Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण
मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे
डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात,
चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या
मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधल्या
सदस्यांच्या संख्येत १७ टक्के वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·
राज्यात मातोश्री ग्रामसमृध्दी
शेत, पाणंद रस्ते योजनेतून दोन लाख किलोमीटर्स रस्ते बांधण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
·
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
दीपावलीचा सण मर्यादित स्वरूपात घरी राहूनच साजरा करण्याचं राज्य सरकारचं आवाहन
·
पेगॅसस हेरगिरी प्रकरणी तीन
सदस्यीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
·
राज्यातल्या शाळांना आजपासून
ते दहा नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या जाहीर
·
राज्यात एक हजार ४८५ नवे
कोरोना विषाणू बाधित; मराठवाड्यात नव्या ५७ रूग्णांची नोंद
आणि
·
देगलूर विधानसभा पोट निवडणुकीच्या
प्रचाराची रणधुमाळी संपली. शनिवारी मतदान
****
महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधल्या
निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या
काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. सध्या महानगरपालिकांमधली सदस्य संख्या किमान ६५,
तर कमाल १७५ इतकी आहे. नगर परिषदांमधली सदस्य संख्या किमान १७, तर कमाल ६५ इतकी आहे.
लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन, अधिनियमात नमूद केलेल्या महानगरपालिका तसंच
नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत, १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिकांमध्ये किमान सदस्य संख्या आता ७६ तर कमाल १८५ असेल, तर नगर परिषदांसाठी
ही मर्यादा किमान २० तर कमाल ७५ एवढी असेल. त्यानुसार आता औरंगाबाद महानगरपालिकेतली
सदस्य संख्या १२६, लातूर ८१, परभणी ७६, तर नांदेड महानगरपालिकेची सदस्य संख्या ९२ होणार
आहे.
राज्यात मातोश्री ग्रामसमृध्दी
शेत, पाणंद रस्ते योजना राबवण्याचा निर्णयही, मंत्रिमंडळानं काल घेतला. या योजनेतल्या
कामांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी -मनरेगामधून आवश्यक असा निधी
उपलब्ध व्हावा, यासाठी मनरेगा, आणि राज्याची रोजगार हमी योजना यांचं एकत्रीकरण करण्यात
येणार आहे. या योजनेतून राज्यात दोन लाख किलोमीटर रस्ते बांधण्याचं उद्दिष्ट निर्धारीत
करण्यात आलं आहे.
जालना इथल्या मत्स्योदरी
शिक्षण संस्थेच्या पार्थ सैनिकी शाळेस वाढीव २० टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय
मंत्रिमंडळानं घेतला आहे. पार्थ सैनिकी शाळेची इयत्ता सहावी ते दहावीची प्रत्येकी एक
तुकडी, याप्रमाणे एकूण अतिरिक्त पाच तुकड्यांवरील १० शिक्षक पदांना, २०२१-२२ या शैक्षणिक
वर्षापासून वाढीव २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या
नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ७७४ कोटी रुपयांच्या मदतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी काल मंजुरी दिली. राज्य सरकारतर्फे यापूर्वी १४ जिल्ह्यातल्या बाधित शेतकऱ्यांसाठी
दोन हजार ८६० कोटी रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली होती. त्याच्या वाटपाला सुरुवातही
झाली आहे. कोणत्याही बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून, शेतकऱ्यांना
मदतीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं
आहे.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
राज्य सरकारनं दिवाळी सण साजरा करण्यासाठी काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार
दीपावलीचा सण मर्यादित स्वरूपात घरी राहूनच साजरा करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
खरेदीसाठी रस्त्यांवर किंवा बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये, ज्येष्ठ नागरिक आणि लहान
मुलांना घराबाहेर पडू देऊ नये, कोरोनाग्रस्त किंवा कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना
फटाक्यांच्या प्रदूषणाचा जास्त त्रास होऊ शकतो, त्या अनुषंगानं नागरिकांनी खबरदारी
घ्यावी, फटाक्याऐवजी दिव्यांची आरास करून हा उत्सव साजरा करावा, असं या निर्देशात म्हटलं
आहे.
कोरोनाचे नियम जरी शिथिल
केले असले, तरीदेखील नागरिकांनी एकत्र येण्यावर निर्बंध कायम आहेत. लोकांनी या नियमांच
काटेकोरपणे पालन करावं, दिवाळी उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरांचं
आयोजन करावं, असं आवाहनही राज्य सरकारनं केलं आहे.
****
पेगॅसस हेरगिरी प्रकरणी तीन
सदस्यीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर व्ही रविंद्रन हे या समितीचे
अध्यक्ष असतील. सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत
आणि न्यायमूर्ती हिमा कोहल यांच्या पीठानं हा आदेश दिला. या चौकशी समितीच्या कामकाजावर
सर्वोच्च न्यायालय स्वतः देखरेख ठेवणार आहे. या प्रकरणी केंद्र सरकारनं कसलाही नकार
दर्शवलेला नाही, याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं.
****
राज्यातल्या शाळांना आजपासून
ते दहा नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या जाहीर झाल्या आहेत. यासंदर्भातला सुधारीत
शासन निर्णय काल शालेय शिक्षण विभागानं जाहीर केला. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात
येणारं ऑनलाईन आणि ऑफलाईन अध्यापन बंद राहील, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात काल एक हजार ४८५
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६६ लाख सहा हजार, ५३६ झाली आहे. काल ३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ९८ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल दोन हजार ५३६ रुग्ण बरे झाले,
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ४३ हजार ४३२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १९ हजार
४८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ५७ नवीन
कोविड बाधितांची नोंद झाली, तर एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १७
नवे रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात १४, उस्मानाबाद आठ, नांदेड सात, लातूर सहा, परभणी तीन,
तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला.
****
आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी,
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात लावलेल्या
आरोपांची, पाच सदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू झाली आहे. एनसीबीचे उप महासंचालक ज्ञानेश्वर
सिंह यांनी काल मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. या कथित लाच प्रकरणातले साक्षीदार
के व्ही गोसावी, आणि प्रभाकर सईल यांनी साक्ष देण्यासाठी या समितीसमोर हजर व्हावं,
असं आवाहन ज्ञानेश्वर सिंह यांनी केलं आहे.
****
जलयुक्त शिवार अभियानाची
सविस्तर चौकशी अद्याप सुरू असून, या कामाला क्लिनचिट दिलेली नाही, असा खुलासा, राज्याच्या
जलसंधारण विभागानं केला आहे. जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची मंगळवारी लोक
लेखा समितीसमोर साक्ष झाली. सचिवांनी यावेळी सादर केलेल्या माहितीच्या आधारे, काही
माध्यमांमधून याबाबत बातमी प्रसारित करण्यात आली. मात्र यासंदर्भात स्थापन विशेष तपास
समितीच्या अहवालाच्या आधारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून
अद्याप या चौकशीचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत, त्यामुळे जलयुक्त अभियानाची अद्याप
चौकशी पूर्ण झालेली नाही, असं जलसंधारण विभागानं स्पष्ट केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर
विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी काल सायंकाळी संपली. प्रचाराच्या अखेरच्या
दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं. येत्या शनिवारी
३० ऑक्टोबरला मतदान होत असून, मतमोजणी २ नोव्हेंबरला होणार आहे
****
आघाडी सरकारनं कोरोना आपत्तीच्या
काळात महाराष्ट्राला मोठा आधार दिल्याचं, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी
म्हटलं आहे. काल तुळजापुर इथं तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार
परिषदेत बोलत होत्या. राज्य सरकार महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीचे निर्णय
घेत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या
धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता,
वार्षिक वेतनावाढीचा दर लागू करावा, तसंच दिवाळीपूर्वी थकबाकीची रक्कम एकरकमी द्यावी,
या मागणीसाठी एसटी महामंडळातल्या श्रमिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं, कालपासून
राज्यभर बेमुदत उपोषण पुकारलं आहे. राज्यशासनाप्रमाणे एक एप्रिल २०१६ पासून २८ टक्के
महागाई भत्ता लागू करावा, वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के प्रमाणे द्यावा, घरभाडे भत्ता
८, १६ आणि २४ टक्के प्रमाणे देण्यात यावा, आदी मागण्या संघटनेनं केल्या आहेत.
औरंगाबाद इथं एसटी कर्मचाऱ्यांनी
एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेसमोर उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. आजपासून हे आंदोलन आगार
स्तरावर केलं जाणार असल्याचं, आंदोलकांनी सांगितलं. परभणी तसंच नांदेड इथंही एसटी कर्मचारी
उपोषणाला बसले आहेत. दिवाळीपूर्वी मागण्या मान्य न केल्यास, आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा
इशारा संघटनेनं दिला आहे.
****
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था - आयटीआयमधल्या कंत्राटी शिल्प निदेशक आणि गट निदेशकांना नियमित सेवेत सामावून
घेण्याच्या मागणीसाठी, या कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीनं मुंबईत आझाद मैदानावर साखळी
उपोषण पुकारलं आहे. नियमित कर्मचाऱ्यांएवढं वेतन तसंच इतर सुविधा मिळाव्यात, या आणि
अन्य मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय, या कर्मचारी संघर्ष समितीनं
व्यक्त केला आहे. औरंगाबाद इथल्या आयटीआय कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणा आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त
विद्यमानं, हिरकणी जिल्हास्तरीय विक्री केंद्राचं काल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता
कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पंचायत समिती कार्यालयानजीक असणाऱ्या गाळ्यांमध्ये,
उमेद अभियानांतर्गत जिल्हयातल्या महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या,
अस्सल आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांची विक्री आणि प्रदर्शनाला, यावेळी सुरुवात करण्यात
आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात हर्सुल
सावंगी इथल्या चेतना शिक्षण संस्थेच्या कला वरीष्ठ महाविद्यालयात आज युवा स्वास्थ कोविड
१९ लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना
याठिकाणी लसीकरण करुन घेता येणार आहे.
****
No comments:
Post a Comment