Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे
डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात,
चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या
मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
राज्य परीवहन महामंडळाची
सर्व प्रकारच्या प्रवासी भाड्यात १७ टक्क्याहून अधिक भाडेवाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ
·
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत जमा करणार- कृषी मंत्री दादा भुसे
·
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे
संचालक समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी
·
प्रसिद्ध अभिनेते रजनिकांत
यांचा चित्रपटसृष्टीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव
·
नाशिक इथं ९४वावं अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलन तीन ते पाच डिसेंबर दरम्यान होणार
·
राज्यात ८८९ नवे कोरोना विषाणू
बाधित रुग्ण; मराठवाड्यात एकाचा मृत्यू तर २९ बाधित
आणि
·
नांदेड जिल्ह्यातील देगलूर
विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शीगेला
****
राज्य परीवहन- एसटी महामंडळानं
आपल्या सर्व प्रकारच्या प्रवासी भाड्यात १७ पूर्णांक १७ शतांश टक्के भाडेवाढ केली आहे.
मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू झाली आहे. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलं असेल,
अशा प्रवाशांकडून सुधारीत दरानुसार वाहकांकडून तिकिटाच्या वाढीव रक्कमेची आकारणी केली
जाणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती परिवहन
मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. अधिकाऱ्यांना पाच हजार रूपये,
तर कर्मचाऱ्यांना दोन हजार ५०० रूपये देण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाच्या सुमारे
९३ हजारांहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
****
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या
नुकसानीपोटी, तीन हजार ६०० कोटी रुपयांचा मदत निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात
जमा करण्यात येईल, अशी माहिती, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. ते काल
जालना जिल्हाधिकारी झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. जून महिन्यात झालेल्या शेतपिकांच्या
नुकसानीपोटी, पहिल्या टप्प्यात ३५० कोटी रुपयांची रक्कम, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
करण्याची प्रक्रिया सुरू असून, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती
शासनास मिळताच, त्यानुसार भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असं
त्यांनी सांगितलं. यावेळी बांधावर खतं वाटप अभियानाचा शुभारंभ भुसे यांच्या हस्ते करण्यात
आला.
दरम्यान, कृषीमंत्र्यांच्या
उपस्थितीत काल परभणी इथं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा तेवीसावा दीक्षांत
समारंभ झाला.
कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय
कार्य केल्याबद्दल डॉ.डी.के.पाटील, डॉ.गिते, डॉ.एम.के.घोडके, डॉ.के.टी.आपटे आणि डॉ.सी.व्ही.अंबडकर,
यांना भुसे यांच्या हस्ते, राधाकिशन शांती मल्होत्रा पारितोषिकानं गौरवण्यात आलं. गेल्या
तीन वर्षातल्या सुमारे ११ हजार जणांना, विविध विद्याशाखेची पदवी, पदव्युत्तर पदवी तसंच
आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग
- एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी होणार आहे. आर्यन
खान प्रकरणातले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर, विविध राजकीय नेत्यांनी
याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता
शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यापैकी आठ कोटी रुपये समीर
वानखेडे यांना दिले जाणार असल्याचा आरोप, साईल यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात धमकी
मिळाल्याचं सांगत वानखेडे यांनी एनसीबी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. मुंबईचे
पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनाही वानखेडे यांनी पत्र लिहून, धमकी देणाऱ्यांविरूद्ध
कारवाईची मागणी करत, संरक्षणाची मागणी केली आहे. आपल्यावर लावलेले सर्व आरोप निराधार
असून, कोणत्याही चौकशीला सामोरं जायला आपण तयार असल्याचं, वानखेडे यांनी म्हटलं आहे.
****
६७ वे राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कार काल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रसिद्ध
अभिनेते रजनिकांत यांना चित्रपटसृष्टीतला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यावेळी उपस्थित होते. प्रियदर्शन
दिग्दर्शित 'मरक्कर अरबी कादिलिंते सिंघम' या मल्याळम चित्रपटाला, सर्वोत्कृष्ट कथा
चित्रपटाचा, संजय पूरन सिंह चौहान यांना हिंदी चित्रपट 'बहत्तर हुरें' साठी सर्वोत्कृष्ट
दिग्दर्शनाचा, अभिनेता मनोज बाजपेयी यांना हिंदी चित्रपट 'भोंसले' साठी सर्वोत्कृष्ट
अभिनेत्याचा, तर धनुषला तमिळ चित्रपट 'असुरन'साठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
देण्यात आला. कंगना राणावतला 'मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' या सिनेमांसाठी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, विजय सेतुपतीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, तर पल्लवी
जोशी यांना, 'द ताश्कंद फाईल्स' चित्रपटासाठी, सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
****
९४ वावं अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलन येत्या तीन, चार, आणि पाच डिसेंबरला नाशिक इथं होणार आहे. जिल्ह्याचे
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पूर्वी
नाशिक इथंच एचपीटी महाविद्यालयात आयोजित हे संमेलन, आता आडगाव इथं भुजबळ यांच्या शिक्षण
संस्थेत होणार आहे. नाशिक मध्ये गेल्या मार्च महिन्यात नियोजित हे संमेलन, कोविडची
दुसरी लाट तीव्र झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आलं होतं.
****
राज्यात काल ८८९ नवे कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६
लाख तीन हजार, ८५० झाली आहे. काल १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार २८ झाली असून, मृत्यूदर
दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ५८६ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६४ लाख ३७ हजार २५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २३ हजार १८४ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २९ नवीन
कोविड बाधितांची नोंद झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
दहा नवे रुग्ण आढळले, औरंगाबाद जिल्ह्यात नऊ, बीड चार, परभणी तीन, नांदेड दोन, तर लातूर
जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. जालना आणि हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला
एकही रुग्ण आढळला नाही.
****
देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक
येत्या शनिवारी, ३० ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना
सुटी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा क्षेत्रात भरणारे सर्व आठवडी बाजार ३० ऑक्टोबर
रोजी बंद राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहेत. देगलूर
या गावातले आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी रविवारी ३१ ऑक्टोबरला सुरू राहणार आहेत.
दरम्यान, या निवडणुकीसाठी
प्रचार आता शीगेला पोहोचला आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बिलोली तालुक्यातल्या डोणगाव इथं प्रचार सभा घेतली. विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ बिलोली
तालुक्यातल्या कोंडलवाडी आणि देगलूर शहरात, तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रकाश
आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांच्या प्रचारार्थ देगलूर
इथं काल प्रचारसभा घेतली.
****
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारीत होणाऱ्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, आज ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर
इथल्या आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक मंदार ठाकूर यांचं,
" राष्ट्रीय सभेचं जहाल पर्व ", या विषयावर व्याख्यान होणार आहे. १९०५ ते
१९२० या कालखंडात राष्ट्रीय सभेत उदयास आलेल्या जहाल गटानं, स्वातंत्र्य चळवळ अधिक
तीव्र आणि धारदार केली, आणि जनसामान्यांना चळवळीत समाविष्ट करण्यावर भर दिला, असं मत
प्राध्यापक ठाकूर यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले…
राष्ट्रीय
सभेत उदयास आलेल्या जहाल गटानं आपल्या लिखाणाद्वारे आणि भाषणाद्वारे साम्राज्यवादी
ब्रिटीश सरकारचे खरे स्वरुप उघडे करुन जहाल विचारांचा प्रचार केला. ब्रिटीश सरकारचे
दडपशाहीचे धोरण, भारताचे शोषण या बाबत जहालांनी सरकारवर जळजळीत टीका केली. जहालांचा
विश्वास अर्ज, विनंत्या यावर नव्हता. लढाऊ राष्ट्रवाद निर्माण करतांना सरकारला खडे
बोल सुनावणे, टीका करणे आणि राष्ट्रीय चळवळ जनसामान्यांपर्यंत नेणे हे जहालांचे ध्येय
होते.
आज सायंकाळी सहा वाजून ३५
मिनिटांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरुन हे व्याख्यान प्रसारित होणार आहे.
****
महिलांनी सक्षम आणि सशक्त
होण्यासाठी विधी साक्षर होण्याची गरज, उस्मानाबादच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नीवा जैन
यांनी व्यक्त केली आहे. उस्मानाबाद इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आझादी का अमृत
महोत्सव या कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. कौटुंबिक हिंसाचार, सामजिक हिंसाचार,
शिक्षणाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या या विषयांवर महिलांनी एकमेकांना जागरुक केलं
पाहिजे, तसंच यासंदर्भात आशा कर्मचारी महिलांशी थेट संवाद साधून मोलाची भूमिका बजावू
शकतात, असंही जैन यांनी नमूद केलं.
****
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती
योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या जालना जिल्ह्यातल्या तीन हजार ९९५ शेतकऱ्यांनी अद्यापही
आपले आधार प्रमाणीकरण केलेलं नाही. शासनानं या योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे कर्जमाफीच्या
यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ
घ्यावा, असं आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ
तालुक्यातल्या ट्वेंटी वन शुगर्सच्या थकीत देयकासाठी शेतकऱ्यांनी काल सायखेडा इथल्या
साखर कारखान्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं. गेल्या हंगामातील प्रती टन ५०० रुपये
थकीत देयक जमा केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेतल्या
भ्रष्ट पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ, काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार
संजय जाधव यांच्या नेतृत्वात, सोनपेठ इथल्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर
कार्यालयासमोर जाहीर सभा घेण्यात आली. एकात्मिक बालविकास प्रकल्पाची इमारत बेकायदेशीररीत्या
पाडण्यासह, बीओटी तत्वावर गाळे उभारणी बाबत संबंधितांविरोधात चौकशी करुन गुन्हे दाखल
करावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment