Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात कोविड प्रतिबंधक
लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान
देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही
लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** कोविड लसीकरण अभियानाच्या यशामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी
अथक
परिश्रम आणि संकल्पातून एक नवा आदर्श निर्माण
केल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
** राज्यात विभागीय स्तरावर
कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
** शेतकऱ्यांचे सातबारे कोरे
करु म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा विसर- आमदार मेघना बोर्डीकर यांची टीका
आणि
** टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान सामना
****
कोविड लसीकरण अभियानाच्या यशामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम आणि संकल्पातून एक नवा आदर्श निर्माण
केला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधानांनी
कोविड
लसीकरणाच्या
यशातून भारताचं सामर्थ्य प्रदर्शित होत असून, १०० कोटी
मात्रानंतर आज देश नवा उत्साह, नव्या ऊर्जेनं पुढे जात असल्याचं नमूद केलं. १०० कोटी लसीकरणाच्या यशासोबत
लाखों
प्रेरक प्रसंग निगडित असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
जीवनात गीत-संगीत, कला आणि संस्कृतीच्या महत्त्वाबाबतही पंतप्रधानांनी
चर्चा
केली.
सरकारनं स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवातदेखील कला, संस्कृती, गीत आणि संगीतानं रंग भरण्याचा निर्णय घेतला आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभक्ती गीतं, रांगोळी आणि अंगाई
गीतं स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या ३१ ऑक्टोबर- सरदार पटेल यांच्या जयंतीपासून या स्पर्धांना सुरूवात
होणार आहे. जीवन सार्थक
बनवायचं असेल तर साऱ्या कला जीवनात उत्प्रेरकाचं काम करतात, उर्जा वाढवण्याचं काम
करतात असंही पंतप्रधान
म्हणाले.
येत्या रविवारी सरदार वल्लभभाई
पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन
म्हणून साजरी होत
आहे. या दिवसानिमित्त
एकतेचा संदेश देणाऱ्या कोणत्या न कोणत्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं,
ही
आपली जबाबदारी आहे, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
राज्यात विभागीय स्तरावर कर्करोग
रुग्णालयं उभारण्याचा विचार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते
आज जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि त्याबाबतच्या
जोखीमीचा अहवाल पाहता, हा निर्णय घेतल्याचं टोपे यांनी सांगितलं. महात्मा फुले जन आरोग्य
योजनेतून उरलेल्या निधीचा यासाठी वापर केला जाणार असल्याचं टोपे म्हणाले.
****
आरोग्य विभागाच्या आज झालेल्या परीक्षेत
तिसऱ्यांदा गोंधळ उडाल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. या गोंधळाला आरोग्यमंत्री
राजेश टोपे हेच जबाबदार असून या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत टोपे यांनी राजीनामा
द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव
भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. आरोग्य विभागाच्या यापूर्वीच्या परीक्षा घेण्याचं कंत्राट न्यासा कंपनीला
देण्यात आलं होतं, मात्र कंपनीने केलेल्या गोंधळामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची
नामुष्की राज्य सरकारवर आली होती. महाविकास आघाडी सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकलं होतं. मात्र आरोग्य मंत्री
राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे याच कंपनीला आज झालेल्या परीक्षा घेण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे असा आरोप भंडारी यांनी
केला आहे. आज झालेल्या या परीक्षेत पुणे तसंच नाशिक जिल्ह्यात काही परीक्षा केंद्रावर
प्रश्नपत्रिका उशिरा दाखल झाल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचं, वृत्तसंस्थेच्या
बातमीत म्हटलं आहे.
****
लिंगायत धर्माच्या
संवैधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र शासनाकडे शिफारस करावी, राज्यात लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांकाचा
दर्जा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समन्वय समितीच्या वतीनं आज परभणी जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारने लिंगायत धर्माच्या मागण्यांबाबत अद्यापही
सकारात्मक विचार केलेला नाही, लिंगायत समाजाचा सरकारने अंत पाहू नये, असा इशारा समन्वय समितीच्या
पदाधिकाऱ्यांनी सरकारला दिला आहे.
****
शेतकऱ्यांचे सातबारे कोरे
करु म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आज शेतकऱ्यांचा विसर पडला असल्याची टीका, जिंतूरच्या भाजपच्या
आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे. त्या आज परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राज्य सरकारमुळे यंदा शेतकऱ्यांची काळी दिवाळी
होणार असल्याचा
आरोप त्यांनी केला. त्यामुळे येत्या १ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात काळी फित
लावून राज्यसरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा बोर्डीकर यांनी दिला आहे.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत भारताचा
पहिला सामना आज पाकिस्तानबरोबर होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता हा
सामना सुरू होईल. अन्य एका सामन्यात बांगलादेशानं श्रीलंकेसमोर १७२ धावांचं लक्ष्य
ठेवलं आहे. श्रीलंका संघानं या लक्ष्याचा पाठलाग करताना, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा
दहाव्या षटकात ४ बाद ७९ धावा केल्या होत्या.
****
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आज धुळे जिल्ह्यातल्या मुकटी इथं गांधी शांती परीक्षा घेण्यात आली. लोकहिताय ग्रामीण विकास
संस्था आणि सर्वोदय संवाद यांच्या संयुक्त विद्यामने घेण्यात आलेल्या या परीक्षेत
युवक, युवती मोठ्या संख्येने
सहभागी झाले. युवा-युवतींची वैचारिक बुद्धी
प्रगल्भ व्हावी
आणि
वाचनाची आवड निर्माण व्हावी, या हेतूनं ही परीक्षा घेण्यात आली.
****
नमामि गोदा फाउंडेशन या संस्थेने
नदीचं राष्ट्रगान तयार केलं आहे. नाशिक इथं जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि जलतज्ञ
राजेंद्रसिंह यांच्या हस्ते या नदीच्या राष्ट्रगानचं लोकार्पण करण्यात आलं. प्रख्यात
गायक शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांनी सर्व
शाळांमध्ये राष्ट्रगीतांप्रमाणे सक्तीचं केलं आहे. नाशिक मधील पर्यावरण प्रेमी अनेक
वर्षांपासून गोदावरी नदीच्या स्वच्छतेपासून तिच्या संवर्धनासाठी शासकीय यंत्रणेचे लक्ष
वेधण्यासाठी काम आहेत. फक्त शासकीय यंत्रणांनीच नव्हे तर नागरिकांनी सर्वच नद्यांचं
पावित्र्य जपावं आणि नदीचा सन्मान करावा यासाठी, हे गीत तयार करण्यात आलं आहे.
//********//
No comments:
Post a Comment