Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी जी-ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेत आणि २६ व्या आंतरराष्ट्रीय हवामान
बदलविषयक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज रात्री इटली आणि ब्रिटनच्या पाच दिवसांच्या
दौऱ्यावर रवाना होत आहेत. इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी
रोममध्ये होणाऱ्या जी ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित
केलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान इटलीचे पंतप्रधान आणि अन्य नेत्यांशी द्विपक्षीय बैठकाही
करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान ब्रिटनमधल्या ग्लासगो इथं होणाऱ्या कॉप-26 शिखर परिषदेसाठी
रवाना होतील. या परिषदेसह पंतप्रधान ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यासह अन्य
नेत्यांसोबतही चर्चा करणार आहेत.
****
देशानं
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १०४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ४९
लाख नऊ हजार नागरीकांनी लस घेतली. आतापर्यंत देशात १०४ कोटी आठ लाख लसीच्या मात्रा
देण्यात आल्या आहेत. यामध्ये ७२ कोटी ५० लाख जणांनी पहिली मात्रा घेतली असून, ३१ कोटी
५७ लाख लोकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या १६ हजार १५६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७३३ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४२ लाख
३१ हजार ८०९ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५६ हजार २८६ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल १७ हजार रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३६ लाख १४ हजारांहून
अधिक रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६० हजार ९८९ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
राज्य
मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यात अनेक ठिकाणी बस वाहतूक
ठप्प झाली आहे. या आंदोलनामुळे सांगली बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन
सुरूच राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
नंदुरबार
जिल्ह्यातल्या नंदुरबार, शहादासह सर्वच आगारात बस वाहतूक ठप्प झाली आहे. सणासुदीच्या
काळात सुरु झालेल्या या संपावर लवकर तोडगा काढण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.
राज्य
सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांना महागाई
भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर लागू करावा, तसंच दिवाळीपूर्वी थकबाकीची
रक्कम एकरकमी द्यावी, या मागणीसाठी एसटी महामंडळातल्या श्रमिक संघटनांच्या संयुक्त
कृती समितीनं, कालपासून राज्यभर बेमुदत उपोषण पुकारलं आहे.
****
अंमली
पदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी
करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त
पोलिस आयुक्त दिलीप सावंत आणि उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांची या चौकशी समितीत निवड
करण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र
विधानमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांचा कालपासून परभणी जिल्हा दौरा सुरु झाला आहे. यातील
सदस्य जिल्ह्यातल्या विविध विभागांकडून राबवण्यात येणारे प्रकल्प आणि कामांना प्रत्यक्ष
भेटी देणार असून, विविध विषयांचा आढावा घेणार आहेत. या संदर्भात जिल्ह्यातल्या विभागप्रमुखांनी
आपल्या विभागाची सविस्तर माहिती तयार ठेवावी, तसंच स्वत: उपस्थित राहून गांभीर्यानं
कामं करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत.
****
स्पर्धा
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मोठ्या प्रमाणावर
त्रास सहन करावा लागत असल्यामुळे, संतप्त विद्यार्थ्यांनी काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
ठिय्या आंदोलन केलं. आमदार मेघना बोर्डीकर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
दर्शवत, या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी असल्याचं आश्वासन या विद्यार्थ्यांना
दिलं.
****
परभणी
महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १ आणि ५ या प्रभागात १०० टक्के लसीकरणाचं
काम पूर्ण झालं असून, आता १४ प्रभागांमध्ये दोन सत्रात लसीकरण मोहीम महापालिकेनं हाती
घेतली आहे. यानुसार आता सकाळी ९ ते २ आणि २ ते ९ अशा दोन सत्रामध्ये घरोघरी जावून लसीकरण
मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
भारताची
बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिनं फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या
दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं डेन्मार्कच्या खेळाडुचा पराभव केला. आता सिंधूचा
सामना डेन्मार्कच्याच लीन ख्रिस्तोफरसनशी होणार आहे. बॅडमिंटनपटू साईना नेहवालला मात्र
दुखापतीमुळे आपल्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. दरम्यान, पुरुष एकेरीत भारताच्या
लक्ष्य सेन यानंही आयर्लंडच्या नहत गुयेन याचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला
आहे.
****
No comments:
Post a Comment