आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ ऑक्टोबर
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
सोळाव्या जी
ट्वेंटी समिटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीची राजधानी रोम इथं पोहोचले. उद्या
आणि परवा ३१ ऑक्टोबरला ही समिट होणार आहे. हवामान बदलाविषयक संयुक्त राष्ट्राच्या करारात
सहभागी असलेल्या देशांच्या या परिषदेत आपण हवामान बदलाच्या समस्या सर्वंकष पद्धतीनं
सोडवण्याची गरज अधोरेखीत करणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
भारतीय तटरक्षक
दलाच्या ‘सार्थक’ या स्वदेशी बनावटीच्या नौकेचं राष्ट्रार्पण काल गोव्यात झालं. या नौकेचा
तळ पोरबंदर इथं असेल आणि पश्चिम सागरकिनाऱ्यावर ती कार्यान्वित राहील. आत्मनिर्भर भारत
मोहिमेअंतर्गत निर्माण ही नौका असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रसामग्रीनं ती
सुसज्ज आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, काल नवी दिल्लीत किनारी सुरक्षा व्यवस्थेविषयक सल्लागार
समितीची बैठक झाली. या बैठकीत दिलेल्या सूचनांचा विचार करुन, सर्व राज्यांच्या मदतीनं,
किनारी सुरक्षा अभेद्य बनवण्यासाठी योग्य आणि आवश्यक ती पावलं उचलली जाणार आहेत, असं
शहा यांनी म्हटलं आहे.
****
राज्य मार्ग
परिवहन महामंडळ- एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई
भत्ता आणि घरभाडे भत्यात वाढ करण्यात आली आहे. परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे
अध्यक्ष अनिल परब यांनी काल ही घोषणा केली.
****
हिंगोली जिल्ह्यात
वसमत इथल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचा वनरक्षक संदीप पंडित याला आठ हजार रुपयांची लाच
घेताना काल रंगेहात पकडण्यात आलं. लाकडांच्या वाहतुकीसाठी प्रतिट्रॅक्टर दोन हजार रुपये
प्रमाणे, त्यानं ही लाच मागितली होती. याप्रकरणी वनरक्षकासह महिला वनपाल प्रियंका देवतकर
हिच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
दोन लाख रुपयांचं
बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे.
मुडा मासा झोही आणि मैनु दोरपेटी अशी या नक्षलवाद्यांची नावं आहेत. हे नक्षलवादी विविध
गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांतले आरोपी आहेत.
****
मराठवाड्यात
काल ७१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर बीड जिल्ह्यात एका रुग्णाचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment