Friday, 29 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** ईडीचं समन्स रद्द करण्याबाबत अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

** पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही लीटरमागे ३५ पैशांनी वाढ

** जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनांचं राज्यभर ठिय्या आंदोलन

आणि

** मराठवाड्यात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याचे प्रशासनाचे संकेत

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची, सक्तवसुली संचलनालय - ईडीने पाठवलेलं समन्स रद्द करण्यात यावं अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. याप्रकरणी गेल्या १३ ऑक्टोबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या पीठानं या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला होता. याप्रकरणी आज उच्च न्यायालयानं अनिल देशमुख यांची मागणी फेटाळून लावली आहे.

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षांसाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईत उपनगरी रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी द्यावी असं पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे परीक्षेच्या कामाशी निगडित संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही एका दिवसाकरता प्रवास करण्याची मुभा द्यावी तसंच गरज भासल्यास परीक्षा प्रवेश पत्र, कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र आणि परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेलं प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

****

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी ठार मारण्याची धमकी दिली आहे. पालकमंत्री शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या भामरागढ एरिया कमिटीच्या नावानं आलेल्या पत्रात अशी धमकी देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

****

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही लीटरमागे ३५ पैशांनी वाढ झाली. मुंबईत पेट्रोलचे दर आता प्रतिलीटर ११४ रुपये ४७ पैसे तर डीझेलचे दर १०५ रुपये ४९ पैसे एवढे झाले आहेत.

****

अन्न व्यावसायिकांनी दिवाळीच्या काळात आवश्यक परवाना किंवा नोंदणी करूनच व्यवसाय सुरु करावा, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सणासुदीच्या दिवसात मिठाई आणि फराळाचे पदार्थ यांना मोठया प्रमाणात मागणी वाढते. या दिवसात बरेच लोक व्यावसायिक दृष्ट्या मिठाई आणि फराळाचे पदार्थ उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय सुरु करतात. यासाठी परवाना आणि नोंदणीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. येत्या १३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत नवमतदारांची नोंदणी तसंच मतदार यादीतील दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा नवमतदारांनी आणि यादीत दुरुस्ती सुचवू पाहणाऱ्या मतदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत त्यांनी ही माहिती दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातही याच कालावधित मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन या मोहिमेचा नवमतदारांनी आणि यादीत दुरुस्ती सुचवू पाहणाऱ्या मतदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

****

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यभर ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आज ठिय्या आंदोलन केलं. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

****

मराठवाड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत, दिवाळीपूर्वी मिळण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. हिंगोली तसंच लातूर जिल्हा प्रशासनाकडे मदतीची रक्कम राज्य सरकारनं वर्ग केली आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात असून अनुदानास पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम दिवाळीपूर्वी जमा करण्याचे प्रशासन प्रयत्न करत असल्याचं, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे.  जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडे अनुदानाची रक्कम सुपूर्द करण्यात आली असून ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्याची सूचना देण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर केली असून लातूर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्यातील मदतीचा निधी जिल्हा प्रशासन तसंच तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा तसंच बँक प्रशासनाने ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, असं आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यासाठी ३३६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

****

धुळे तालुक्यातील खोरदड ग्रामपंचायतीमध्ये आज आझादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिक मुक्त भारत आणि श्रमदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यकमात नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा युवा समन्वयक अशोक कुमार मेघवाल सहभागी झाले. या कार्यक्रमांतर्गत मेघवाल यांनी स्वच्छतेचा संदेश देऊन विघटन होणाऱ्या पिशवीच्या वापराविषयीं माहिती दिली आणि स्वच्छतेची शपथ घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातील आधार केंद्र चालकांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणेच शुल्क आकारावं, अशी सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. आधार अद्ययावतीकरणासाठी ५० रुपये तर आधार पत्राची रंगीत प्रत घेण्यासाठी ३० रुपये शुल्क निर्धारित आहे. निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या आधार केंद्र चालकांविरोधात ग्राहकाची तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा उपजिल्हाधिकारी कुंडेटकर यांनी दिला आहे.

****

 

 

No comments: