Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत २१ पूर्णांक
२२ टक्के मतदान झालं. यासह १४ राज्यात विधानसभेच्या ३० जागांसाठी, तसंच मध्य प्रदेशातल्या
खांडवा, हिमाचल प्रदेशातील मंडी तसंच दादरा आणि नगर हवेली या तीन लोकसभा मतदार संघाच्या
पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज व्हॅटिकन सिटी इथं कॅथॉलिक धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांची भेट
घेतली.
पंतप्रधान
आज इटलीची राजधानी रोम इथं होणाऱ्या सोळाव्या जी ट्वेंटी शिखर संमेलनात सहभागी होत
आहेत. जागतिक आर्थिक सुधारणा, ऊर्जेची वाढती किंमत, कोविड लसीकरण आणि जलवायु संकटावर
या संमेलनात चर्चा होणार आहे.
दरम्यान,
काल पंतप्रधानांनी रोम इथं इटलीचे पंतप्रधान मारिओ द्रागी यांच्यासोबत प्रतिनिधी मंडळ
स्तरावर चर्चा केली. भारत आणि इटली यांच्यात द्विपक्षीय भागीदारीतील २०२० ते २०२५ या
कालावधीसाठीच्या कृती योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला, तसंच व्यापार आणि गुंतवणूक
वाढवण्याचा पुनरुच्चार केला.
****
देशात कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १०५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात
देशात ५६ लाख ९१ हजार १७५ नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या १०५
कोटी ४३ लाख १३ हजार ९७७ मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ७३ कोटी पाच लाखांहून
अधिक नागरीकांना लसीची पहिली मात्रा, तर ३२ कोट ४१ लाखांहून अधिक नागरीकांना दोन्ही
मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या १४ हजार ३१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५४९ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४२ लाख
६० हजार ४७० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५७ हजार ७४० रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल १३ हजार ५४३ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३६ लाख ४१ हजार
१७५ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६१ हजार ५५५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
केंद्र सरकारच्या
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात न्यूमोनियाच्या लसीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या
अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून हा समावेश काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय
यांच्या हस्ते औपचारिकरीत्या करण्यात आला. या लसीबाबत जनजागृती करणाऱ्या विविध मोहिमांचं
प्रकाशनही त्यांनी केलं. पोलिओ, क्षय, डांग्या खोकला, गोवर अशा १२ गंभीर आजारांना प्रतिबंधक
लसी सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाद्वारे सर्व बालकांना आणि आवश्यक तिथे गर्भवती
मातांना मोफत दिल्या जातात. देशात पाच वर्षाच्या आतली १६ टक्के मुलं न्यूमोनियामुळे
मरण पावतात, असं सांगून मांडवीय यांनी, या लसीमुळे हे प्रमाण ६० टक्के कमी होण्याची
अपेक्षा व्यक्त केली.
****
ओबीसी, व्हीजेएनटी,
एसबीसी प्रवर्गातल्या, दहावीनंतर पुढचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
देण्यासाठी, २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये राज्य शासनानं मंजूर केले आहेत. इतर मागास
बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. ही रक्कम महाडीबिटी प्रणालीद्वारे
वितरित केली जाणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये ४३६ कोटी रुपये रक्कम वितरित करायला
मान्यता दिली होती.
****
मराठवाड्यात
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत, दिवाळीपूर्वी
मिळण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.
हिंगोली
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम अंतिम
टप्प्यात असून, अनुदानास पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम दिवाळीपूर्वी
जमा करण्याचे प्रशासन प्रयत्न करत असल्याचं, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं
आहे. जिल्ह्यातल्या सर्व तहसीलदारांकडे अनुदानाची रक्कम सुपूर्द करण्यात आली असून,
ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्याची सूचना देण्यात आली असल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यासाठी
पहिल्या टप्यातला मदतीचा निधी जिल्हा प्रशासन तसंच तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात
आला आहे. जिल्हा तसंच बँक प्रशासनाने ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन पालकमंत्री
अमित देशमुख यांनी केलं आहे. पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यासाठी ३३६ कोटी रूपयांचा
निधी प्राप्त झाला आहे.
****
शहर स्वच्छता
आणि कचरा वर्गीकरणासाठी लातूर महानगरपालिकेने घेतलेल्या स्पर्धेचा निकाल काल जाहीर
झाला. घरातला ओला, सुका तसंच घातक कचरा नियमितपणे वेगवेगळा करून देणारे शहराच्या चार
प्रभागातले ८७ नागरिक या स्पर्धेत विजेते ठरले. सर्व विजेत्यांना काल महापौर विक्रांत
गोजमगुंडे यांच्या हस्ते बक्षीस म्हणून चांदीची नाणी प्रदान करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment