Saturday, 30 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

देशात कोविड प्रतिबंधक सीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच,णि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६० पूर्णांक ६० टक्के मतदान

** अतिवृष्टीग्रस्तांना अल्प मदतीच्या निषेधार्थ भाजपचं १ नोव्हेंबरला काळ्या फिती लावून आंदोल

** शहागड इथल्या बुलडाणा अर्बन बँकेत दरोडा टाकणाऱ्या तिघा संशयितांपैकी दोघांना अटक

आणि

** फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६० पूर्णांक ६० टक्के मतदान झालं. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले, जनता दल धर्मनिरपेक्षचे विवेक केरूरकर यांच्यासह एकूण बारा उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. मतमोजणी येत्या मंगळवारी होणार आहे. दरम्यान, १४ राज्यात विधानसभेच्या ३० जागांसाठी, तसंच मध्य प्रदेशातल्या खांडवा, हिमाचल प्रदेशातील मंडी तसंच दादरा आणि नगर हवेली या तीन लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. 

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावी तसंच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर पासून खासगीरित्या अर्ज क्रमांक १७ भरता येणार आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. दहावी तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करणं अपेक्षित आहे.

****

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज जामीनावर सुटका झाली. अंमली पदार्थ प्रकरणी आर्यन गेल्या २६ दिवसांपासून अटकेत होता. अभिनेत्री जुही चावला हिनें आर्यनसाठी जामीन दिला. आर्यन आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तुरुंगातून सुटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

येत्या दोन वर्षात ग्रामीण स्वयंसहाय्यता गटांच्या अडीच कोटी महिलांना उपजिविकेसाठी मदत रणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. या गटाच्या महिलांना प्रतिवर्षी एक लाख रुपये उत्पन्न मिळवण्यास सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं, ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. या योजने ७० लाख बचत गटांच्या ७ कोटी ७० लाख महिलांचा समावेश असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.

****

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अल्प मदत देणाऱ्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे १ लाख कार्यकर्ते परवा १ नोव्हेंबरला काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याची माहिती पक्षाचे मुंबई प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. गेल्या दोन वर्षांपासून वादळं, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या हातात सरकारी मदतीचा एक पैसादेखील पडलेला नसल्याने राज्यातील शेतकंऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

****

जालना जिल्ह्यातल्या शहागड इथल्या बुलडाणा अर्बन बँकेत दरोडा टाकणाऱ्या तीन संशयितांमधल्या दोघांना जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथून आज ताब्यात घेतलं. मुकीद उर्फ मुस्तफा कासम आणि संदीप बबन सोळंके, अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं असून, त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली. संशयितांकडून बँकेतून लुटून नेलेल्या मुद्देमालातील साडेनऊ लाख रुपये रोख आणि तारण ठेवलेले तीन कोटी ४२ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं. बुलडाणा अर्बन बँकेत परवा गुरुवारी सायंकाळी हा सशस्त्र दरोडा पडला होता.

****

आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने आज वर्धा शहरातून भव्य सायकल फेरी काढण्यात आली. पर्यावरण आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देत काढण्यात आलेल्या फेरीत दीडशेहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले. या सायकल फेरीचं ठिकठिकाणी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. फेरीच्या मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना माला अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. या सायकल फेरीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश देण्यात आला.

****

फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. जपानच्या साकाया ताकाहाशीने सिंधूचा पराभव केला. सामन्यात पहिला सेट २१ - १८ असा जिंकून सिंधूनं आघाडी घेतली होती, मात्र ताकाहाशीने पुढचे दोन्ही सेट २१-१६, २१-१२ असे जिंकत विजय मिळवला.

****

जालना इथल्या उर्मी संस्थेच्यावतीनं देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी मुंबई इथल्या कवयित्री शिल्पा देशपांडे, मुंबई इथले प्रसिध्द शिल्पकार सुनील देवरे, कऱ्हाड इथल्या कवयित्री विजया पाटील आणि औरंगाबाद इथले चित्रकार सुशील देवरे यांना जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. जयराम खेडेकर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना दिली. पंचवीस हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त येत्या नऊ नोव्हेंबर रोजी कोठारी इंटनॅशनल स्कूलमध्ये प्राचार्य डॉ. संध्या दुधगावकर, कवीवर्य फ.मु. शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याचं उर्मी संस्थेचे सचिव सुभाष कोळकर यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद इथल्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन तसंच कारागृह विक्री केंद्राचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कारागृहातल्या बंदीजनांनी तयार केलेल्या साड्या, सतरंज्या, चादरी, टॉवेल, तयार केलेले लाकडी झोपाळे, चप्पल स्टँड, बैलगाडी आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

****

दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या नोव्हेंबरपर्यंत दहा दिवस बंद राहणार आहेत. या कालावधीत कोणत्याही प्रकारचे लिलाव होणार नाहीत.

****

 

No comments: