Sunday, 31 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

देशात कोविड प्रतिबंधक सीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच,णि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** राज्यातल्या विद्यापीठांमध्ये पुढच्या वर्षापासून जलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार

** सरदार वल्लभभाई पटेल जयंती तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वत्र अभिवादन

** प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीतकार प्रभाकर जोग यांच्या पार्थिव देहावर पुण्यात अंत्यसंस्कार

आणि

** पेट्रोल-डिझेल तसंच गॅस दरवाढीविरोधात युवासेनेचं राज्यभर आंदोलन

****

राज्यातल्या विद्यापीठांमध्ये पुढच्या वर्षापासून जलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत ही घोषणा केली. रत्नागिरी जिल्हा जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदाच्या वतीनं घेण्यात आलेल्या जलकार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यभरात जलसाक्षरता आणि जलशक्ती अभियान राबवण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी यावेळी केलेल्या भाषणात हवामान बदल आणि पाण्याचं विज्ञान समजून घेण्याची गरज व्यक्त केली. शेतीला पाण्याशी जोडलं जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे. राज्यात पाण्याच्या दक्षतेविषयी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचनाही राजेंद्रसिंह यांनी केली.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं. मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सरदार पटेल यांनी स्वतंत्र भारताला एका सुत्रात गुंफण्यासाठी अद्वितीय असा मुत्सद्दीपणा दाखवला. आज आपण राष्ट्रीय एकता दिवस साजरा करताना बलशाली, समृद्ध भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन करूया, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं. इंदिराजींनी आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. देशाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास होता. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्याचा आणि एकात्म, बलशाली राष्ट्र उभारणीचा आपण संकल्प करूया, असं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस आज पाळण्यात येत आहे.  

 

सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त औरंगाबादसह सर्वत्रच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमांला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीतकार प्रभाकर जोग यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. जोग यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले जोग यांनी जावई माझा भला, थांब लक्ष्मी कुंकू लावते, सतीचे वाण, दाम करी काम, भैरु पैलवान की जय, सतीची पुण्याई, जावयाची जात, कैवारी, चांदणे शिंपीत जा, अशा अनेक चित्रपटांतल्या गाण्यांना संगीतबद्ध केलं. याशिवाय जोग यांचं संगीत असलेली अनेक भावगीतं तसंच भक्तीगीतंही लोकप्रिय आहेत. संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. गीतरामायणातील गाण्यांना जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले. गाणारं व्हायोलीन या नावानं जोग यांनी देशविदेशात अनेक कार्यक्रम सादर केले. आकाशवाणी तसंच दूरदर्शनसाठीही जोग यांनी अनेक कार्यक्रम संगीतबद्ध केले.

 

राज्य सरकारतर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, सूरसिंगार पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी, गदिमा पुरस्कार, पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे दिला जाणारा वसुंधरा पंडित आदी पुरस्कारांनं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

जोग यांच्या निधनानं, व्हायोलिनला गायला लावणारा, त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोग यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी जोग यांना श्रद्धांजली अर्पण करतांना, व्हायोलिनचा जादूगार’ हरपला अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

****

युवा सेनेच्या वतीने आज राज्यभर पेट्रोल-डिझेल यासह गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या सायकल फेरीत शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. इंधन दरवाढीच्या निषेधात यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं युवा सेनेच्या वतीने आज सायकल फेरी काढून आंदोलन करण्यात आलं. खासदार संजय जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने सायकल रॅली काढून आपला रोष व्यक्त केला.

वाशिम, यवतमाळ, सोलापूर आणि धुळे इथंही युवा सेनेच्या वतीन आंदोलन करण्यात आलं.

****

गावाचा विकास करण्यासाठी स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता, फळझाडांची लागवड, शिक्षण आणि वृद्धांचा सन्मान या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन, औरंगाबाद जिल्ह्यातल्या आदर्श गाव पाटोदाचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केलं आहे. आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत परभणी इथं ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत एक दिवशीय कार्यशाळेत पेरे पाटील बोलत होते. शौचालयांच्या नियमित वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर जळकोट भागातील रस्ते खराब झाले असून, या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. उदगीर जळकोट तालुक्यातल्या विविध विकास कामासंदर्भात लातूर इथं झालेल्या बैठकीत बनसोडे बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या बांधकामांचा आढावाही बनसोडे यांनी घेतला. ही कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण तसंच विहीत मुदतीत पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी दिल्या.

****

No comments: