आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ ऑक्टोबर
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
वाहनांचं राज्यांदरम्यान
स्थलांतरण सुलभतेनं व्हावं यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं,
वाहनांच्या नोंदणीकरिता बीएच-सिरीज म्हणजे ‘भारत शृंखला’ ही नवी नोंदणी शृंखला सुरु
केली आहे. याअंतर्गत आजपासून महाराष्ट्रात बीएच सीरिज नुसार नोंदणी सुरु झाल्याची माहिती
परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील यांनी ट्विटरवरून दिली आहे. यामुळे वाहनाचा मालक एका
राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यानंतर, त्याच्या वाहनांचा आधीचा नोंदणी
क्रमांक बदलून नव्या नोंदणी क्रमांकाच्या नोंदणीची आवश्यकता उरणार नाही.
****
औरंगाबाद इथले ज्येष्ठ पत्रकार
शांतारामबापू जोशी यांचं आज औरंगाबाद इथं अल्पशा आजारानं निधन झालं, ते ९० वर्षाचे
होते. जोशी हे दैनिक तरुण भारत आणि हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे माजी विशेष प्रतिनिधी
होते. एक अभ्यासू आणि सचोटीचे पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांतारामबापू जोशी यांनी
आपल्या कारकीर्दीत मराठवाडा विद्यापीठ नामांतर, रेल्वे रुंदीकरण हे विषय अत्यंत प्रभावीपणे
हाताळले होते.
****
नांदेड जिल्ह्यात आज पासून
ते एक नोव्हेंबर पर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं
आहे. या सप्ताहनिमित्त नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संदेशाचं वाचन करून लाच विरोधी शपथ घेतली दिली जाणार
आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरिकाच्या कामासाठी कोणताही अधिकार, कर्मचारी पैश्याची
मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधितांनी संपर्क साधण्याचं आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी धर्मसिंग चव्हाण यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन
केंद्राची जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक झाली.
दिव्यांगाच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहचाव्यात यासाठी, संवेदना लातूर या
दिव्यांगांकरता असणाऱ्या संकेतस्थळाचं अद्यायवतीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी
या बैठकीत दिले.
****
मराठवाड्यात काल २९ नवीन
कोविड बाधितांची नोंद झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment