Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती
करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना
विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,
आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा,
सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ६३ पूर्णांक ९४ टक्के मतदान,
मंगळवारी मतमोजणी.
·
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय
एकता दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमाचं आयोजन, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनाही पुण्यतिथिनिमित्त
आदरांजली.
·
राज्यात एक हजार १३० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात
दोन जणांचा मृत्यू तर ५२ बाधित.
·
महाविकास आघाडी सरकार मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावरून अल्पसंख्याकांची
दिशाभूल करत असल्याचा एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदउद्दीन ओवैसी यांचा आरोप.
·
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत
संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पद्वव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५
नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ.
आणि
·
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-न्युझीलंड यांच्यात
सामना.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल ६३ पूर्णांक ९४ टक्के मतदान नोंदवलं
गेलं. मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही, शांततेत मतदान पार पडलं. काँग्रेसचे
जितेश अंतापूरकर, भारतीय जनता पक्षाचे सुभाष साबणे, वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तम
इंगोले, जनता दल धर्मनिरपेक्षचे विवेक केरूरकर यांच्यासह एकूण बारा उमेदवारांचं राजकीय
भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. मतमोजणी परवा मंगळवारी होणार आहे.
दरम्यान,
१४ राज्यात विधानसभेच्या ३० जागांसाठी, तसंच मध्य प्रदेशातल्या खांडवा, हिमाचल प्रदेशातील
मंडी तसंच दादरा आणि नगर हवेली या तीन लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठीही काल
मतदान झालं.
****
देशाचे
पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज सर्वत्र राष्ट्रीय एकता दिवस म्हणून
साजरी केली जात आहे. यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
गुजरातमध्ये अहमदाबाद इथं ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार पटेलांच्या भव्य पुतळ्याच्या
परिसरात विशेष संचलनचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला
हजर राहणार आहेत.
आकाशवाणीच्या
सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेतलं यंदाचं पुष्प संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत
गुंफणार आहेत. ‘राष्ट्र निर्मितीत भारतीय सेनादलांचं योगदान’ हा त्यांच्या व्याख्यानाचा
विषय आहे. आज रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून या व्याख्यानाचं
प्रसारण होणार आहे.
माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्रपट विभागही ‘आजादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून
सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारित जीवनपट दाखवून, आदरांजली वाहणार आहे. विभागाचं
संकेतस्थळ आणि युट्यूब वाहिनीवर आज हा माहितीपट प्रसारित केला जाईल.
माजी
पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभर आदरांजली वाहिली
जात आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र अर्थात दहावी तसंच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर पासून खासगीरित्या अर्ज क्रमांक १७ भरता येणार आहेत.
या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
यांनी केलं आहे. दहावी तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर २२ नोव्हेंबर
ते ६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करणं अपेक्षित आहे.
****
अभिनेता
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल
जामीनावर सुटका झाली. अंमली पदार्थ प्रकरणी आर्यन गेल्या २६ दिवसांपासून अटकेत होता.
अभिनेत्री जुही चावला हिनं आर्यनसाठी जामीन दिला. आर्यन काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास
तुरुंगातून सुटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान,
अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या पश्चिम विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी काल मुंबईत
राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. जात पडताळणी
बाबत आपल्यावर होत असलेल्या आरोपांच्या संदर्भात बाजू मांडण्यासाठी हलदर यांची भेट
घेतल्याचं, वानखेडे यांनी सांगितलं. वानखेडे यांनी या भेटीत आपल्याकडे, त्यांचं जात
प्रमाणपत्र, तसंच नोकरीच्या वेळी सादर केलेली विविध कागदपत्र सुपूर्द केली, अशी माहिती
हलदर यांनी दिली.
****
येत्या
दोन वर्षात ग्रामीण स्वयंसहाय्यता गटांच्या अडीच कोटी महिलांना उपजिविकेसाठी मदत करणार
असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. या गटाच्या महिलांना प्रतिवर्षी एक लाख रुपये उत्पन्न
मिळवण्यास सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं, ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं
आहे. या योजनेत ७० लाख बचत गटांच्या ७ कोटी ७० लाख महिलांचा समावेश झाला असल्याची माहिती
मंत्रालयानं दिली आहे.
****
मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, इतर मागासवर्गीय-ओबीसी, भटक्या आणि विमुक्त जाती-व्हीजेएनटी,
विशेष मागासवर्गीय-एसबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी, २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार
रुपये राज्य शासनानं मंजूर केले आहेत. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
यांनी ही माहिती दिली. ही रक्कम महाडीबिटी प्रणालीद्वारे वितरित केली जाणार आहे. यापूर्वी
सप्टेंबरमध्ये ४३६ कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आले होते.
****
राज्यात
काल एक हजार १३० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६६ लाख नऊ हजार, ९०६ झाली आहे. काल २६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार
१९६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल दोन हजार
१४८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ४९ हजार १८६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या १६ हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ५२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यात औरंगाबाद जिल्ह्यातील एक महिला आणि लातूर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद
आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३ नवे रुग्ण आढळले. लातूर ११, बीड आठ, नांदेड
पाच, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला. परभणी जिल्ह्यात
काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
महाविकास
आघाडी सरकार मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावरून अल्पसंख्याकांची दिशाभूल करत असल्याचा
आरोप एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद
जिल्ह्यात खुलताबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह बहुतांश
पक्षांनी मुस्लीमांचा वोट बँक म्हणून वापर केला, राजकारणातल्या संधी मात्र नाकारल्या,
असं मत त्यांनी व्यक्त केलं. खासदार इम्तियाज जलील यावेळी उपस्थित होते. मुस्लीम आरक्षणासाठी
मुंबईपर्यंत दुचाकी तिरंगा यात्रा काढण्याची घोषणा खासदार जलील यांनी यावेळी केली.
****
औरंगाबादच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध विभागांसह संलग्नित
महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पद्वव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे.
कुलगुरु
डॉक्टर प्रमोद येवले यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या प्रवेश प्रक्रिया
सुरु असून थेट प्रवेश प्रक्रियाही राबवण्यात आली आहे, मात्र काही जागा अजूनही रिक्त
आहेत. बारावी नंतर अभियांत्रिकीसह अन्य तांत्रिक शाखांच्या प्रवेशासाठीच्या परीक्षेचा
निकाल उशिरा लागल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जालना
जिल्ह्यात शहागड इथल्या बुलढाणा नागरी सहकारी पतसंस्थेवर दरोडा टाकणाऱ्या तीन संशयितांमधल्या
दोघांना जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथून काल ताब्यात घेतलं. मुकीद उर्फ
मुस्तफा कासम आणि संदीप बबन सोळंके, अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं असून, त्यांच्या
अन्य एका साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.
संशयितांकडून बँकेतून लुटून नेलेल्या मुद्देमालापैकी साडेनऊ लाख रुपयांची रोकड आणि
तारण ठेवलेलं तीन कोटी ४२ लाख रुपयांचं सोनं हस्तगत करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
बुलडाणा अर्बन बँकेत गुरुवारी हा सशस्त्र दरोडा पडला होता.
****
‘आझादी
का अमृत महोत्सवां’तर्गत वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या
वतीने काल वर्धा शहरातून भव्य सायकल फेरी काढण्यात आली. पर्यावरण आणि आरोग्य संवर्धनाचा
संदेश देत काढण्यात आलेल्या फेरीत दीडशेहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले. या सायकल
फेरीचं ठिकठिकाणी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं.
या सायकल फेरीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश देण्यात आला.
****
जालना
इथल्या उर्मी संस्थेच्या वतीनं देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यावर्षी मुंबई इथल्या कवयित्री शिल्पा देशपांडे, मुंबई इथले प्रसिध्द शिल्पकार सुनील
देवरे, कऱ्हाड इथल्या कवयित्री विजया पाटील आणि औरंगाबाद इथले चित्रकार सुशील देवरे
यांना जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.जयराम खेडेकर यांनी काल वार्ताहरांशी
बोलताना दिली. पंचवीस हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त येत्या नऊ नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांचं
वितरण होणार असल्याचं उर्मी संस्थेचे सचिव सुभाष कोळकर यांनी सांगितलं.
****
डिजिटल
शिक्षण ही काळाची गरज असल्याचं, बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
त्या काल अंबाजोगाई इथं खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात अटल टिंकरिंग लॅबचं उद्घाटन केल्यानंतर
बोलत होत्या. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती यांची वाढ व्हावी आणि आधुनिक
तंत्र हाताळण्याची त्यांना सवय व्हावी, हा अटल टिंकरिंग लॅब उभारण्यामागचा उद्देश असल्याचं,
खासदार मुंडे यांनी सांगितलं. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा खासदार मुंडे यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.
****
टी-ट्वेंटी
विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-न्युझीलंड यांच्यातला प्राथमिक फेरी -सुपर १२ अंतर्गत
सामना होणार आहे. यापूर्वी भारतानं पाकिस्तानसोबत झालेला सामना गमावला आहे. त्यामुळे
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त अरब
अमिरातीत दुबई इथं होणारा हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता
सुरु होईल.
****
औरंगाबाद
इथल्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन
तसंच विक्री केंद्राचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
कारागृहातल्या बंदीजनांनी विणलेल्या साड्या, सतरंज्या, चादरी, टॉवेल, तयार केलेले लाकडी
झोपाळे, चप्पल स्टँड, बैलगाडी आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद
शहरालगतची गुंठेवारी बांधकामं नियमित करण्याच्या प्रक्रियेला सहा महिन्यांची मुदतवाढ
देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं आमदार, शिवसेना
जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. गुंठेवारीबाबत
राजकीय पक्षांच्या विविध भूमिका असून संबंधित मालमत्ताधारकांमध्येही अस्वस्थतेचं वातावरण
आहे. याबाबत महापालिका प्रशासन संबंधीतांसोबत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत चर्चा करुन
पुढील निर्णय घेणार आहे.
****
No comments:
Post a Comment