आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ ऑक्टोबर
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या
धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता,
वार्षिक वेतनवाढीचा दर लागू करावा, तसंच दिवाळीपूर्वी थकबाकीची रक्कम एकरकमी द्यावी,
या मागणीसाठी एसटी महामंडळातल्या श्रमिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं, कालपासून
राज्यभर बेमुदत उपोषण पुकारलं आहे. औरंगाबाद इथं चालक आणि वाहक आज सकाळपासून कामावर
हजर न झाल्यामुळे स्मार्ट शहर बससेवा विस्कळीत झाली आहे. सर्व प्रवाश्यांनी याची नोंद
घ्यावी, असं औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बससेवा प्रमुख सिद्धार्थ बनसोड यांनी
कळवलं आहे.
****
ई-न्यायालय प्रकल्पांतर्गत
राज्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं शुल्क भरणा करण्यासाठी, ६९०
भरणा केंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार, उच्च न्यायालय आणि भारतीय
स्टेट बँकेत काल करार करण्यात आला. राज्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये ही भरणा केंद्र
उभारली जाणार आहेत. अशा प्रकारचा प्रयोग करणारं मुंबई उच्च न्यायालय हे देशातलं पहिलं
न्यायालय आहे.
****
एयर इंडियाला देणं असलेली
सर्व रक्कम सर्व केंद्रीय मंत्रालयं आणि विभागांनी जमा करावी आणि या कंपनीकडून विमान
तिकीटं रोखीनं खरेदी करण्याचे निर्देश, वित्त मंत्रालयानं दिले आहेत. एयर इंडिया विमान
तिकिटांची क्रेडिट सुविधा थांबवल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.
****
राज्यातल्या शाळांना आजपासून
ते दहा नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या जाहीर झाल्या आहेत. यासंदर्भातला सुधारीत
शासन निर्णय काल शालेय शिक्षण विभागानं जाहीर केला.
****
नांदेड इथले शेतकरी संघटनेचे
नेते तथा प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब देशमुख धानोरकर यांचं काल नांदेड इथं निधन झालं,
ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर-परभणी
मार्गावर चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या एकाचा
मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल सायंकाळी ही घटना घडली.
****
No comments:
Post a Comment