Saturday, 30 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशानं कोविड प्रतिबंधक सीकरण मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,णि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·साखर कामगारांना १२ टक्के पगारवाढ तर वीज अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

·जातीचा दाखला आणि पडताळणी प्रक्रिया एकीकृत करण्याची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची सूचना

·राज्यात नवे एक हजार ३३८ कोविडग्रस्त; मराठवाड्यात दोघांचा मृत्यू तर नवे ४६ रुग्ण

·एक नोव्हेंबरपासून मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरण कार्यक्रमाला प्रारंभ

·देगलूर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी आज मतदान

·जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेचं राज्यभरात ठिय्या आंदोलन

आणि

·बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधू फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

****

राज्यातल्या साखर कामगारांना १२ टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल याबाबत माहिती देताना समाधान व्यक्त केलं. साखर आणि उपपदार्थ उद्योगातील एक एप्रिल २०१९ आणि त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या, सर्व कायम, हंगामी कायम तसंच हंगामी कामगारांना ही पगारवाढ लागू असेल. अस्तित्वात असलेला मूळ पगार, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून १२ टक्के पगारवाढ करण्यात आली असल्याचं, याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.

****

राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चार श्रेणीतल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १२ हजार, तर सहायक कर्मचाऱ्यांना सात हजार २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

****

जातीचा दाखला आणि त्याची पडताळणी या दोन्ही प्रक्रिया एकीकृत करून, पासपोर्टच्या धर्तीवर आधुनिकीकरण करावं, आणि पडताळणीसाठी लागणारा वेळ कमी करावा, अशी सूचना, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते काल बार्टी आणि समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. परळी इथं बार्टीचं नवीन प्रशिक्षण केंद्र सुरू करावं, याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश, त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा पुनर्विकास, तसंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याच्या पुनर्प्रकाशनाचे प्रस्ताव दाखल करावेत, बार्टीच्या योजनांमध्ये कालसुसंगत बदल घडवून संशोधनाचं कार्य अग्रक्रमानं केलं जावं, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची, सक्तवसुली संचालनालय - ईडीने पाठवलेलं समन्स रद्द करण्यात यावं अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. याप्रकरणी गेल्या १३ ऑक्टोबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या पीठानं या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला होता. याप्रकरणी काल निकाल सुनावत, उच्च न्यायालयानं देशमुख यांची मागणी फेटाळून लावली.

****

उत्तर महाराष्ट्रात ऊसाला कमीत कमी तीन हजार रुपये रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी मिळावा अशी मागणी, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते काल नंदूरबार जिल्ह्यात प्रकाशा इथं उत्तर महाराष्ट्रातल्या दुसऱ्या ऊस परिषदेत बोलत होते. यंदा साखरेला चांगला भाव असून, ब्राझील मधील दुष्काळ देखील भारताच्या पथ्यावर पडणार असल्यानं, साखर उप्तादक नफ्यात राहणार आहेत, त्याचा लाभ, ऊस उत्पादकांपर्यत पोहचला पाहिजे अशी मागणी शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांचा ऊस उचलल्यापासून चौदा दिवसांच्या आत विना कपात एकरकमी एफआरपी द्यावी, आणि त्यांनतर एफआरपीच्या वर तीनशे ते साडे तीनशे जास्तीचा भाव जानेवारी महिन्यात ऊसाला द्यावा, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.

****

राज्यात काल एक हजार ३३८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख नऊ हजार, २९२ झाली आहे. काल ३रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार १७० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ५८४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ४ हजार ३८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १हजार ४६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ४६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर बीड जिल्ह्यात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात १४ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात आठ, उस्मानाबाद सात, नांदेड, लातूर, जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी चार, तर हिंगोली जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला.

****

निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेल्या नागरिकांना १ नोव्हेंबरपासून मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे. १ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी ३० नोव्हेंबर पर्यंत आपलं नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील मतदार यादीत तपासून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.   

 

दरम्यान, औरंगाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात १३ आणि १४ नोव्हेंबर तसंच  २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी नवमतदारांची नोंदणी, तसंच मतदार यादीतील दुरुस्ती करण्यासाठी, विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा नवमतदारांनी आणि यादीत दुरुस्ती सुचवू पाहणाऱ्या मतदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन, दोन्ही जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदार संघात पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. ही निवडणूक सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने एक हजार ६४८ कर्मचारी आणि २९ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण ४१२ केंद्रावर दोन लाख ९८ हजार ५४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतमोजणी येत्या मंगळवारी होणार आहे.

****

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीनं काल राज्यभरात ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं.

औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. जुनी परिभाषित सेवानिवृत्त योजनाच सर्वांना लाभदायक ठरत असल्यामुळे, एनपीएस योजना रद्द करावी, अशा मागणीचे फलक झळकावत घोषणाही देण्यात आल्या. या मागणीचं निवदेन प्रशासनाला सादर करण्यात आलं. गेल्या १६ वर्षांपासून एनपीएस धारक कर्मचारी कमालीचे अस्वस्थ आहेत. सेवेत असताना अकाली निधन पावलेल्या सुमारे १६०० कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय या योजनेमुळे आर्थिक बाबतीत उध्वस्त झाले असल्याचं, आंदोलनकर्त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनीही काल ठिय्या आंदोलन केलं. १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

****

मराठवाड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत, दिवाळीपूर्वी मिळण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. हिंगोली तसंच लातूर जिल्हा प्रशासनाकडे मदतीची रक्कम राज्य सरकारनं वर्ग केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात असून, अनुदानास पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम दिवाळीपूर्वी जमा करण्याचे प्रशासन प्रयत्न करत असल्याचं, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व तहसीलदारांकडे अनुदानाची रक्कम सुपूर्द करण्यात आली असून, ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्याची सूचना देण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्यातला मदतीचा निधी जिल्हा प्रशासन तसंच तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा तसंच बँक प्रशासनाने ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, असं आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. पहिल्या टप्प्यात लातूर जिल्हयासाठी ३३६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

****

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत सिंधुनं थायलंडच्या खेळाडुचा पराभव केला. उपान्त्य फेरीत आज सिंधुचा सामना जपानच्या सयाका ताकाहाशीसोबत होणार आहे. पुरुष एकेरीत उपान्त्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनचा पराभव झाला. 

****

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या कंत्राटी कामगार, कोविड योद्धे आणि सफाई कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस आणि चालू महिन्याचा पगार तातडीनं देण्याची मागणी, आयटक प्रणीत कामगार संघटनांनी केली आहे. या मागणीचं निवेदन काल घाटी व्यवस्थापनाकडे सादर करण्यात आलं.

या मागण्या मान्य न झाल्यास दिवाळीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा, विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी दिला आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या सायखेडा इथल्या, ट्वेण्टीवन शुगर्स कडून ऊसाला रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी ३१३ रू. प्रति टन तत्काळ अदा करावा, आणि चालू हंगामचा दर जाहीर करावा, अशी मागणी, खासदार बंडू जाधव यांनी केली आहे. यामागणीचं निवेदन त्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. साखर कारखान्यांमधल्या वजन काटा तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात यावी, तोडणी तसंच वाहतूक ठेकेदार यांच्याकडून पैशाची मागणी होत आहे, त्या बाबत तक्रार निवारण केंद्र स्थापन करावं, आदी मागण्याही खासदार जाधव यांनी या निवेदनातून केल्या आहेत.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सदोष परीक्षा यंत्रणेमुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याची तक्रार, विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद आणि अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंकडे केली आहे. ऑफलाईन पद्धतीनं दिल्या गेलेल्या उत्तर पत्रिकांची पुनर्तपासणी करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थांच्या उत्तर पत्रिका पुनर्तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही, ही गंभीर बाब असल्याचं, या तक्रारीत म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या आधार केंद्र चालकांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणेच शुल्क आकारावं, अशी सूचना उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. आधार अद्ययावतीकरणासाठी ५० रुपये, तर आधार पत्राची रंगीत प्रत घेण्यासाठी ३० रुपये शुल्क निर्धारित आहे. निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या आधार केंद्र चालकांविरोधात ग्राहकाची तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा कुंडेटकर यांनी दिला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात एका नऊ वर्षीय बालकाचा डोळा, फटाक्यामुळे इजा होऊन कायमचा निकामी झाला. औंढा नागनाथ तालुक्यात गोजेगाव इथं ही दुर्घटना घडली. या बालकावर सध्या हैदराबाद इथं उपचार सुरू आहेत. मुलांनी फटाके फोडताना दक्षता घ्यावी, पालकांनीही योग्य ती खबरदारी बाळण्याची आवश्यकता आहे.

****

परभणी जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी विविध माध्यमाद्वारे जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांमार्फत लसीकरण संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना एका पत्रातून आवाहन केलं आहे.

****

हवामान-

मराठवाड्यात दोन ते सात नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजात विभागात या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

****

No comments: