Wednesday, 27 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      पेगॅासस हेरगिरी प्रकरणी ३ सदस्यीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.

·      जलयुक्त शिवार अभियानाची अद्याप चौकशी सुरू असल्याने क्लिनचिट नाही - जलसंधारण विभागाचा खुलासा.

·      मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी - खासदार छत्रपती संभाजीराजे.

आणि

·      एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात बेमुदत उपोषणाला सुरवात.

****

पेगॅासस हेरगिरी प्रकरणी ३ सदस्यीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर व्ही रविंद्रन हे या समितीचे अध्यक्ष असतील. सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहल यांच्या पीठानं हा आदेश दिला. या चौकशी समितीच्या कामकाजावर सर्वोच्च न्यायालय स्वतः देखरेख ठेवणार आहे. या प्रकरणी केंद्र सरकारनं कसलाही नकार दर्शवलेला नाही, याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं. खाजगीपणाच्या अधिकारावर काही निर्बंध असले तरी, त्यांना घटनात्मक संरक्षणही आहे. फक्त राष्ट्रीय सुरक्षेसाठी, दहशतवादी कारवाया रोखण्याकरता खाजगीपणावर निर्बंध घातले जाऊ शकतात, असं न्यायालयानं नमूद केलं आहे.

****

घरगुती वापराचे छोटे गॅस सिलिंडर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्त भाव दुकानांमधून विकण्याचं नियोजन, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. तेल विपणन कंपन्यांनी या प्रस्तावाचं स्वागत केलं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. यासाठी आवश्यक पाठबळ आणि राज्य सरकारांसोबत समन्वय साधला जाईल, असं तेल कंपन्यांनी म्हटलं आहे.

****

देशातल्या औषध निर्मिती उद्योगातली गुंतवणूक कोरोना नंतरच्या काळात वाढली आहे, असं रसायन आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे. इन्व्हेस्ट इंडीयाच्या गुंतवणूकदार मेळाव्याला ते संबोधित करत होते. आजघडीला भारत जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक देश आहे, औषधं ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाली पाहिजेत असा भारताचा प्रयत्न असल्याचं, मांडवीय यांनी सांगितलं.

****

जलयुक्त शिवार अभियानाची सविस्तर चौकशी अद्याप सुरू असून, या कामाला क्लिनचिट दिलेली नाही, असा खुलासा राज्याच्या जलसंधारण विभागाने केला आहे. जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची काल लोक लेखा समितीसमोर साक्ष होती. सचिवांनी यावेळी सादर केलेल्या माहितीच्या आधारे काही माध्यमांमधून याबाबत बातमी प्रसारित करण्यात आली. मात्र यासंदर्भात स्थापन विशेष तपास समितीच्या अहवालाच्या आधारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप या चौकशीचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत, त्यामुळे जलयुक्त अभियानाची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही, असं जलसंधारण विभागानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं आपापली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ इथं सकल मराठा समाजाच्या जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. येणाऱ्या काळात मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.

****

मानवी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग अभ्यासाबरोबरच आयुर्वेद अभ्यासही महत्त्वाचा असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात लोणी इथं प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाचं भूमिपूजन तसंच डॉ.बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचं उद्घाटन करताना बोलत होते. आयुर्वेदाचं महत्त्व ओळखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र 'आयुष्य मंत्रालय' स्थापन केल्याचंही ते यावेळी म्हणाले.

****

समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. निवृत्ती-वेतनधारकांना त्यांचे निवृत्तीवेतन कोषागार कार्यालयातून मिळण्याच्या दृष्टीनं तातडीनं प्रस्ताव तयार करण्यात यावा आणि बोर्डाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात आढावा बैठक घ्यावी, असे निर्देशही ठाकूर यांनी यावेळी दिले.

****

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर लागू करावा, तसंच दिवाळीपूर्वी थकबाकीची रक्कम एकरकमी द्यावी, या मागणीसाठी एसटी महामंडळातील श्रमिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं आजपासून राज्यभर बेमुदत उपोषण पुकारलं आहे. राज्यशासनाप्रमाणे एक एप्रिल २०१६ पासून २८ टक्के महागाई भत्ता लागू करावा, वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के प्रमाणे द्यावा, घरभाडे भत्ता ८, १६ आणि २४ टक्के प्रमाणे देण्यात यावा, आदी मागण्या संघटनेनं केल्या आहेत.

औरंगाबाद इथं एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेसमोर उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. उद्यापासून हे आंदोलन आगार स्तरावर केलं जाणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं.

नांदेड इथंही विभागीय कार्यालयासमोर उपोषण पुकारण्यात आलं आहे. दिवाळीपूर्वी मागण्या मान्य न केल्यास, आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे.

****

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. आमदार मेघना बोर्डीकर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत, या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी असल्याचं आश्वासन या विद्यार्थ्यांना दिलं.

****

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयमधल्या कंत्राटी शिल्प निदेशक आणि गट निदेशकांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीनं मुंबईत आझाद मैदानावर साखळी उपोषण पुकारलं आहे. नियमित कर्मचाऱ्यांएवढं वेतन तसंच इतर सुविधा मिळाव्यात, या आणि अन्य मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय या कर्मचारी संघर्ष समितीनं व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथल्या आयटीआय कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

****

धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं आज पहाटे शिरपूर तालुक्यात गुटखा आणि सुगंधीत तंबाखूची अवैध वाहतुक करणारं वाहन ताब्यात घेतलं. यावेळी एकूण ५ लाख २२ हजार रुपयांचा गुटखा, तंबाखू आणि वाहनासह सुमारे साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

//********//

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...