Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार
केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना ‘आकाशवाणीचा
सलाम’. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही
मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात
काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा.
कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या
राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
· आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियानांतर्गत प्रत्येक
जिल्ह्यात आरोग्य सुविधांसाठी १०० कोटी रुपये - केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती.
· वैद्यकीय सेवा, दूरसंचार, गॅस पुरवठा, पाणीपुरवठा क्षेत्रातील
कर्मचारी तसंच शासकीय अधिकाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं अनिवार्य.
· राज्यात प्रत्येक औद्योगिक विकास क्षेत्रात लॉजिस्टिक हब कार्यान्वित
करण्यात येणार.
आणि
· कोविडच्या दुसऱ्या लाटेवर ९० टक्के नियंत्रण मिळवण्यात राज्य
सरकारला यश.
****
आयुष्मान भारत आरोग्यदायी
पायाभूत सुविधा अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांसाठी किमान ९० ते १००
कोटी रुपये खर्च केला जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी
दिली. ते आज नवी दिल्ली इथं यासंदर्भातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या अभियानांतर्गत
१३४ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या जिल्हास्तरावर मोफत केल्या जातील, अशी माहिती त्यांनी
दिली. कंटेनरवर आधारित रेल्वेमध्ये २ रुग्णालयं सुरू केली जाणार असून, देशाच्या ज्या
कोपऱ्यात वैद्यकीय सुविधेची गरज असेल तिथे या रेल्वे नेल्या जातील आणि वैद्यकीय सुविधा
पुरवल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. एका रेल्वेत २२ कंटेनर असतील आणि त्यात १००
खाटांची सुविधा उपलब्ध असेल. दक्षिण आशियामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची सुविधा उपलब्ध
होणार आहे.
****
क्षयरोग निर्मूलनासाठी नवसंशोधनांचा
वापर करण्याची गरज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी
व्यक्त केली आहे. क्षयरोग निर्मूलन संबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया
प्रांताच्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित करताना, डॉ पवार यांनी, कोविड महामारीने आपल्याला
अनेक बाबतीत धडे दिले असून क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये त्यांची मदत होईल,
असा विश्वास व्यक्त केला.
*****
राज्य सरकारनं आता कोविड
लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच उपनगरी रेल्वेचा मासिक पास देण्याचा निर्णय घेतला
आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ओळखपत्रावर रेल्वेचा पास मिळणार
नाही. कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांना
आपत्ती निवारण विभागाकडून मिळणाऱ्या युनिवर्सल पासच्याच आधारे रेल्वे प्रवास करता येईल.
या सर्वांना मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही पास मिळू शकतील असं राज्याचे मुख्य सचिव
सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
राज्यातील वैद्यकीय सेवा
कर्मचारी, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, पाणीपुरवठा क्षेत्रातील कर्मचारी तसंच शासकीय
अधिकारी यांना आता कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं अनिवार्य करण्यात आलं
आहे. या पूर्वी या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी
लस घेतली किंवा नाही याचा विचार न करता पास देण्यात येत होते. आता लसींचा मुबलक साठा
उपलब्ध असून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही सुरळीत
होत असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
राज्यातील महिला बचत
गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले असून या महिला उद्योग व्यवसायात
यशस्वीपणे उभ्या आहेत. या यशस्वी बचतगटांतील महिलाच्या यशकथा उत्तमरित्या लिहित्या
जाव्यात आणि त्याचं संकलन व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र राज्य ग्रामीण
जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं ‘कथा यशस्वींनीच्या’ ही राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी
होण्यासाठी उमेदवारानं कर्मचारी किंवा महिला बचत गटाचा सदस्य असणं आवश्यक
असून यशकथा मराठी भाषेत, कमाल साडे सातशे शब्दांत आणि
युनिकोड फॉन्टमध्ये लिहिलेली असावी. ही
स्पर्धा जिल्हा आणि तालुका स्तरावर होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना
राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक म्हणून २१ हजार रूपये आणि
सन्मानपत्र, द्वितीय पारितोषिक रूपये १५ हजार आणि सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक ११ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह तसंच एकवीसशे रुपयाची
प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ पारितोषिकं दिली जाणार आहेत.
****
राज्यातील प्रत्येक औद्योगिक विकास क्षेत्र- एमआयडीसीत लॉजिस्टिक हब कार्यान्वित
करण्यात येणार असून त्याला उद्योजकांनी प्रतिसाद द्यावा, असं आवाहन राज्याचे उद्योग,
खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. आज धुळे इथं, देसाई
यांच्या हस्ते एमआयडीसीत वेअर हाऊसिंग प्रकल्पाचं भूमिपूजन आणि खानदेश चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या
फलकाचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. उद्योगांचं विकेंद्रीकरण होवून
सर्व भागाचा समान पध्दतीनं विकास होण्यासाठी राज्य शासनानं विविध सवलती आणि प्रोत्साहन
देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगांसाठी आवश्यक भूसंपादनाच्या बाबतीत
प्रत्येक घटकानं सामंजस्याची भूमिका घ्यावी. जेणेकरून आपापल्या भागात उद्योग- व्यवसायांची
भरभराट होवून रोजगाराची निर्मिती होईल, असं देसाई यांनी नमूद केलं.
****
कोविडच्या दुसऱ्या लाटेवर ९० टक्के
नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश मिळालं आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष
राजेश क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. क्षीरसागर यांनी आज औरंगाबाद इथं विभागातल्या
सर्व जिल्ह्यांची विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार
परिषदेत बोलत होते. मनुष्यबळ विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून औरंगाबाद विभागातल्या
जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड या पाच जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी
प्रयत्नशील राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.
*****
जालना जिल्ह्यात आज एक नवीन कोरोना
बाधित रुग्ण आढळून आला. तर कोरोना विषाणू संसगार्गातून मुक्त झालेल्या दहा रुग्णांना
सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले ६० हजार ६८७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
जिल्ह्यात सध्या बाधित असलेल्या फक्त २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
उस्मानाबाद इथं आजपासून ते येत्या १
नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबादच्या वतीनं या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम
आयोजीत करण्यात आले आहेत. केंद्रीय दक्षता आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार
भारतीय स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सवा निमित्तानं 'सचोटीतून आत्मनिर्भरतेकड़े' ही संकल्पना
घेऊन या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातील
प्रवाशांकरता पूर्णा ते तिरुपती दरम्यान विशेष रेल्वेगाडीला नोव्हेंबर महिन्यात मुदतवाढ
दिली आहे. ही गाडी १, ८, १५, २२, २९ नोव्हेंबरला पूर्णेहून तिरुपतीसाठी निघेल, तर २,
९, १६, २३, ३० नोव्हेंबर रोजी तिरुपतीहून पूर्णेसाठी परत निघणार आहे.
//************//
No comments:
Post a Comment