आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ ऑक्टोबर २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
मुंबई नजिक समुद्रात
खासगी जहाजावर काल रात्री उशीरा सुरु असलेल्या मेजवाणी समारंभात अमली पदार्थ सेवन प्रकरणी
जवळपास दहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. अमली पदार्थ नियंत्रण विभाग-एन.सी.बी. मुंबईच्या
पथकानं छापे टाकून ही धडक कारवाई केल्याचं कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्याच्या मुलासह अतिरिक्त
पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी तसंच तीन मुलिंचाही समावेश आहे.
अमली पदार्थांचा
मोठा साठा यावेळी जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
****
छोट्या शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी अधिक
सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. एका
इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. कृषि कायद्याबाबत शेतकऱ्यांशी
चर्चा करायला सरकारनं सुरुवातीपासूनच तयारी दाखवली होती असंही ते म्हणाले. या कायद्यासंदर्भात
आजवर अनेक बैठका झाल्या मात्र नेमका कोणता मुद्दा बदलायचा आहे, हे आंदोलक शेतकरी स्पष्ट करु शकले नाहीत असंही त्यांनी सांगितलं. इतकी
जास्त लोकसंख्या असलेल्या देशात एका मुद्यावर सगळ्यांचं एकमत होणं कठीण असल्याचंही
ते म्हणाले. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यात काही आश्वासनं देतात पण जिंकल्यानंतर घूमजाव करतात, असंही पंतप्रधान म्हणाले. शेतकरी सुधारणांचा सध्या जे विरोध करत आहेत ते राजकीयदृष्ट्या
अप्रामाणिक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
देशानं काल ९० कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मात्रा देण्याचा टप्पा पूर्ण केला. आरोग्यमंत्री मनसुख
मांडविय यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली. देशात आता सक्रीय रूग्णांची असलेली संख्या १९७ दिवसात सगळ्यात कमी आहे.
देशात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ८६ शतांश टक्के इतकं झालं असून ते गेल्या
मार्चपासूनचं सर्वाधिक आहे. आत्तापर्यत देशभरात ५७ कोटी १९ लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
****
परभणी-मानवत
रस्त्याचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल या संबंधीत कार्यकारी अभियंत्याच्या
लेखी आश्वासनानंतर खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वातील रस्तारोको आंदोलन काल मागे घेण्यात आलं.
****
परभणी
जिल्ह्याच्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाचे सहा दरवाजे काल सकाळी
उघडून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहनही प्रकल्प कक्षानं
केलं आहे.
****
येत्या ३६ तासांत मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड
तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान
विभागानं वर्तवली आहे. दरम्यान बुधवारी सहा तारखेपर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर असणार
असून बऱ्याच ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दर्शवली
आहे.
****
No comments:
Post a Comment