Wednesday, 27 October 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातल्या विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे तसंच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दोन हजार ८६० कोटी ८४ लाख सात हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयाचा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या ४६ लाख ५६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या व्यतिरिक्त सरकारनं ही मदत जाहीर केली आहे.

****

एस.टी. कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून ११२ कोटी रुपयांचा निधी तातडीनं वितरीत करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार तातडीनं निधी वितरित केला असल्याचं, राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला होणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यावेळी नोव्हेंबरच्या एक तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.

दरम्यान, राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एस.टी. कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं थकीत वेतन, महागाई भत्ता वाढ तसंच राज्य सरकारी कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घ्यावं, या प्रमुख मागण्यांसाठी आजपासून राज्यभर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. धुळे इथं परिवहन महामंडळाच्या सर्व कामगार संघटनांच्या एकत्रित कृती समितीनं पुकारलेल्या उपोषण आंदोलनात एस.टी. चालक, वाहक, डेपो कर्मचारी सहभागी झाले आहेत. धुळे मध्यवर्ती बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करुन उपोषण सुरु करण्यात आलं. या आंदोलनामुळे धुळे बसस्थानकातून एस.टी. बस वाहतुक काही प्रमाणात ठप्प झाली आहे.

****

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधले राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी काल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत दिल्लीतल्या दोन शासकीय शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांकडून त्यांनी यावेळी, बिजनेस ब्लास्टर्स प्रोग्राम बाबत माहिती जाणून घेतली, तसंच देशभक्ती अभ्यासक्रम आणि स्कूल ऑफ स्पेशलाइज्ड एजुकेशन च्या प्रारुपाचीही माहिती घेतली. दिल्लीच्या शाळांमध्ये राबवले जाणारे उपक्रम महाराष्ट्रातल्या शाळांमध्येही राबवले जातील, असं बनसोडे यावेळी म्हणाले. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सहकार्य करायला आपण तयार असल्याचं, सिसोदिया यावेळी म्हणाले.

****

महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं नऊ कोटीचा टप्पा पार केला आहे. राज्यात काल चार हजार ५८० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून पाच लाख २८ हजार ८५३ नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत एकूण नऊ कोटी ५८ लाख आठ हजार ६२३ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या १०३ कोटी ५३ लाख २२ हजार ५७७ मात्रा देण्यात आल्या आहेत. काल देशात ५५ लाख ८९ हजार १२४ नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

दरम्यान, देशात काल नव्या १३ हजार ४५१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५८५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४२ लाख १५ हजार ६५३ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५५ हजार ६५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १४ हजार २१ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ३५ लाख ९७ हजार ३३९ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६२ हजार ६६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

चार वर्षांखालील मुलांना दुचाकी वरून नेण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुषंगानं मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार चार वर्षांखालील मुलांसाठी, मोटारसायकल चालकाबरोबर मुलाला बांधण्यासाठी सुरक्षा उपकरणांचा वापर करणं, हेल्मेट वापरणं संच दुचाकीचा वेग ताशी ४० किलोमीटर पेक्षा जास्त नसणं, बंधनकारक करण्यात आलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातल्या प्रवाशांकरता पूर्णा ते तिरुपती दरम्यान विशेष रेल्वेगाडीला नोव्हेंबर महिन्यात मुदतवाढ दिली आहे. ही गाडी एक, आठ, १५, २२, २९ नोव्हेंबरला पूर्णेहून तिरुपतीसाठी निघेल, तर दोन, नऊ, १६, २३, ३० नोव्हेंबर रोजी तिरुपतीहून पूर्णेसाठी परत निघणार आहे

****

सर्बियामधील बेलग्रेड इथं सुरु असलेल्या ए आय बी ए जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी चांगली सुरुवात केली आहे. भारताचे शिव थापा, दीपक भोरिया आणि सुमित यांनी आपापल्या गटातली पहिली फेरी जिंकली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात हर्सुल सावंगी इथल्या कला वरीष्ठ महाविद्यालयात उद्या युवा स्वास्थ कोविड-19 लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना याठिकाणी लसीकरण करुन घेता येणार आहे.

****

No comments: