Monday, 25 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** राज्यात १८ ते २५ वर्ष वयोगटासाठी युवा स्वास्थ अभियान विशेष लसीकरण मोहिमेला प्रारंभ

** राष्ट्रनिर्माणासाठी जातिव्यवस्थेचं उच्चाटन आवश्यक - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

** ९४ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४, आणि ५ डिसेंबरला नाशिक इथं होणार

आणि

** देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या शनिवारी मतदान; शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं आणि आठवडी बाजारांना सुटी

****

राज्यात आजपासून १८ ते २५ वर्ष वयोगटासाठी युवा स्वास्थ अभियान विशेष लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. महाविद्यालयातले विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कोविड लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारनं हे अभियान सुरू केलं आहे. जे विद्यार्थी कोविड लस न घेतल्यामुळं महाविद्यालयात येऊ शकत नव्हते, त्यांना या अभियानामुळे कोविड लस सहजरित्या घेता येणार आहे. सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या विशेष लसीकरणाची सुरूवात करण्यात आली.

****

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या १०२ कोटी २७ लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात देशात १२ लाख ३१ हजार नागरीकांना लस देण्यात आली.

केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या १०७ कोटी २२ लाखापेक्षा जास्त मात्रा मोफत पुरवल्या आहेत. यापैकी अद्याप न वापरलेल्या १२ कोटी ७५ लाखापेक्षा जास्त मात्रा राज्यांकडे उपलब्ध आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

****

राष्ट्रनिर्माणासाठी जातिव्यवस्थेचं उच्चाटन होणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या वतीनं रत्नागिरी इथं आयोजित दोन दिवसीय विशेष राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सामाजिक समतेचे मोठे पुरस्कर्ते होते. आज देशाला सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीनं ते आत्मसात करावेत, असं आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केलं.

****

कृषी पदवीधरांनी शेती आणि शेतकरी कल्याणासाठी कार्य केलं पाहिजे, असं, कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. परभणी इथं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा तेवीसावा दीक्षांत समारंभ भुसे यांच्या उपस्थितीत आज झाला, त्यावेळी ते बोलत होते.

कृषी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ.डी.के.पाटील, डॉ.गिते, डॉ.एम.के.घोडके, डॉ.के.टी.आपेटआणि डॉ.सी.व्ही.अंबडकर यांना भुसे यांच्या हस्ते राधाकिशन शांती मल्होत्रा पारितोषिकानं गौरवण्यात आलं. २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षातल्या सुमारे ११ हजार जणांना विविध विद्याशाखेची पदवी, पदव्युत्तर पदवी तसंच आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाची तसंच प्रायोजित सुवर्ण पदकं, रौप्य पदकं तसंच रोख पारितोषिकंही पात्र स्नातकांना प्रदान करण्यात आली.

****

९४ वावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४, आणि ५ डिसेंबरला नाशिक इथं होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पूर्वी एचपीटी महाविद्यालयात आयोजित हे संमेलन आता आडगाव इथं भुजबळ यांच्या शिक्षण संस्थेत होणार आहे. नाशिक मध्ये गेल्या मार्च महिन्यात नियोजित हे संमेलन, कोविडची दुसरी लाट तीव्र झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आलं होतं.

****

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या जालना जिल्ह्यातल्या ३९९५ शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधार प्रमाणीकरण केलेलं नाही. शासनानं या योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद शहरातील त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर असलेली गुंठेवारी क्षेत्रातील वाणिज्यिक बांधकामे तोडण्यास तूर्त स्थगिती देण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. दिवाळीचा सण समोर असताना ही कारवाई तूर्त स्थगित करावी, असं पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पालिका प्रशासनाला कळवलं आहे. तूर्त ही कारवाई होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमानुकूल करून घ्यावीत, असं आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केलं आहे.

****

देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक येत्या शनिवारी, ३० ऑक्टोबरला होणार आहे. या दिवशी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा क्षेत्रात भरणारे सर्व आठवडी बाजार ३० ऑक्टोबर रोजी बंद राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहेत. देगलूर या गावातले आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी रविवारी ३१ ऑक्टोबरला सुरू राहणार आहेत.

दरम्यान, या निवडणुकीसाठी प्रचार आता शीगेला पोहोचला आहे. पीक विमा योजनेवरून भाजपचे नेते बबनराव लोणीकर आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण या दोघांमध्ये प्रचारसभांमधून आरोप प्रत्यारोप होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सातवा वेतन आयोग लागू करावा तसंच कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात या मागणीसाठी परभणी महानगरपालिके अंतर्गत अधिकारी तसंच कर्मचारी उद्या मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

येत्या १ नोव्हेंबर पर्यंत पीक कर्ज वाटप सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा नांदेड जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे. याबाबतचं एक निवेदन त्यांनी प्रशासनाकडे सादर केलं. अर्धापूर तालुक्यात मालेगाव इथल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेकडून नवीन पीक कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं, इंगोले यांनी या निवेदनात म्हटलं आहे.

 

 

****

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातल्या ट्वेंटी वन शुगर्सच्या थकीत बिलासाठी आज शेतकऱ्यांनी सायखेडा इथल्या साखर कारखान्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं. गेल्या हंगामातील प्रती टन ५०० रुपये थकीत देयक जमा केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

//********//

 

No comments: