Monday, 1 November 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 November 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 November 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १ नोव्हेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ११२ कोटी ९३ लाखांपेक्षा जास्त मात्रांचा पुरवठा 

** व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २६६ रुपये वाढ; पेट्रोल डीझेलही ३५ पैशांनी महाग

** हज २०२२ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरवात

** जालन्याचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचं निधन

आणि

** देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण

****

केंद्र सरकारच्या मोफत थेट कोविड लस पुरवठा धोरणा अंतर्गत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ११२ कोटी ९३ लाखापेक्षा जास्त मात्रा पुरवण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. यापैकी १३ कोटी ४५ लाखाहून जास्त लस मात्रा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याचं यात म्हटलं आहे. कोविड लसीकरणाच्या नव्या टप्प्यात लस उत्पादकांनी तयार केलेल्या एकूण लस साठ्यापैकी ७५ टक्के लस मात्रा देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध केल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

****

देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होत असल्याचं, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन एक लाख तीस हजार १२७ कोटी रुपये इतकं झालं, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातल्या कर संकलनाच्या तुलनेत हे प्रमाण २४ टक्क्यांनी अधिक आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटी लागू झाल्यानंतरचं हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक संकलन असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज २६६ रुपयांची वाढ करण्यात आली. व्यावसायिक वापराचा १९ किलो वजनाचा १ हजार ७३४ रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता २ हजार रुपयांना मिळणार आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किंमतीतही ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या संघटना ओपीईसी या आठवड्यात संयुक्त बैठक घेणार आहेत. या बैठकीत उत्पादन वाढवण्यावर निर्णय होऊ शकतो, असं झाल्यास पेट्रोलियम पदार्थांच्या किमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

****

मुंबईतली एक खासगी कंपनी आणि या कंपनीच्या संचालकांसह अन्य काही जणांविरोधात IDBI बँक फसवणूक प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्यक्तींनी वर्ष २०१४ ते १६ या कालावधीत बँकेची ६३ कोटी १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुढील तपासाकरता आरोपींच्या मालकीच्या मुंबई, नागपूर आणि छत्तीसगड इथल्या आस्थापनांवर सीबीआयनं आज धाड टाकली.

****

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज हज २०२२ ची  घोषणा केली.

हज २०२२ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२२ आहे. कोविड- १९ लसीकरण निकषाच्या आधारे हज यात्रेकरुंची निवड प्रक्रिया होणार असून सर्व यात्रेकरुंसाठी ई-मसिहा डिजिटल आरोग्य कार्ड अनिवार्य असल्याचं मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. भारतीय हज यात्रेकरू "वोकल फॉर लोकल" चा प्रचार करतील. भारतातून हज यात्रेला रवाना होण्याच्या ठिकाणी स्वदेशी वस्तू वितरित केल्या जातील अशी माहिती नक्वी यांनी दिली.

****

कोरोना संसर्गाचा धोका अजूनही संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत आणि भान ठेवत दिवाळीचा सण साजरा करावा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. दिवाळीच्या सणासाठी खरेदी आणि इतर कारणांमुळे गर्दी वाढली असल्याचं निरीक्षण टोपे यांनी नोंदवलं. फटाके फोडण्यासंदर्भात पर्यावरण विभागानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन ही त्यांनी केलं. कोविड१९ प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्र घेतलेल्यांना रेल्वेच्या विनाआरक्षित सामान्य डब्यातून प्रवासाची सोय आणि त्यासाठीची तिकीटं मिळण्याबाबत रेल्वेला विनंती करू असं त्यांनी सांगितलं. राज्यात ७५ लाखाहून अधिक पात्र नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही. त्यांनी ती लवकरात लवकर घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात सध्या कोरोनासह, म्युकर मायकोसिसबाधितांचं प्रमाणही नियंत्रणात आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी महागडी औषधं मोफत दिली जात आहे, हा त्याचाच सकारात्मक परिणाम असल्याचं ते म्हणाले.

****

जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचं आज सकाळी औरंगाबाद इथं खासजी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाल. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी त्यांच्या मूळगावी भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव सुतार इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९७७ साली जनता पक्षाकडून दानवे यांनी लोकसभेची निवडणूक जिकंली होती. निष्कलंक खासदार, तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून ते परिचित होते. दरम्यान त्यांच्या पत्नी  केशरबाई दानवे यांचं चार दिवसांपूर्वी ह्रदय विकारानं निधन झालं होतं.

****

राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी निवडणूक विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी समन्वयानं काम करावं, समाजातल्या शेवटची महिला, युवा तसंच तृतीयपंथींपर्यंत पोचून मतदार यादीत नाव नोंदवून घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करावं असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलं आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. या अभियानाअंतर्गत या महिन्यात राज्यात १३ ते १४ आणि आणि २६ ते २७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात विशेष मतदार नोंदणी शिबीरं आयोजित केली जातील, १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभा आयोजित करून मतदार यादीचं वाचन केलं जाईल अशी माहिती देशपांडे यांनी या बैठकीत दिली.

****

नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. उद्या सकाळी आठ वाजता देगलूर इथं पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणीला प्रारंभ होणार असून या मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. एक टेबल टपालाद्वारे प्राप्त झालेल्या मतांची मोजणी करण्यासाठी लावला आहे.

****

No comments: