Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
भारताच्या
राज्यघटनेत विहित केलेल्या आदर्शांची भारतीय सशस्त्र दलांनी काळजीपूर्वक देखभाल केली
आहे, असं सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. देशानं गेल्या काही वर्षांत
जी आर्थिक प्रगती पाहिली आहे, त्याचं श्रेय या दलांनी सीमेवर आणि अंतर्गतरित्या निर्माण
केलेल्या शांततापूर्ण वातावरणाला दिलं जाऊ शकतं असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘राष्ट्र
उभारणीत भारतीय सशस्त्र दलांची भूमिका’ या विषयावर आकाशवाणीतर्फे आयोजित सरदार पटेल
वार्षिक स्मृती व्याख्यानात ते नवी दिल्ली इथं बोलत होते. ‘हर काम देश के नाम’ या भावनेनं
या दलांनी आपलं ध्येय पूर्ण केलं आहे, असे कौतुकोद्गार रावत यांनी यावेळी काढले.
सरदार पटेल
यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हे व्याख्यान आज आकाशवाणीवर रात्री साडे नऊ वाजता तर दूरदर्शन
राष्ट्रीय वाहिनीवर दहा वाजता प्रसारित होणार आहे. पटेल स्मृती व्याख्यानाची १९५५ पासून
आकाशवाणीची वार्षिक परंपरा आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन
केलं आहे. यानिमित्त जाहिर दृकश्राव्य संदेशात सरदार पटेलांच्या प्रेरणेतूनच भारत सीमाबाह्य
आणि अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनला असल्याचं मोदी यांनी नमूद केलं आहे.
देशहिताला सर्वोच्च मानणाऱ्या पटेल यांचं शक्तीशाली, सर्वसमावेशक, संवेदनशील, सतर्क
आणि सभ्य भारत विकसित करण्याचा मानस होता, असं पंतप्रधान म्हणाले. या अनुषंगानं समाजात
विकसित लोकतंत्रामुळेच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या विचाराला बळकटी मिळाल्याचं मोदी म्हणाले.
****
जम्मू-काश्मीरच्या
नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ काल झालेल्या भूसुरुंग स्फोटात एक अधिकारी
आणि एक जवान शहीद झाले तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत
असताना हा स्फोट झाला, जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांची
प्रकृती गंभीर आहे. लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत बहादूर अशी शहिदांची नावं असून
लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसरायचे तर शिपाई मनजीत सिंग सिरवेवाला हे पंजाबमधील
भटिंडा येथील रहिवासी आहेत.
****
पेट्रोल-डिझेलच्या
किमतीत आज सलग पाचव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही आज प्रति लिटर ३५
पैशांनी महागलं आहे. कच्च्या तेलाच्या मागणी आणि पुरवठ्यात वाढत असलेल्या अंतरामुळे
सध्या इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या दरवाढीमुळे आता औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर
११५ रुपये ९४ पैसे तर डिझेलचा दर १०५ रूपये ३५ पैसे झाला आहे. परभणीत पेट्रोलचा दर
११८ रूपये २५ पैसे तर डिझेलचा दर १०७ रूपये ५८ पैसे प्रतिलिटर इतका झाला आहे.
दरम्यान,
इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी युवासेनेकडून सायकल रॅली आणि बैलगाडी मोर्चा
काढत निषेध करण्यात आला. औरंगाबाद, मुंबई, ठाणे, कोल्हापूर तसंच सोलापूर जिल्ह्यात
अशा प्रकारचा निषेध करण्यात आला.
****
प्रख्यात
व्हायोलिनवादक संगीतकार प्रभाकर जोग यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते ८९ वर्षांचे
होते. संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून गेल्या ६० वर्षांहून अधिक
काळ ते कार्यरत होते. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या संगीतात त्यांचं बहूमूल्य
योगदान आहे. संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं.
‘गीतरामायणा’तील गाण्यांना जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. राज्य सरकारतर्फे
दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, सूरसिंगार पुरस्कार, अखिल भारतीय मराठी
चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी, गदिमा पुरस्कार, पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे दिला
जाणारा वसुंधरा पंडित आदी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
****
भारतीय रिझर्व्ह
बँकेनं आता पाच कोटी रूपयांपेक्षा कमी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांसाठी चालू खात्यावरचे
निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. संबंधितांना निर्बंधांशिवाय चालू खाते तसंच कॅश क्रेडिट
आणि ओव्हरड्राफ्टच्या सुविधा उपलब्ध होतील. येत्या एका महिन्याच्या आत हे बदल अमलात
आणायला बँकाना सांगण्यात आलं आहे. अशा खातेदारांची कर्जाची रक्कम जर पाच कोटींहून अधिक
झाली तर त्यांना ते बँकेला कळवावं लागणार असून बँक तसं घोषणापत्रच लिहून घेईल. पाच
कोटींच्या वरील कर्जदारांना मात्र ज्या बँकेत त्यांनी कॅश क्रेडिट किंवा ओव्हर ड्राफ्टची
सुविधा घेतली असेल अशा बँकेत चालू खातं उघडावं लागणार आहे.
****
टी-२० क्रिकेट
जागतिक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. प्रारंभीच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध
पराभव पत्करावा लागल्यानं उपांत्य फेरीत प्रवेसासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं
आवश्यक आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची
शक्यता आहे.
****
पर्यटन अथवा
इतर कारणांसाठी परदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसंच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत
कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लशीची दुसरी मात्रा, ८४ ऐवजी २८ दिवसानंतरच घेता येणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासनानं यासंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. शासकीय आणि खासगी
आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना लस घेताना वैध ओळखपत्र सादर करणं आवश्यक असेल.
****
No comments:
Post a Comment