आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ ऑक्टोबर
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय एकता दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे.भारताचे पहिले गृहमंत्री
सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४६वी जयंती. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती रामनथ कोविंद यांनी
आज दिल्ली इथं पटेल चौकातील सरदार पटेलांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत अभिवादन केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्वीटर संदेशात सरदार पटेल यांनी इच्छाशक्ती,
सशक्त नेतृत्व आणि असिम देशभक्तीच्या जोरावर वैविध्यपूर्ण देशाला एकसंध ठेवत एक राष्ट्र
म्हणून प्रस्थापित केल्याचं सांगितलं.
गुजरात मधल्या केवडीया इथं सुप्रसिध्द ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार
पटेलांच्या भव्य पुतळ्याच्या ठिकाणी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या प्रमुख
उपस्थितीत पोलिस दलातर्फे विशेष संचलन तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं.
****
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आता १०६ कोटींहून अधिक संख्येचा
टप्पा यशस्वीरीत्या पार झाला आहे. आतापर्यंत १०६ कोटी, सात लाख ३९ हजार लसींच्या मात्रा
देशभरात देण्यात आल्या आहेत. त्यात काल दिवसभरात ६१ लाख ९९ हजारांहून अधिक जणांचं लसीकरण
झालं.
****
द्रुतगती महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठीच्या
रस्ता मापक- रोड मार्किंग यंत्राचं उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी
यांच्या हस्ते काल दिल्ली इथं झालं. गडकरी यांच्या ‘प्रगती का हायवे’ या अभियानाला
हे यंत्र समर्पित असून यंत्राला प्रगती - एन. जी. अर्थात नितिन गडकरी यांचंच नाव देण्यात
आलं आहे. नागपूरमध्ये विकसित हे यंत्र स्वयंचलित पद्धतीनं चार तासांपर्यंत रस्तेविषयक
मापन-नोंद घेऊ शकतं त्याद्वारे अपघातांवर आळा घालण्यास मदत होत असल्याचं यंत्राच्या
निर्मात्या उद्योजिका मनीषा नखाते यांनी सांगितलं आहे.
****
लातूर महापालिकेतर्फे शहर स्वच्छता-कचरा वर्गीकरणासाठी घेतलेल्या स्पर्धेचा
निकाल जाहीर झाला आहे. घरातला ओला, सुका तसंच घातक कचरा नियमितपणे वेगवेगळा करून देणारे
शहराच्या चार प्रभागातले ८७ नागरिक या स्पर्धेत विजेते ठरले. सर्व विजेत्यांना महापौर
विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते बक्षीस म्हणून चांदीची नाणी देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment