Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव
आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका.
कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे
दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा,
हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात
जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड
-१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय
मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू
शकता.
****
**
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातल्या ज्येष्ठ वकिलांनी समाजातल्या दुर्बल घटकांना विनामूल्य सेवा देण्याचं राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांचं आवाहन
**
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या
जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन
**
तांदुळ, मका तसंच इतर धान्यापासूनही इथेनॉल
तयार करायला परवानगी, वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर करण्याचं केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन
**
प्रसिद्ध साहित्यिक द मा मिरासदार यांचं निधन
**
नवरात्र महोत्सवात दररोज
पंधरा हजार भाविकांना तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार
आणि
** राज्यात दोन हजार ६९६ नवे कोरोना विषाणू बाधित; मराठवाड्यात
तीन जणांचा मृत्यू तर ९५
बाधित
****
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातल्या ज्येष्ठ वकिलांनी आपल्या
कार्यालयीन वेळेचा काही भाग समाजातल्या दुर्बल घटकांना विनामूल्य सेवा उपलब्ध
करण्यासाठी द्यावा, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते काल
नवी दिल्लीत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅन इंडिया विधि
जागरूकता अभियानाचा प्रारंभ करताना बोलत होते. विधी सेवा संस्थांची संरचना ही
राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि
उपविभागीय स्तरावर असुरक्षित घटकांसाठी न्यायिक प्रणाली सक्षम करण्यासाठी
सहाय्यभूत ठरेल, असं त्यांनी सांगितलं.
असुरक्षित घटकांच्या सेवेसाठी सहाय्य आणि सामर्थ्य पुरवणं महत्त्वाचं असल्याचं
कोविंद म्हणाले.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी तसंच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त
काल सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. यानिमित्तानं प्रार्थना सभांसह विविध कार्यक्रमातून
दोन्ही राष्ट्रपुरुषांना आदरांजली वाहण्यात आली.
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी वर्धा इथं सेवाग्राम आश्रमात बापुकुटी इथं काल महात्मा गांधीजींच्या
स्मृतींना अभिवादन केलं. गांधीजी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक आहेत, त्यांचं देशासाठी
त्यागमय जीवन आज जगाला प्रेरीत करत असल्याचं, राज्यपाल म्हणाले.
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी गांधीजी तसंच शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. स्वावलंबन,
श्रमप्रतिष्ठा यासह स्वच्छता, ग्रामविकासाबाबतची गांधीजींची शिकवण मार्गदर्शक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शास्त्रीजींनी
साधी राहणी आणि उच्च विचारसरणीतून प्रखर राष्ट्रभक्तीचा आदर्श घालून दिला, 'जय जवान,
जय किसान' घोषणेतून त्यांनी चैतन्य निर्माण केलं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
रेल्वे
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालना इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सेवा समर्पण अभियानांतर्गत शहरातल्या
गांधी चमन चौकातून स्वच्छता अभियान टप्पा दोनला दानवे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात
आली. जालना जिल्ह्यात पुढील आठवडाभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून, नागरिकांनी
यामध्ये सहभाग घ्यावा, असं आवाहन दानवे यांनी यावेळी केलं.
औरंगाबाद
इथं महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठात गांधी विचारांचे अभ्यासक डॉ. ख्रिस्तियन
बार्टोल्फ आणि डॉ. सुरेश खैरनार यांचं व्याख्यान झालं, आज आपण भलेही विकासाच्या गप्पा
करत असलो तरी कोरोना, चक्रीवादळ आणि अन्य अनेक समस्या या याच विकासाची अपत्यं आहेत.
या समस्यांतून मार्ग काढण्यासाठी गांधी विचारांची आणि मूल्यांची गरज आहे, अशी भावना
या वक्त्यांनी व्यक्त केली.
गांधीजी
आणि शास्त्रीजी जयंती निमित्त परभणी इथं जिल्हाधिकारी आंचल गोयल तसंच जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाअंतर्गत
'एक विद्यार्थी-एक वृक्ष' जिल्हास्तरीय अभियानाला काल धर्मापुरी इथल्या जिल्हा परिषद
प्रशालेतून प्रारंभ करण्यात आला. परभणी महानगर पालिकेच्या वतीने वक्तृत्व-निबंध स्पर्धा
घेण्यात आली. बी. रघुनाथ सभागृहात झालेल्या या स्पर्धेचं उद्घाटन आमदार सुरेश वरपुडकर
यांच्या हस्ते झालं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वांग सुंदर आणि स्वच्छ
परभणी शहर या संकल्पाचा निर्धार करु या असं आवाहन वरपूडकर यांनी केलं.
****
ऊसापासून इथेनॉल निर्मितीप्रमाणे तांदुळ, मका तसंच
इतर धान्यापासूनही इथेनॉल तयार करायला परवानगी देण्यात येत असल्याचं केंद्रिय
परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात
४ हजार ७५ कोटी रुपये खर्चाच्या आणि ५२७ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं लोकार्पण
आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर केला जावा, असं आवाहन त्यांनी
यावेळी केलं. गडकरी यांनी यावेळी तीन नवीन प्रकल्पांचीही घोषणा केली. राज्यात तयार होणाऱ्या रस्त्याच्या
बाजूला राज्य सरकारने पडीक असलेली जागा दिल्यास त्या ठिकाणी लॉजिस्टक पार्क यासह
इतर गोष्टी केल्या जाऊ शकतात असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी
तळेगाव- चाकण- शिक्रापूर- नावरा -श्रीगोंदा-
जामखेड -सौताडा ते बीड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ च्या १३५
कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी प्रस्तावित प्रभाग पध्दतीच्या मसुद्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी काल मंजुरी दिली असून याचा अध्यादेश उद्या जारी होणार आहे.
मसुद्याप्रमाणे महापालिकांसाठी तीन, नगरपरिषद
दोन आणि नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग असणार आहे.
****
प्रसिद्ध
साहित्यिक दत्ताराम मारुती उर्फ द मा मिरासदार यांचं काल पुण्यात राहत्या घरी निधन
झालं, ते ९४ वर्षांचे होते. व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर,
भुताचा जन्म, आदी प्रसिद्ध कथांचे लेखक असलेले मिरासदार यांनी देशविदेशात कथाकथनाचे
तीन हजारावर कार्यक्रम केले. त्यांचे भुताचा जन्म, चकाट्या, गप्पागोष्टी, गंमतगोष्टी,
अंगतपंगत, आदी कथा तसंच लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. अनेक विनोदी चित्रपटांच्या पटकथाही
मिरासदार यांनी लिहिल्या, एक डाव भुताचा आणि ठकास महाठक या दोन चित्रपटांच्या संवादलेखनासाठी
त्यांना पारितोषिकं मिळाली होती. १९९८ साली परळी वैजनाथ इथं झालेल्या एक्काहत्तराव्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिरासदार यांनी भूषवलं होतं. त्यांना
साहित्य अकादमी पुरस्कारासह राज्य वाङमय पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.
मिरासदार
यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक
गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण
केली.
****
राज्य
शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ई - स्वरूपात महात्मा गांधी संकलित
वाङमयाचं काल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
हे साहित्य पेनड्राईव्ह स्वरुपात प्रथमच प्रकाशित होत आहे. ई - स्वरूपातलं हे वाङमय
लवकरच जगातील प्रत्येक वाचनालयात उपलब्ध व्हावं, यासाठी दर्शनिका विभागानं प्रयत्न
करावा, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.
****
शारदीय
नवरात्र महोत्सवास येत्या गुरुवारी ७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. या
काळात तुळजापूर इथं पहाटे चार ते रात्री दहा या कालावधीत दररोज पंधरा हजार भाविकांना
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. सर्व
भाविकांना मास्कसह कोविड नियमांचं पालन बंधनकारक करण्यात आलं आहे. ६५ वर्षावरील नागरिक,
गर्भवती तसंच दहा वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. लसीकरण न झालेल्या
राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी ७२ तासाच्या आतला कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.
दरम्यान,
अश्विनी कोजागिरी पौर्णिमा यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. १८ ते २० ऑक्टोबर
दरम्यान इतर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
****
राज्यात काल दोन हजार ६९६ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ५६ हजार, ६५७ झाली आहे. काल ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार १६६ झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ६२ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६३ लाख ७७ हजार ९५४ रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९७ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३५ हजार, ९५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ९५ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन आणि बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश
आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल ३३ नवे रुग्ण आढळले, बीड
जिल्ह्यात २७, औरंगाबाद २०, लातूर नऊ,
परभणी चार, जालना दोन, तर
हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला
नाही.
****
विधानसभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल हिंगोली जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त
भागांची पाहणी केली. विमा कंपन्यांनी शासकीय पंचनामे मान्य करून शेतकऱ्यांना मदत करावी,
अन्यथा शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी हिंगोलीतल्या आडगाव
इथं नुकसानीच्या पाहणीनंतर केली. पीकविमा कंपनीकडे तक्रारी करूनही कोणी आलं नाही. शासनाकडूनही
पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्याकडे केल्या. पीकविमा कंपन्या
अजून पंचनामे करत नसतील तर ही बाब गंभीर आहे, असं फडणवीस म्हणाले. आडगाव पाठोपाठ फडणवीस
यांनी हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, डोंगरगाव, वारंगा, डोंगरकडा या भागातही नुकसानाची
पाहणी केली.
****
अतिवृष्टी
आणि पूर परिस्थितीनं झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरसह
काही गावच्या शिवारात पिकांच्या नुकसानीची तसंच गावातील पडझड झालेल्या घरांची राज्याचे
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल पाहणी केली, या
परिस्थितीत राज्य शासन आपल्या पाठीशी आहे आणि सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन देशमुख
यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलं. आगामी एक महिन्याच्या आत विमा कंपन्या आणि शासनाकडून
सर्वांना मदत देण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती देशमुख यांनी उस्मानाबाद इथं घेतलेल्या
पत्रकार परिषदेत दिली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या कोडमडलेल्या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी राज्य शासनानं तातडीनं ओला दुष्काळ
जाहीर करावा, हेक्टरी ५०हजार रुपये मदत द्यावी, मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी शेतकऱ्यांना
५० हजार रुपये मदत द्यावी. अशा मागण्या भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चानं केली
आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास भाजप किसान मोर्चा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल
असा इशाराही किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
//********//
No comments:
Post a Comment