Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय अर्थमंत्रालयानं राज्य
सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकरता वस्तू आणि सेवाकरामुळे निर्माण झालेल्या तुटीच्या
भरपाईपोटी, ४४ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. यापैकी तीन हजार ८१४ कोटी
रुपये महाराष्ट्राला दिले गेले आहेत. जीएसटी तूट भरपाईसाठीच्या ऋण योजनेअंतर्गत केंद्र
सरकारनं ही रक्कम दिली आहे. यामुळे या आर्थिक वर्षात केंद्र सरकारनं राज्य सरकारं आणि
केंद्रशासित प्रदेशांना, जीएसटी तूट भरपाईपोटी कर्ज म्हणून दिलेली एकूण रक्कम, एक लाख
५९ हजार कोटी रुपये झाली आहे. ही सामान्यतः दर दोन महिन्यांनी दिल्या जाणाऱ्या जीएसटी
तूट भरपाई निधीपेक्षा स्वतंत्र असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी
शक्तिकांत दास यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीनं आज
या नियुक्तीला मंजुरी दिली. त्यामुळे शक्तीकांत दास पुढील तीन वर्षे आरबीआयचे गव्हर्नर
म्हणून काम करतील. त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपत होता. मात्र, त्याआधीच
केंद्र सरकारनं त्यांच्या फेरनियुक्तीचा निर्णय घेतला.
****
सोळाव्या जी ट्वेंटी समिटसाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीची राजधानी रोम इथं पोहोचले. उद्या आणि परवा ३१ ऑक्टोबरला
ही समिट होणार आहे. हवामान बदलाविषयक संयुक्त राष्ट्राच्या करारात सहभागी असलेल्या
देशांच्या या परिषदेत आपण हवामान बदलाच्या समस्या सर्वंकष पद्धतीनं सोडवण्याची गरज
अधोरेखीत करणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान आज युरोपीय परिषदेचे
अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपिय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांची भेट
घेणार आहेत.
****
कोविड सारखी जागतिक साथ आणि
हवामान बदलांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी, सर्व देशांच्या एकत्रित प्रयत्नांची
गरज आहे; म्हणूनच भारत आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सहकार्य वाढवत आहे; असं प्रतिपादन,
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी केलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या
वतीनं आयोजित “राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावरील वेबिनारच्या उद्घाटन समारंभात ते बोलत
होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार सौम्या स्वामिनाथन यांनी या सत्राचा समारोप
केला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, एअर मार्शल भूषण गोखले,
लेफ्टनंट जनरल पाटणकर उपस्थित होते.
****
देशानं कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरण मोहिमेनं १०४ कोटी ८२ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ७४ लाख ३३ हजार
नागरीकांनी लस घेतली. आतापर्यंत देशात १०४ कोटी ८२ लाख ९६६ लसीच्या मात्रा देण्यात
आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १४
हजार ३४८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८०५ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४२ लाख ४६ हजार १५७ झाली
असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५७ हजार १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल
१३ हजार १९८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३६ लाख २७ हजार ६३२ रुग्ण कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६१ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
विविध बँकांच्या एटीएम मशीनमधून
कार्डद्वारे तसचं विशिष्ट प्रकारच्या चाबीचा उपयोग करुन पैसे काढणाऱ्या दोघांना परभणी
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं काल ताब्यात घेतलं. त्यांच्या जवळून विविध
बँकेचे ६० एटीएम कार्ड, ४९ हजार रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. या
दोघांनी अनेक ठिकाणी असे प्रकार केल्याचं निदर्शनास आलं आहे. त्याआधारे पोलिसांनी त्यांच्याविरोधात
गुन्हे दाखल केले आहेत.
****
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
भारताच्या पी व्ही सिंधुनं तिसर्या फेरीत प्रवेश केला आहे. दुसर्या फेरीत सिंधुनं डेन्मार्कच्या
लाईन ख्रिस्तोफरसनचा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेननंही सिंगापुरच्या खेळाडुला
हरवत तिसर्या फेरीत प्रवेश केला. तर समीर वर्माला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यानं माघार
घ्यावी लागली. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी यांच्या
जोडीला पराभव पत्करावा लागला.
****
सातारा इथं महाराष्ट्र राज्य
कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं झालेल्या तेविसाव्या
राज्यस्तरीय ग्रीक-रोमन स्टाईल कुस्ती स्पर्धेत, कोल्हापूरच्या मल्लांनी निर्विवाद
वर्चस्व राखलं. महिला गटात कोल्हापूर संघानं जेतेपद पटकावल्यानंतर, पुरुष गटात ग्रीक-रोमन
प्रकारातही कोल्हापूर संघाचा वरचष्मा राहिला. अभिजित पाटील, विक्रम कुराडे, अमृत रेडकर,
समीर पाटील, आणि शिवाजी पाटील या कोल्हापूरच्या कुस्तीगिरांनी सुवर्णपदक पटकावल, तर
मुंबईचे गोविंद यादव आणि गोकुळ पाटील, नाशिकचा मनोज कातोरे, लातूरचा अक्षय शेळके आणि
पुण्याचा तुषार डबे यांनीही आपापल्या वजनी गटात सुवर्णपदकं जिंकली.
****
No comments:
Post a Comment