Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
जल जीवन
मिशनचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणं हा असून, जनआंदोलन याचा मुख्य आधार
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामपंचायती,
पाणी समित्या आणि ग्रामजल समित्यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना ते आज बोलत होते.
प्रत्येक नागरिकानं पाणी बचतीसाठी प्रयत्न केले पाहिजे, यासाठी प्रत्येकाला आपल्या
सवयी बदलाव्या लागतील, असं पंतप्रधान म्हणाले. जलजीवन मिशनमुळे देशातल्या ८० जिल्ह्यांमधल्या
जवळपास सव्वा लाख गावामंध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशाचा विकास गावांच्या विकासावर अवलंबून आहे, त्यासाठी ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणाला
चालना दिली पाहिजे, असं ते म्हणाले.
जलजीवन मिशनअंतर्गत
असलेल्या विविध योजनांमध्ये पारदर्शकता राहावी, उत्तरादायित्व यावं आणि संबंधितांमध्ये
जागरुकता वाढावी, यासाठी जलजीवन मिशन ॲपचं आणि राष्ट्रीय जलजीवन कोशाचंही, पंतप्रधानांनी
यावेळी उद्घाटन केलं. ग्रामीण भागातली घरं, शाळा, अंगणवाडी केंद्रं, आश्रमशाळा आणि
इतर संस्थांमध्ये नळजोड उपलब्ध करून देण्यासाठी, देशातली किंवा देशाबाहेरची प्रत्येक
व्यक्ती, संस्था, कंपनी या कोशासाठी देणगी देऊ शकते. जलजीवन मिशन योजनेसंदर्भात देशभर
आज ग्रामसभाही आयोजित केल्या जात आहेत.
****
गृहमंत्री
अमित शाह यांनी राज्य आपत्ती निवारण निधीच्या केंद्र सरकारच्या हिश्श्याच्या दुसऱ्या
हप्त्याला मंजुरी दिली. त्यामुळे राज्यांना आता कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या
नातेवाईकांना मदत निधी देणं शक्य होणार आहे. गृहमंत्र्यांनी केंद्राच्या हिश्याच्या
सात हजार २७४ कोटी ४० लाख रुपयांच्या हप्त्याला मंजुरी दिली. पाच राज्यांना या आधीच
एक हजार ५९९ कोटी २० लाख रुपयांचा दुसरा हप्ता या आधीच देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त
हा २३ हजार १८६ कोटी ४० लाख रुपयांचा दुसरा हप्ता याच आर्थिक वर्षात अग्रीम स्वरुपात
दिला जाणार आहे.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज साजरी
होत आहे. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद
शहरात शहागंज इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास शहर अभियंता एस डी पानझडे यांनी
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
महानगरपालिका
मुख्यालयात उपायुक्त सौरभ जोशी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं.
लातूर शहरात
पालकमंत्री अमित देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं.
****
राज्य परिवहन
महामंडळ - एसटीच्या बसेसला अँटिमायक्रोबियल रसायनाचं आवरण देण्याचा निर्णय, राज्य सरकारनं
घेतला आहे. एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी ही माहिती दिली. या आवरणामुळे
विषाणू, बुरशी आणि इतर जीवाणूंपासून पुरेसं आणि दीर्घकाळ संरक्षण मिळेल, असा विश्वास
व्यक्त करण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यभरात आठ हजार गाड्यांना हे आवरण देण्यात
आलं असून, एकूण १० हजार बसना आवरणाचं उद्दिष्टं असल्याचं भोसले यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. सुखना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या ८९ हजार ६०४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी
नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
नांदेड शहरात
गोदावरी नदीचा पूर ओसरल्यानंतर अनेक भागात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं विशेष स्वच्छता
मोहीम राबवण्यात आली. यावेळी कचरा संकलन करणं, ब्लिचिंग पावडर, जंतूनाशक फवारणी, डास,
किटक प्रतिबंधात्मक धूर फवारणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण २३० सफाई कर्मचारी, २५
धूर फवारणी कर्मचारी सहभागी झाले होते.
****
स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने आणि गांधी जयंतीचं औचित्य साधून वाशिम जिल्ह्यातल्या
विविध गावांमध्ये आज ग्रामसभा घेण्यात आल्या. यामध्ये तलाठ्यांच्या वतीने मोफत सात
बारा वाटप करण्यात आले, मनरेगाच्या समृद्ध गाव योजनेच्या कृती आराखड्यावर माहिती देण्यात
आली, तसंच स्वच्छ गाव आणि लसीकरण पूर्ण गाव करण्याचा निर्धार या ग्रामसभेत करण्यात
आला.
****
एटीएम सेंटरवर
पैसे काढण्यास आलेल्या नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून बँक खात्यातून पैसे लुबाडणाऱ्या
आंतरराज्य टोळीला, धुळे पोलिसांनी काल अटक केली. यात एका अल्पवयीन युवकासह तिघांचा
समोवश असून, हे सर्वजण हरियाणा राज्यातले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण नऊ लाख
५९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीने महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांसह
अनेक राज्यात एटीएम कार्ड अदलाबदल करून पैसे हडपल्याची कबुली दिली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या टेंभूर्णी शिवारातल्या एका शेतात सात लाख रुपये किमतीची
९७ किलो गांजाची झाडं जप्त करण्यात आली. संबंधित शेतकऱ्याला हट्टा पोलिसांनी ताब्यात
घेतलं आहे.
****
No comments:
Post a Comment