीबीआयकडून बोलावणं येईल,
त्यावेळी ती चौकशीसाठी हजर होईल, असंही तिच्या वकिलांनी म्हटलं आहे.
****
अभिनेता सुशांत
सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे गेला, हे एक प्रकारे योग्यचं झाल्याचं अन्न
आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज
नाशिक इथं कोविड स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी
बोलत होते. नाशिक जिल्ह्यात मिशन झिरो अंर्तगत कोविड रुग्णांचा शोध घेतला जात असल्यानं
रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र जिल्ह्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देशात अधिक आहे,
अशी माहिती त्यांनी दिली.
पश्चिम वाहिन्यांच्या
नद्यांच पाणी नाशिक जिल्ह्यात वळवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात
सांगितलं. तीन पक्षांचं सरकार असून निधीच्या मागणीवरून नाराज असलेल्यांशी चर्चा करु
असं सांगत, सरकार मजबूत असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.
****
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड
शहर आणि परिसरात आज मोठा हादरा बसणारा आवाज झाला. याप्रकरणी शोध सुरू असल्याची माहिती
गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. या हादऱ्यामुळं अनेक घरात काही
प्रमाणात नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात
आज पावसानं उघडीप दिल्यानं जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. काही नद्यांचा पूर ओसरल्यानं
महत्वाचे मार्ग सुरू झाले असून अद्याप असरअली-सोमनपल्ली आणि झिंगानूर-रोमपल्ली, पुल्लीगुडम-किष्टय्यापल्ली
आणि कोर्ला हे सिरोंचा तालुक्यातील मार्ग बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात गेल्या
१५ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसानं आज उघडीप दिल्यानं इथं आज सूर्यदर्शन झालं आहे.
आतापर्यंत अमरावती शहरात ८३६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
दरम्यान, शहानूर धरण ९० टक्के
भरल्यानं या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना
सर्तकतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातल्या सापन प्रकल्पाचेही दोन
दरवाजे आज उघडण्यात आले असून यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं आज दुपारच्या सुमारास सापण नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला. यामुळं परतवाडा चिखलदरा
मार्ग बंद झाला आहे.
****
शिवछत्रपती पुरस्कार विजेते
आंतराष्ट्रीय जिमनॅस्ट आदित्य तळेगावकर यांचं आज औरंगाबाद इथं निधन झालं, ते २४ वर्षांचे
होते. गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियानं आजारी असल्यानं त्यांच्यावर औरंगाबाद इथं
खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २०१६ ला कोरिया इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टीक
स्पर्धेत ते सहभागी झाले होते. आदित्यच्या निधनाबद्दल क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली
असून, एक उदयोन्मुख खेळाडू गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
****
हिंगोली शहरात आज रिपब्लिक
पक्षाकडून विविध मागण्यांसाठी पालिकेवर चिखलफेक आंदोलन करण्यात आलं. शहरातील विविध
भागात कायमस्वरुपी रस्ते नसल्यानं नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून याकडे पालिका
अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचं सांगत, रिपब्लिक सेनेचे जिल्हाअध्यक्ष किरण घोंगडे
यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. याप्रकरणी एकूण पंधरा आंदोलकांवर गुन्हे
दाखल करण्यात आले आहेत.
****
धुळे जिल्ह्यात
हाडाखेड तपासणी नाक्याजवळ काल गुटख्याची चोरटी वाहतुक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला.
या कारवाईत १२ लाखाहुन अधिक किंमतीचा गुटखा, सुंगधी सुपारी आणि ट्रक असा एकुण ३२ लाख
७० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक
पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून
हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा
भाग असेल.
****
No comments:
Post a Comment