Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे
डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात,
चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या
मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
आयुष्मान भारत आरोग्यदायी
पायाभूत सुविधा अभियानांतर्गत, प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांसाठी ९० ते १०० कोटी
रुपये खर्च करणार
- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय
·
एक नोव्हेंबरपासून फक्त पाच
हजार रूपयांपर्यंतचचं वीज बील रोखीनं भरता येणार
·
वैद्यकीय सेवा कर्मचारी,
दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, पाणीपुरवठा क्षेत्रातले कर्मचारी तसंच शासकीय अधिकाऱ्यांना
कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं अनिवार्य
·
राज्यात एक हजार २०१ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात दोघांचा मृत्यू तर ४३ बाधित
·
देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी
विविध नेत्यांच्या प्रचार सभा
आणि
·
ज्येष्ठ पत्रकार शांतारामबापू
जोशी यांचं अल्पशा आजारानं निधन
****
आयुष्मान भारत आरोग्यदायी
पायाभूत सुविधा अभियानांतर्गत, प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांसाठी किमान ९० ते
१०० कोटी रुपये खर्च केला जाईल, अशी माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय
यांनी दिली. ते काल नवी दिल्ली इथं यासंदर्भातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या अभियानांतर्गत
१३४ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या जिल्हास्तरावर मोफत केल्या जातील, अशी माहिती त्यांनी
दिली. कंटेनरवर आधारित रेल्वेमध्ये दोन रुग्णालयं सुरू केली जाणार असून, देशाच्या ज्या
कोपऱ्यात वैद्यकीय सुविधेची गरज असेल, तिथे या रेल्वे नेल्या जातील आणि वैद्यकीय सुविधा
पुरवल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. एका रेल्वेत २२ कंटेनर असतील आणि त्यात १००
खाटांची सुविधा उपलब्ध असेल. दक्षिण आशियामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची सुविधा उपलब्ध
होणार असल्याचं, मांडवीय यांनी सांगितलं.
****
महावितरणच्या सर्व वर्गवारीतल्या
ग्राहकांना वीज देयक रोखीनं भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात
आली आहे. येत्या एक नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यापेक्षा अधिक
रकमेचे देयक भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध आहे. तसंच धनादेशाद्वारेदेखील देयक स्वीकारलं जाणार आहे. महावितरणचे
मोबाईल अॅप, तसंच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिस्कॉम डॉट इन, या संकेतस्थळावर
वीज ग्राहकांना केव्हाही, कुठूनही, कितीही रकमेचं वीज देयक भरता येतं, ही सुविधा कायम
उपलब्ध आहे. महावितरणचे ७५ लाख ग्राहक दरमहा ‘ऑनलाईन’ वीज देयक भरत आहेत.
****
राज्यात अवयवदान आणि अवयव
प्रत्यार्पण वाढण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश
टोपे यांनी दिल्या आहेत. अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत काल झालेल्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. अवयवदानाबाबत काम करणारे विभागीय प्रतिरोपण समन्वय केंद्र सध्या पुणे,
मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद इथं कार्यरत आहेत, यापुढे कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर
इथं ही केंद्र सुरू करावी, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या वैद्यकीय सेवा
कर्मचारी, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, पाणीपुरवठा क्षेत्रातले कर्मचारी तसंच शासकीय
अधिकाऱ्यांना आता कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं अनिवार्य करण्यात आलं
आहे. या पूर्वी या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये, म्हणून
त्यांनी लस घेतली किंवा नाही याचा विचार न करता पास देण्यात येत होते. आता लसींचा मुबलक
साठा उपलब्ध असून, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही
सुरळीत होत असल्यामुळे, हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
राज्य सरकारनं आता कोविड
लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच उपनगरी रेल्वेचा मासिक पास देण्याचा निर्णय घेतला
आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ओळखपत्रावर रेल्वेचा पास मिळणार
नाही. कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांना,
आपत्ती निवारण विभागाकडून मिळणाऱ्या युनिवर्सल पासच्याच आधारे रेल्वे प्रवास करता येईल.
या सर्वांना मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही पास मिळू शकतील, असं राज्याचे मुख्य सचिव
सीताराम कुंटे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात काल एक हजार २०१
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६६ लाख पाच हजार, ५१ झाली आहे. काल ३२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ६० झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ३७० रुग्ण बरे झाले,
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ३८ हजार ३९५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २२ हजार
९८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४३ नवीन
कोविड बाधितांची नोंद झाली, तर बीड जिल्ह्यातल्या दोघांचा रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल २१
नवे रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात नऊ, उस्मानाबाद पाच, नांदेड चार, लातूर तीन, तर जालना
जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला
एकही रुग्ण आढळला नाही.
****
कोविडच्या दुसऱ्या लाटेवर
९० टक्के नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश मिळालं आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी
अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काल औरंगाबाद इथं विभागातल्या सर्व जिल्ह्यांची आढावा
बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. मनुष्यबळ विकास
कार्यक्रमाच्या माध्यमातून, औरंगाबाद विभागातल्या जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड,
या पाच जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचनाही,
त्यांनी प्रशासनाला केल्या.
****
देगलूर विधानसभा पोट निवडणूकीचा
प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला असून, कालही अनेक नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या आहेत.
काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
यांनी बिलोली तालुक्यातल्या बीजूर, चिटमोगरा, केरूर, मिनकी या गावात प्रचार सभा घेतल्या.
तर शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही प्रचारसभा
घेतल्या. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ उत्तम इंगोले यांच्या प्रचारार्थ बिलोली इथं
आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी प्रचार सभा घेतली. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे
यांच्या प्रचारार्थ देगलूर तालुक्यातल्या तमलूर इथं भाजपच्या निजामाबादच्या खासदारांनी
प्रचार सभा घेतली.
****
जालना जिल्ह्यात पीककर्ज
वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या सहा बँकांमधल्या शासकीय ठेवी काढून घेण्याचे निर्देश,
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व शासकीय विभाग प्रमुखांना दिले आहेत. खरीप हंगामासाठी
जिल्ह्यातल्या विविध बँकांच्या १७५ शाखांना, एक हजार १७९ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचं
उद्दिष्ट देण्यात आलं होतं. यापैकी आजपर्यंत ६६० कोटी ५० लाख रुपयांच्या पीककर्जाचं
वाटप झालं आहे. वारंवार सूचना देऊनही पीककर्ज वाटपाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहा बँकांमधील
चालू खाती, बचत खात्यांमधल्या ठेवी अन्य बँकांमध्ये वळते करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी
दिले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ऑगस्ट
ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी, शेतकऱ्यांना
३१६ कोटी रुपये मदत राज्यशासनानं जाहीर केली होती. यापैकी २३७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या
थेट बँक खात्यात जमा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्हाप्रमुख
आमदार कैलास पाटील यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यात आँगस्ट
आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी, शेतकऱ्यांना ७५ टक्के मदतनिधी
म्हणून ४२५ कोटी रूपये जमा झाले आहेत. जुलै महिन्यात झालेल्या नुकसानापोटीचे ३० कोटी
रुपये यापूर्वीच प्राप्त झाले आहेत. मदतीचा पहिला टप्पा म्हणून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना
एकूण ४५५ कोटी रूपये मिळतील. नांदेड जिल्ह्यात सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्यानं,
शेतकऱ्यांना देय असलेला मदतनिधी वितरित करण्यासाठी निवडणूक आयोगाची अनुमती आवश्यक आहे.
त्यासाठी जिल्हा प्रशासनानं आयोगाला पत्र पाठवलं असून, ही परवानगी लवकरच मिळण्याची
शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आझादी का अमृत महोत्सव निमित्तानं
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातले ८५ विद्यार्थी
आणि कार्यक्रम अधिकारी यांच्या सहभागातून, नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील वडेपूरी
टेकडीवरील रत्नेश्वरी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात
जमा झालेलं ६० किलो प्लास्टिक जमा करून ते नष्ट करण्यात आलं.
****
ज्येष्ठ पत्रकार शांतारामबापू
जोशी यांचं काल औरंगाबाद इथं अल्पशा आजारानं निधन झालं, ते ९० वर्षाचे होते. दैनिक
तरुण भारत आणि हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे माजी विशेष प्रतिनिधी असलेले जोशी, अभ्यासू आणि सचोटीचे पत्रकार म्हणून
ओळखले जात. त्यांनी आपल्या कारकीर्दीत मराठवाडा विद्यापीठ नामांतर, रेल्वे रुंदीकरण
हे विषय अत्यंत प्रभावीपणे हाताळले होते.
****
जालना जिल्ह्यात अधिकाधिक
नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी मिशन कवच कुंडल मोहिमेचा तिसऱ्या टप्पा राबवण्यात येत
आहे. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी काल जिल्ह्यातल्या ३० हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात
आलं. जिल्ह्यात आजपर्यंत नऊ लाख ९२ हजार १३८ नागरिकांनी कोवीड लसचा पहिला तर तीन लाख
८५ हजार २०२ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
****
येत्या एक नोव्हेंबर पर्यंत
लाच लुचपत प्रतिबंधक जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहनिमित्त नांदेडच्या
लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या
संदेशाचं वाचन करून लाच विरोधी शपथ देण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यात लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्यावतीनं या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. केंद्रीय
दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्तानं
'सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे' ही संकल्पना घेऊन या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
तुळजापूर इथले नगरसेवक पंडितराव
जगदाळे यांना अहमदनगर इथल्या लोकसत्ता संघर्ष समुहच्या वतीनं “बेस्ट नगरसेवक महाराष्ट्राचा” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान
चिन्ह, प्रमाणपत्र आणि ५१ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
लातूरच्या राजर्षी शाहू कला
आणि वाणिज्य महाविद्यालयातल्या लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. प्रीती पोहेकर यांना केंद्र
सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण विभागाच्या वतीनं आदर्श व्यक्तीमत्व हा राष्ट्रीय
पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
येत्या तीन डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार
आहे.
****
No comments:
Post a Comment