Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे
डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात,
चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या
मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय
कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता देण्याचा निर्णय
·
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी
घेतलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास, सर्वोच्च न्यायालयाची
परवानगी
·
अंगणवाडी सेविका, मदतनीस
आणि मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना, दिवाळीनिमित्त दोन हजार रूपयांची भाऊबीज
·
अंमली पदार्थ पार्टी प्रकरणी
आर्यन खानसह तिघांना जामीन, फरार किरण गोसावीला अटक तर अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे
संचालक समीर वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवस आधी नोटीस देण्याचे न्यायालयाचे
आदेश
·
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त
परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी
·
राज्यात एक हजार ४१८ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात एकाचा मृत्यू तर ७१ बाधित
आणि
·
संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ
यू. म. पठाण, आणि वाङ्मयाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर म्हैसाळकर यांना
प्राचार्य राम शेवाळकर पुरस्कार
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ-
एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे
भत्यात वाढ करण्यात आली आहे. परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब
यांनी काल ही घोषणा केली. याविषयी माहिती देतांना ते म्हणाले…
कर्मचाऱ्यांची
जी मागणी होती की जो मागच्या वेळी करार झाला होता. आणि या कराराच्या अंतर्गत ज्या दोन
गोष्टी होत्या. जो त्यांचा महागाई भत्ता होता तो आता १२ टक्क्यांवरुन २८ टक्के मान्य
करण्यात आला आहे. त्याचबरोबर घरभाडे भत्ता देखील तो मान्य केलेला आहे. आणि त्यामुळे
त्यांचा एक मुद्दा जो राहिलेला आहे त्यांचा इन्क्रीमेंटचा जो कराराचा जो भाग आहे त्याच्यावरती
चर्चा दिवाळीच्या नंतर करण्यात येईल. अशा त्यांच्या ज्या या मागण्या होत्या.या मागण्यांवर
यशस्वी चर्चा होवून हा विषय इथं संपलेला आहे.
दरम्यान, या घोषणेमुळे एसटी
कर्मचार्यांनी दोन दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन काल मागे घेतलं. या राज्यव्यापी
आंदोलनामुळे काल ठिकठिकाणी बस सेवा ठप्प झाली होती. परिवहन मंत्री परब यांच्याशी झालेल्या
चर्चेनंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं असल्याचं, कर्मचारी संयुक्त कृती समितीनं सांगितलं.
****
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी
घेतलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता - नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास, सर्वोच्च
न्यायालयानं परवानगी दिली आहे. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेत त्रुटी असल्याचं सांगत
दोन विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी
करताना मुंबई उच्च न्यायालयानं, परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती.
दोन विद्यार्थ्यांसाठी सोळा लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी ठेवता येणार नाही,
असं नमूद करत सर्वोच्च न्यायालयानं निकाल जाहीर करण्यास अनुमती दिली.
****
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत
कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना, दिवाळीनिमित्त
दोन हजार रूपये भाऊबीज भेट देण्याचे आदेश, काल जारी करण्यात आले. महिला आणि बालविकास
मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. यासाठी चालू आर्थिक वर्षात एकूण ३७ कोटी
९७ लाख ३२ हजार इतका निधी उपलब्ध करून दिला असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
मुंबईत क्रुझवरची अंमली पदार्थ
पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान तसंच मुनमुन धमेचा
आणि अरबाज मर्चंट या तिघांना, मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला आहे. ज्येष्ठ
वकील मुकुल रोहतगी यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातलं निकालपत्र न्यायालय आज देणार
असून, त्यानंतर आज किंवा उद्या आर्यन कारागृहातून बाहेर येईल, असं रोहतगी म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणानंतर
चर्चेत असलेल्या आणि पुणे पोलिसांनी फरार घोषित केलेल्या किरण गोसावीला ताब्यात घेण्यात
आलं आहे, अशी माहिती, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. त्यानं शरणागती
पत्करली नसून, गुप्त माहिती आधारे त्याला अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
अंमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोचे
विभागीय संचालक समीर वानखेडे यांनाही दिलासा मिळाला असून, अटक करण्यापूर्वी तीन दिवस
आधी नोटीस द्यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. क्रूझ कारवाई प्रकरणी
तपासात अडथळे आणण्यासाठी खोटेनाटे आरोप करुन आपल्याला अटक केली जाऊ शकते, अशा आशयाची
याचिका वानखेडे यांनी न्यायालयात दाखल केली आहे.
****
ठाण्यातल्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केलं
आहे. गेल्या २६ तारखेला हे वारंट जारी करण्यात आलं आहे. भारतीय दंड संहितेची विविध
कलमं आणि शस्त्रास्र कायद्यांच्या अंतर्गत त्यांच्याविरोधात असलेल्या आरोपांवरुन हे
वाॉरंट जारी करण्यात आलं आहे. ठाण्यात कोपरी आणि ठाणे नगर पोलिसात परमबीर सिंग यांच्याविरोधात
गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात मदतीसाठी ठाणे पोलिसांनी मलबार हिल पोलिसांना पत्र दिलं
आहे.
****
देशात फटाक्यांवर बंदी घालण्याचा
निर्णय कुणा एका समुदायाच्या विरोधात नाही, केवळ आनंदासाठी नागरीकांच्या हक्कांची पायमल्ली
करण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. फटाक्यांसंबंधी
न्यायालयाच्या दोन आदेशांची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं, न्यायमूर्ती एम आर शहा
आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठानं सांगितलं. आनंदासाठी उत्पादक हे सामान्य
लोकांच्या जीवाशी खेळू शकत नाही, असं सांगताना न्यायालयानं, सर्वच प्रकारच्या फटाक्यांवर
बंदी घातली नसल्याचं नमूद केलं. न्यायालयीन आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च
न्यायालयानं सहा उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस बजावत या सर्वांना शिक्षा का करु नये,
असा सवाल केला आहे. सध्या केवळ हरीत फटाक्यांनाच परवानगी असून, फटाक्यांच्या ऑनलाईन
विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
****
राज्यात काल एक हजार ४१८
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६६ लाख सात हजार, ९५४ झाली आहे. काल ३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार १३४ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल दोन हजार १२१ रुग्ण बरे झाले,
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ४५ हजार ४५४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १८ हजार
७४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ७१ नवीन
कोविड बाधितांची नोंद झाली, तर बीड जिल्ह्यात एका मृत्यूची नोंद झाली.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
२५ नवे रुग्ण आढळले, लातूर जिल्ह्यात १३, औरंगाबाद १२, बीड दहा, नांदेड सहा, जालना
चार, तर परभणी जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला
एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
अखिल भारतीय मराठी साहित्य
महामंडळाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या प्राचार्य राम शेवाळकर पुरस्कारासाठी, यंदा संत
वाड्मयाचे अभ्यासक डॉ यू. म. पठाण, आणि वाङ्मयाच्या क्षेत्रात संस्थात्मक काम करणारे
ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर म्हैसाळकर, यांची निवड झाली आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव
ठाले पाटील यांनी काल औरंगाबादमध्ये ही घोषणा केली. प्रत्येकी एक लाख रुपयांचा हा पुरस्कार
आहे.
****
राज्यातल्या उत्कृष्ट औद्योगिक
प्रशिक्षण संस्थांना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या
हस्ते काल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यवतमाळ शासकीय आयटीआयला पाच लाख रुपयांचा
प्रथम पुरस्कार मिळाला असून, औरंगाबाद शासकीय आयटीआयला तीन लाख रुपयांचा द्वितीय, तर
कुर्ला इथल्या डॉन बॉस्को खाजगी आयटीआयला, दोन लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार प्रदान
करण्यात आला. राष्ट्रीय कौशल्याचार्य पुरस्कार विजेत्या आयटीआय शिक्षक -शिल्पनिदेशकांनाही,
यावेळी मलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. विभागीय स्तरावरच्या पुरस्कारांमध्ये
औरंगाबादच्या मुलींच्या शासकीय आयटीआयला एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र
देऊन गौरव करण्यात आलं.
****
नांदेड शहर आणि जिल्ह्यात
दिवाळी निमित्त येणाऱ्या सर्व नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लस घेऊन
अधिक दक्षता घ्यावी, बाहेरगावी जाणार्यांनी लसीकरण करुनच जावं, असं आवाहन नांदेडचे
जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी केलं. जिल्ह्यातल्या सर्व शासकीच रूग्णालयं, ग्रामपंचायत
कार्यालयं आणि अंगणवाडी केंद्रात येत्या ३० तारखेपर्यंत २४ तास लसीकरण सुरू राहणार
असल्याची माहितीही इटनकर दिली.
****
आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत,
'स्वातंत्र्याच्या आंदोलनात होमरूल चळवळीचे योगदान', या विषयावर, मुंबईच्या माटुंगा
इथल्या रामनारायण रुईया महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रदीप वाघमारे यांनी दिलेलं व्याख्यान
आज आपण ऐकणार आहात. या चळवळीतील डॉ. ॲनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले..
होमरुल चळवळ म्हणजे काय
? तर होमरुल चळवळ म्हणजे स्व-शासन, आणि होमरुल म्हणजे स्वराज्य आणि स्वराज्याची संकल्पना
याची मागणी लोकमान्य टिळकांनी अगोदरच केलेली होती. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि
राष्ट्रीय शिक्षण ही चार सुत्रे होती. होमरुल चळवळ भारतामध्ये सुरु करण्यामध्ये डॉ.
ॲनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी महत्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे
आज संध्याकाळी सहा वाजून
पस्तीस मिनिटांनी हे व्याख्यान आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारीत होईल. आपण हे व्याख्यान
आमच्या आकाशवाणी समाचार औरंगाबाद या युट्यूब चॅनेलवर थेट आणि पुन्हा कधीही ऐकु शकाल.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानापोटी, तालुक्यातल्या ३७ गावांमधल्या शेतकऱ्यांच्या
खात्यावर, पाच कोटी दहा लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. तहसीलदार पल्लवी टेमकर
यांनी ही माहिती दिली. हेक्टरी सहा हजार आठशे रूपयांप्रमाणे हे अनुदान जमा करण्यात
आलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर-आष्टी
मार्गावर कार आणि रिक्षाची समोरासमोर होऊन धडक होऊन झालेल्या अपघातात मंठा इथल्या एकाच
कुटुंबातल्या तिघांचं मृत्यू झाला. काल संध्याकाळी हा अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेस
चार वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या अपघातात अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले.
****
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या
शहागड इथल्या बुलढाणा नागरी सहकारी पतसंस्थेवर काल सायंकाळी सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी
बँक कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सुमारे २६ लाख रुपयांची रोकड आणि एक कोटी रुपयांचं
सोनं लंपास केल्याचा अंदाज आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर
तालुक्यातल्या जवळगाव इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त, कवचकुंडल
अभियानांतर्गत कोविड लसीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,
ग्रामसेवक, शिक्षक, गुरूदेव सेवामंडळाचे साधक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment