Tuesday, 26 October 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या १०२ कोटी ९४ लाख एक हजार ११९ मात्रा देण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत देण्यात आलेल्या एकूण लस मात्रांपैकी ७१ कोटी ८८ लाख जणांना पहिली, तर ३० कोटी ९८ लाखांपेक्षा जास्त जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. काल देशात ५८ लाख ८७ हजार नागरीकांना लस देण्यात आली.

दरम्यान, देशात काल नव्या १२ हजार ४२८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३५६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४२ लाख दोन हजार २०२ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५५ हजार १६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १५ हजार ९५१ रुग्ण बरे झाले, देशात सध्या एक लाख ६३ हजार ८१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोविड-19 लसींच्या निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल – ई’ कंपनीला ५० दशलक्ष डॉलर्सचा निधी देण्याची व्यवस्था अमेरिकेनं केली आहे. अशा निरंतर भागीदारीमुळे कोविड-19 वर मात करण्याच्या प्रयत्नांना मदत होईल आणि भारतासह संपूर्ण हिन्दी-पॅसिफिक क्षेत्रातील दीर्घकालीन जागतिक आरोग्य सेवेलाही याचा लाभ मिळेल, असं भारतातल्या अमेरिकी दूतावासानं एका निवेदनात म्हटलं आहे.

****

निपुण भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुकाणू समितीची स्थापना केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेन्द्र प्रधान या समितीचे अध्यक्ष असतील तर शिक्षण राज्य मंत्री अन्नपूर्णा देवी या समितीच्या उपाध्यक्षपदी असतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये संकल्पित केल्यानुसार, इयत्ता तिसरी पर्यंत प्रत्येक मुलानं मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रातील सार्वत्रिक प्राविण्य प्राप्त करणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. वाचन आणि आकलनासह संख्याशास्त्रात प्राविण्य मिळवण्यासाठी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं या वर्षी पाच जुलै रोजी निपुण भारत अभियान हा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या एका अज्ञात अधिकाऱ्याकडून विभागाच्या कामकाजासंबंधी एक पत्र मिळालं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. हे पत्र त्यांनी ट्विटरवरही जारी केलं आहे. या पत्रात फसवूणक झालेल्या २६ प्रकरणांची माहिती असून, एनसीबीमध्ये सुरु असलेल्या चुकीच्या कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

****

औरंगाबाद इथले ज्येष्ठ पत्रकार शांतारामबापू जोशी यांचं आज औरंगाबाद इथं अल्पशा आजारानं निधन झालं, ते ९० वर्षाचे होते. जोशी हे दैनिक तरुण भारत आणि हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे माजी विशेष प्रतिनिधी होते. एक अभ्यासू आणि सचोटीचे पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांतारामबापू जोशी यांनी आपल्या कारकिर्दीत मराठवाडा विद्यापीठ नामांतर, रेल्वे रुंदीकरण हे विषय अत्यंत प्रभावीपणे हाताळले होते.

****

भूमी अभिलेख विभागाच्या गट ‘क’ संवर्गातली प्रादेशिक स्तरावरची पदं भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागात ही भरती होणार आहे. यासाठी स्थापन समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील. समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याचा अधिकार जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक यांना असेल, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.

****

परभणी इथं महिला स्वावलंबन बचत गट नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या दिवाळी महोत्सव २०२१ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील गांधी मैदान इथं परवापर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे.  

****

नांदेड जिल्ह्यात आजपासून ते एक नोव्हेंबरपर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहनिमित्त नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संदेशाचं वाचन करून लाचविरोधी शपथ देण्यात आली. कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी पैश्याची मागणी करत असेल, तर संबंधितांनी संपर्क साधण्याचं आवाहन, विभागाचे अधिकारी धर्मसिंग चव्हाण यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ काल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बिलोली तालुक्यातल्या डोणगाव इथं प्रचार सभा घेतली. यावेळी बोलतांना चव्हाण यांनी, केंद्रातल्या भाजप सरकार टीका केली.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...